News Flash

रजनिकांत मिश्रा

लखनौ आणि मेरठ येथील ‘विशेष कृती दला’चे महानिरीक्षक म्हणून ते उत्तर प्रदेशात परत आले

रजनिकांत मिश्रा

उत्तर प्रदेश पोलिसांच्या ‘कर्तव्यदक्षते’बद्दल नव्याने वादंग उठलेले असताना, याच राज्याच्या पोलीस दलातील विविध पदे २०१३ पर्यंत सांभाळणारे भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी रजनिकांत मिश्रा यांची निवड सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) प्रमुखपदी झाली, हा निव्वळ योगायोग. मिश्रा यांनी सीमा सुरक्षा दलातील महत्त्वाच्या पदांवरही यापूर्वी काम केले आहे आणि याआधी, ३० सप्टेंबर २०१७ पासून ते सीमा सुरक्षा दलासारखेच काम करणाऱ्या ‘सशस्त्र सीमा बला’चे (एसएसबी)  प्रमुख होते. प्रामुख्याने बांगलादेश आणि नेपाळच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या त्या दलाचे संख्याबळ सुमारे ९० हजार आहे;  तर सीमा सुरक्षा दलाचे संख्याबळ आहे दोन लाख ६५ हजार! त्यामुळेच या पदाची संधी आणि त्यातील आव्हान, दोन्ही निश्चितच मोठे आहे.

रजनिकांत मिश्रा हे ‘आयपीएस’च्या १९८४ मधील तुकडीतील, उत्तर प्रदेश केडरचे अधिकारी असले तरी मूळचे ते बिहारचे. पाटणा शहरात दोन ऑगस्ट १९५९ रोजी त्यांचा जन्म झाला आणि तेथेच शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेऊन त्यांनी भूगर्भशास्त्रात (जिऑलॉजी) एमएस्सी ही पदव्युत्तर पदवी मिळविली. लखनौ, अलाहाबाद, कानपूर आणि उत्तराखंड राज्यनिर्मितीपूर्वीचे डेहराडून येथे १९९० च्या दशकात काम करताना त्यांनी पोलीस खात्यातील अन्वेषण विभाग, प्रशिक्षण विभाग येथेही अनुभव घेतला. मोरादाबाद विभागाचे उपमहानिरीक्षक म्हणून काम केल्यानंतर त्याच पदावर, त्यांना केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) कोलकाता येथे प्रतिनियुक्ती मिळाली. तेथून दिल्लीत, सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेचे सहसंचालक पदही त्यांना देण्यात आले होते. लखनौ आणि मेरठ येथील ‘विशेष कृती दला’चे महानिरीक्षक म्हणून ते उत्तर प्रदेशात परत आले, या राज्याच्या पोलीस दलातील सुरक्षा विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकही बनले. मात्र पन्नाशीनंतर आहे तिथेच बढत्या मिळवत राहण्याऐवजी २०१३ च्या एप्रिल महिन्यात ‘सीमा सुरक्षा दला’साठी त्रिपुरात काम करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले.

तेव्हापासूनची गेली पाच वर्षे ते सीमा सुरक्षा दलात विविध पदांवर होते. त्रिपुरात आणि ‘दक्षिण बंगाल सीमाभाग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विभागात महानिरीक्षक म्हणून त्यांनी काम केले; तर बढत्यांमुळे त्यांना प्रत्यक्ष सीमेऐवजी दिल्लीत यावे लागले. या दलाच्या मनुष्यबळ विभागाचे ते अतिरिक्त महासंचालक झाले. ‘सशस्त्र सीमा बल’ या दलाचे प्रमुखपद त्यांना वर्षभरापूर्वी मिळाले, पण त्यापूर्वी उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालकपदी त्यांची नेमणूक होणार असल्याची चर्चा होती. त्या वावडय़ाच ठरल्या, अन्यथा या राज्यातील घटनाक्रम निराळाही ठरला असता!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2018 3:08 am

Web Title: rajni kant misra appointed bsf chief
Next Stories
1 तुळशीदास बोरकर
2 जसदेव सिंग
3 अ‍ॅना राजम मल्होत्रा
Just Now!
X