‘एक दिन अचानक’ (१९९०) हा मृणाल सेन यांचा चित्रपट, तर त्याच वर्षीचा ‘एक डॉक्टर की मौत’ हा तपन सिन्हा दिग्दर्शित चित्रपट. याखेरीज द्विपेर नाम तिरंग (१९६३), एख्खोनि (१९७०), पिकनिक (१९७२), बनपलाशिर पदाबलि (१९७३), जे जेखाने दांडिए (१९७४), खारिज (१९८२) असे विविध दिग्दर्शकांचे बंगाली चित्रपट.. हे सगळे चित्रपट रमापद चौधुरी यांच्या कादंबऱ्यांवरून बेतलेले होते. त्यांच्या इतक्या कादंबऱ्यांवर चित्रपट कसे काय झाले? काय एवढे निराळेपण होते त्यांच्या लिखाणात?

‘मी माझ्या काळाच्या आणि मध्यमवर्गाच्या गोष्टी कादंबऱ्यांतून मांडतो’ हे रमापद यांचे उद्गार नीट समजून घेतले, तर त्यांच्या लिखाणाचे निराळेपणही कळेल. कादंबरी हा साहित्यप्रकार त्यांना मुळातून कळला होता, कादंबरी म्हणजे खूप जास्त पानांची कथा नव्हे. कादंबरीने काळाचा आणि पात्रांचा पट मांडायचा असतो, याची जाण त्यांनी ‘प्रथम प्रहर’ या १९५४ साली प्रकाशित झालेल्या, पण त्याआधीच लिहिलेल्या पहिल्या कादंबरीपासूनच दाखवली होती.  ही कादंबरी रेल्वेने घडवलेल्या सामाजिक परिवर्तनाबद्दल आहे! रमापद यांच्या घडत्या वयाशी तिचा संबंध आहे. बंगालातल्या खरगपूर शहरात १९२२ साली ते जन्मले, तेव्हापासून ते १९३९ साली मॅट्रिक पास होईपर्यंत  रेल्वे-कारखान्याने आणि नागपूर-बंगाल रेल्वेने घडवलेल्या बदलांचे ते साक्षीदार होते. ‘खरगपूर त्या काळातच ‘मिनि इंडिया’ झालं होतं. कॉस्मोपॉलिटन झालं होतं’ हा बदल आणि त्यातून येणारे ताणतणाव त्यांनी तरुण वयात टिपले. पण पुढल्या ‘बीज’ या कादंबरीपासून, मध्यमवर्गाचा विचार त्यांनी अधिक साकल्याने केला. ‘बीज’मध्ये परागंदा होणारा संशोधक-प्राध्यापक, त्याच्याविषयी प्रवादांची राळ उठवणारे लोक, त्याला शोधणारे लोक.. या साऱ्यातून सामाजिक प्रवृत्तींचा पट त्यांनी उभारला. ‘लज्जा’ (१९६० च्या दशकातील याच कादंबरीवर मृणाल सेन यांचा ‘एक दिन अचानक’ आधारित आहे), किंवा ‘खारिज’मधूनही, नायक आणि नायिका केंद्रस्थानी असले तरी परिघावरल्या पात्रांनाही निर्णायक महत्त्व देणारा कथागोफ त्यांनी विणला.

‘‘दोन मित्र. दोघेही गरीब तरुण, पण मेहनती. पुढे यापैकी एक होतो राष्ट्रपती. दुसराही करतो प्रगती; पण स्वत:चं ऐसपैस घर आणि सुखवस्तू कुटुंब असण्यापुरती. कमावत्या काळात दोघे दुरावतात. उतारवयात राष्ट्रपतीपद मिळाल्यावर, पहिल्याला येते दुसऱ्याची आठवण. तो जातो मित्राच्या घरी , स्वत:ची खासगी पण लांबलचक मोटारगाडी घेऊन.. मित्र कुठेय? सकाळपासून बाहेर पडलाय, घरचेही वाट पाहतात.. गाडी जाते निघून. मग तासाभरानं हा परत येतो घरी. ‘रस्त्यावर फुलांचा सडा पडला होता.. वेचत वेचत गेलो पुढं, म्हणून झाला उशीर..’ म्हणत नेहमीसारखं हसतो. घरचे सर्द.’’ यासारख्या नाटय़मय प्रसंगांतून (कादंबरी : छाद), साध्याही विषयांतील मोठा आशय त्यांनी दाखवून दिला.पण बहुतेक कादंबऱ्या या एक-दोघा पात्रांवर केंद्रित नव्हत्याच. अनेक पात्रे, त्यांची आयुष्ये एकेका कादंबरीतून चौधुरींनी मांडली. ‘बाडी बदले जाए’ या अशाच बहुपेडी कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार (१९८८) मिळाला. हा चौधुरींना मिळालेला राष्ट्रीय स्तरावरचा एकमेव पुरस्कार. पश्चिम बंगालमधील सरकारे बदलली, तरी राज्यस्तरीय महत्त्वाचे तीन पुरस्कार त्यांना मिळाले. स्वत्व जपण्याच्या सवयीमुळे कदाचित आणखी पुरस्कार मिळाले नाहीत. नव्वदीपर्यंत कणखर राहूनच चौधुरी निवर्तले.