‘कसोटी क्रिकेट खेळू न शकलेले महानतम फिरकी गोलंदाज’ असे राजिंदर गोयल यांचे वर्णन नेहमीच केले जाई. नुकतेच वयाच्या ७७व्या वर्षी त्यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले, त्या वेळी अनेक मृत्युलेखांमध्येही हाच उल्लेख. पण गोयल यांच्या प्रदीर्घ आणि महत्त्वपूर्ण कारकीर्दीसाठी तो काहीसा अन्याय्यच ठरेल. २४ वर्षांमध्ये भारतातील स्थानिक क्रिकेट स्पर्धामध्ये १८.५८च्या सरासरीने ७५० बळी, त्यात रणजी स्पर्धेत ६३७ बळी हा विक्रम आता कोणाच्याही आवाक्यापलीकडचा आहे. राजिंदर गोयल हे डावखुरे फिरकी गोलंदाज. त्यांची कारकीर्द फुलू लागली त्या वेळी भारतीय क्रिकेट क्षितिजावर बिशनसिंग बेदी, इरापल्ली प्रसन्ना, श्रीनिवासन वेंकटराघवन आणि भागवत चंद्रशेखर यांचाही उदय झाला होता. या चौघांनाच प्राधान्याने भारतीय संघात स्थान मिळत गेल्यामुळे गोयल यांची संधी हुकली ती कायमचीच. त्यातही त्या चौकडीतील सर्वात यशस्वी आणि प्रभावशाली असे बेदी हेही डावखुरे फिरकी गोलंदाजच. त्यामुळे गोयल यांचा कसोटी प्रवेश अधिकच खडतर बनला. पण याची त्यांनी कधीही पर्वा केली नाही. ‘चांगली गोलंदाजी करत राहण्यापलीकडे काय करू शकत होतो?’ असा त्यांचा सवाल. त्यांची ही ‘चांगली गोलंदाजी’ म्हणजे निव्वळ दहशतीचा मामला. विजय मांजरेकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर अशा भिन्न वयांच्या फलंदाजांना त्यांची जरब वाटायची. पारंपरिक फिरकी गोलंदाज चेंडूला भरपूर उंची देतात. पण गोयल फारशी उंची द्यायचे नाहीत. त्यामुळे चेंडू फलंदाजांपर्यंत झटकन यायचा. इंग्लिश फिरकी गोलंदाज डेरेक अंडरवूड यांच्या काहीशी जवळ जाणारी ही शैली. या शैलीमुळे क्रीझ सोडून फलंदाजी हे पारंपरिक फिरकी गोलंदाजांविरुद्धचे हुकमी अस्त्र गोयल यांच्यापुढे वापरता यायचे नाही, अशी आठवण गावस्कर यांनी लिहून ठेवली आहे. त्यामुळे त्यांची फलंदाजी बॅकफूटवरच खेळावी लागायची. गोयल वेगामध्ये बदल करून फलंदाजांना चकवायचे. गोयल यांचे आणखी एक ठळक वैशिष्टय़ म्हणजे, सर्व प्रकारच्या खेळपट्टय़ांवर त्यांची गोलंदाजी प्रभावी ठरायची. गोयल काय किंवा आपले पद्माकर शिवलकर काय, यांना कसोटी खेळण्याची संधी मिळाली नाही. पण त्यांच्या गोलंदाजीमुळे भारतीय फलंदाज समृद्ध बनले. फिरकी गोलंदाजांचेच नव्हे, तर फिरकी गोलंदाजी प्रभावीपणे खेळून काढणाऱ्या फलंदाजांचेही नंदनवन भारत बनला यात गोयल, शिवलकर यांच्यासारख्यांचे श्रेय नि:संदेह आहेच. गोयल यांची खासियत म्हणजे त्यांनी कशाहीबाबत आणि कोणाहीविषयी कटुता बाळगली नाही. गोयल हरियाणाचे, बेदी दिल्लीचे. दोघांमध्येही अखेपर्यंत उत्तम दोस्ताना होता. ४३व्या वर्षी ते निवृत्त झाले, पण नंतरही निव्वळ खेळाच्या प्रेमापोटी विविध प्रकारे मार्गदर्शक म्हणून काम करत राहिले. स्थानिक क्रिकेट त्यांच्या परीने समृद्ध करत राहिले.