स्थलांतरित म्हणून केरळहून ते कोल्हापुरात आले, इथल्या उद्यमनगरात कामगार म्हणून काम करू लागले आणि जाताना २५ हजार जणांना रोजगार देऊन गेले. ‘मेनन उद्योगसमूहा’चे संस्थापक राम मेनन यांचा बुधवारी (१७ जुलै) संपलेला जीवनप्रवास हा गेली सात दशके कोल्हापुरात आधुनिकता कशी नांदली-वाढली, याची साक्ष देणारादेखील आहे. त्याहीआधी राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केलेली या नगरीतील उद्योगाची गाथा महादबा मेस्त्री, वाय. पी. पोवार, एस. वाय. कुलकर्णी, केशवराव जाधव, रामभाई सोमाणी, नानासाहेब गद्रे अशा अध्यायांनी समृद्ध झाली, त्यात आता राम मेनन यांचेही पान इतिहास म्हणून नोंदले जाईल.

यशाची उंची, अपयशाने केलेला पाठलाग आणि पुन्हा उसळी घेऊन घडवलेले नवनिर्माण असा प्रवास मेनन यांनाही करावा लागला. अभियांत्रिकी कामाची आवड आणि हुशारी, हे अंगभूत गुण मात्र सदैव त्यांच्यासह राहिले. स्वयंरोजगार म्हणून सुरू केलेल्या फाउंड्री उद्योगाचा विस्तार प्रथम त्यांनी मोटारींना लागणारे पिस्टन बनवून केला. त्यातून ‘मेनन पिस्टन’ ही कंपनी उभी राहिली, वाढली. ती इतकी की, ‘मारुती मोटर’ची जुळवाजुळव सुरू होण्याआधी संजय गांधींची भेट घेण्यासाठी इंदिरा गांधी यांनी मेनन यांना निमंत्रित केले होते, असे सांगतात. ही सांगोवांगी नाही, हे पुढे मारुती मोटारींत ‘मेनन पिस्टन’च वापरले गेल्यामुळे सिद्ध झाले!

पिस्टनच्या जोडीने त्यांनी बेअिरग्ज बनवणारी कंपनी सुरू केली. ‘मेनन उद्योगसमूहा’चा आजचा पसारा मेनन अँड मेनन, मेनन बेअिरग्ज, मेनन पिस्टन रिंग.. असा आहे. अभियांत्रिकी गुणवत्तेला अंतर न देता त्यांनी व्यवसाय वाढविला. त्यापैकी ‘अ‍ॅल्कॉप’ या अमेरिकी कंपनीसह त्यांनी अलीकडेच भागीदारीत सुरू केलेला उद्योग म्हणजे ‘अ‍ॅल्कॉप मेनन’! टाटा, कमिन्स, किर्लोस्कर, सोनालीका ट्रॅक्टर, आयशर, एस्कॉर्ट, सुझुकी अशा नामांकित कंपन्या ‘मेनन’ उत्पादने खरेदी करतात. या उद्योगसमूहातील उत्पादनांपैकी ३० ते ३५ टक्के तयार माल हा २४ देशांना निर्यात होतो.

मेनन यांना माणसांची पारख होती आणि त्यांनी पारखलेल्या माणसांनीही त्यांना सहसा अंतर दिले नाही. त्यांच्या कंपन्यांमध्ये औद्योगिक कलहाचे प्रसंग अपवादाने आले. वक्तशीरपणा आणि शिस्त अंगी बाणलेले राम मेनन, चित्रपटसुद्धा फक्त शुक्रवारीच पाहात. ‘सीआयआय’सह विविध राष्ट्रीय व प्रादेशिक उद्योग-संघटनांचे पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केले, ‘केआयटी महाविद्यालय’ स्थापन करण्यावर न थांबता अन्य शैक्षणिक व सेवाभावी संस्थांशीही ते संबंधित होते.