15 December 2017

News Flash

राज  शेठ

शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या बुद्धिचातुर्य व क्षमतेचा अंदाज शाळेतील शिक्षकांना आलेला असतो.

लोकसत्ता टीम | Updated: July 20, 2017 3:21 AM

शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या बुद्धिचातुर्य व क्षमतेचा अंदाज शाळेतील शिक्षकांना आलेला असतो. त्या बौद्धिक क्षमतेवर तो विद्यार्थी आपली शैक्षणिक वाटचाल यशस्वी करीत असतो. याच वेळी शाळेतील शिक्षक पुढे हा विद्यार्थी कोण होणार, याचा अंदाज बांधत असतात. तोच अंदाज डोंबिवलीतील मानपाडा येथील विद्यानिकेतन शाळेच्या शिक्षकांनी बांधला होता. तो तंतोतंत खरा ठरविला विद्यानिकेतन शाळेच्या राज परेश शेठ या विद्यार्थ्यांने. देशपातळीवर महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या व अतिउच्चतम काठिण्य पातळी असलेल्या सनदी लेखापालच्या (सी. ए.) परीक्षेत राज याने देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे.

मुंबई, ठाणे, दिल्ली, चेन्नई, कोलकातासारख्या महानगरांच्या तुलनेत लहान असलेल्या डोंबिवलीसारख्या शहरात राहून त्याने हे यश संपादन केल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे. शालेय जीवनापासून झेप घेत असलेला राजचा यशस्वी वारू आता एका महत्त्वाच्या व यशस्वी टप्प्यावर पोहोचला आहे. राज मध्यमवर्गीय, सुस्थितीमधील कुटुंबात वाढलेला एक मुलगा. खूप हुशार म्हणून कधी हवेत जाण्याचा प्रयत्न केला नाही. व्यवसायाच्या निमित्ताने वडील परदेशात होते. आई गृहिणी. त्यामुळे संपर्कमाध्यमातून वडिलांकडून होणारे मार्गदर्शन, आईचे सतत दिशादर्शन या बळावर राजने आपली शैक्षणिक वाटचाल केली. अर्थविषयक (फायनान्स) क्षेत्रात, सनदी लेखापाल म्हणून कामगिरी करायची असा पण मनाशी केला होता. दहावी झाल्यानंतर मुंबईतील पोद्दार महाविद्यालयात वाणिज्य शाखेला त्याने प्रवेश घेतला. बारावीची परीक्षा दिल्यानंतर स्वस्थ न बसता सनदी लेखापालविषयक जे सराव अभ्यासक्रम, मार्गदर्शन असते ते घेण्यास सुरुवात केली. आपणास कठीण अशा शैक्षणिक मार्गावरून पुढे जायचे आहे, हा विचार मनाशी करून ठेवला होता. अभ्यास, घर आणि महाविद्यालय एवढेच त्याने आपले विश्व निश्चित केले होते. वाणिज्य शाखेची पदवी मिळविल्यानंतर राजने खऱ्या अर्थाने आपल्या ईप्सित ध्येयाचा एव्हरेस्ट चढण्यास सुरुवात केली. सनदी लेखापाल परीक्षेच्या टप्प्याने होणाऱ्या परीक्षा त्याने दिल्या. एका टप्प्यावर तो दहाव्या क्रमांकावर होता. आपण योग्य मार्गावर आहोत याची जाणीव त्याला होत होती. सनदी लेखापाल परीक्षेची काठिण्य पातळी अधिक असल्याने त्या प्रवाहात टिकणे महत्त्वाचे असते. ते आपल्या नाजूक शरीरयष्टीवर मात करीत राजने टिकवून ठेवले. मुलाने निश्चित केलेले ध्येय तो नक्की पुरे करील, असा विश्वास वडिलांना होता. सी.ए.च्या प्रवासात आपणास पुढे जायचे आहे. पुन्हा मागे वळून पाहण्याची गरज लागली नाही पाहिजे म्हणून राज आठ ते बारा तास अभ्यास करीत होता. अभ्यासाशी कडवी झुंज सुरू असताना दिवस-रात्रीचा हिशेब त्याला अनेक वेळा लागायचा नाही. अथक प्रयत्न व या कडव्या झुंजीनंतर देशपातळीवर महत्त्वाची असलेली सी.ए.ची परीक्षा देशभरातून पहिला क्रमांक पटकावून राजने उत्तुंग झेप घेतली आहे. यशस्वी होऊ, पण एवढय़ा उत्तुंग झेपेचे स्वप्न त्याला कधी पडले नव्हते. ते त्याच्या कठोर मेहनतीने यशस्वी करून दाखविले. देशात नवअर्थक्रांतीचे वारे वाहत आहेत. ‘वस्तू व सेवा’ करप्रणाली देशभरात लागू झाली आहे. या सगळ्या प्रवाहात नवअर्थक्रांतीमधील एक जाणता शिलेदार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावण्याचा राज शेठ याचा मानस आहे.

First Published on July 20, 2017 3:21 am

Web Title: raj sheth loksatta vyakti vedh