‘आस्थाएं शाश्वत नही होती’ यासारखे अस्तित्ववादी सत्य सहजपणे सांगणाऱ्या, ‘सीतायन’ लिहीन किंवा द्रौपदीचे मंदिर बांधेन अशी इच्छा कवितेत बाळगणाऱ्या रमणिका गुप्ता यांची निधनवार्ता २६ मार्च रोजी आली. त्या कवयित्री होत्या, धीटपणे- स्त्रीने न सांगण्याचे अनुभवही सांगणाऱ्या आत्मचरित्रकर्त्यां होत्या, कथा-कादंबरीकार होत्या तसेच ‘युद्धरत आम आदमी’ या नियतकालिकाद्वारे अनेकांना लिहिते करणाऱ्या संपादिकाही होत्या. एके काळी आमदारसुद्धा होत्या, आधी काँग्रेसच्या आणि आणीबाणीच्या काळापासून लोकदलाच्या सदस्य होत्या.. त्याहीआधी विचाराने कम्युनिस्ट होत्या! स्त्रीवादी तर होत्याच, पण दलित- आदिवासी- सर्वहारा यांचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार कमीच का मानला जातो, या प्रश्नाशी त्यांचा स्त्रीवाद जोडला गेला होता. जन्म १९३० चा, म्हणजे स्वातंत्र्याच्या ऐन उष:काली वय १७. मूळच्या पंजाबी, बेदी घराण्यातल्या. फाळणीनंतर पतियाळाच्या महाराणींनी ‘हरवलेल्या मुस्लीम मुलींचा ठावठिकाणा शोधा’ असे आवाहन करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत, ‘‘अहो, ज्यांना तुम्ही आवाहन करताय ना, त्याच या फौजी आणि पोलीसवाल्यांनीही घरात डांबलंय त्या मुलींना’’ असा वाग्बाण रमणिका यांनी सोडला आणि बैठकच बरखास्त झाली! पण लगेच, ‘संस्कार आणि शिस्ती’साठी रमणिकांची रवानगी आजोळी झाली. कुणाचीच पत्नी वा आई नसलेल्या स्त्रीविषयीच्या ‘मौसी’ कादंबरीची प्रेरणा काही प्रमाणात आजोळच्या वास्तव्यात भेटलेल्या अविवाहित मावशींमध्ये शोधता येते. स्वत: रमणिका यांनी सरकारी अधिकाऱ्याशी लग्न, दोन मुली-एक मुलगा.. असा संसार केला. पण १९६० ते १९८० च्या दशकांत काळाच्या पुढे असणाऱ्या अनेक आद्य स्त्रीवादींना विभक्तपणा पत्करावा लागे, तसे त्यांचेही झाले. धनबादहून पुढे, कोळसा खाणींतल्या कामगारांसोबतचे त्यांचे काम या सर्व काळात सुरू राहिले. त्या दिल्लीस आल्या, बिहार- छोटा नागपूर टापूतील आदिवासींशी त्यांचा संपर्क राहिला. पुढे झारखंड या नव्या राज्यानेही रमणिका यांना ‘झारखंडी साहित्यकार’ मानावे, इतका! दिल्ली हिंदी अकादमी वा उत्तर प्रदेश साहित्य अकादमीखेरीज ‘मुख्य धारे’तला मोठा पुरस्कार जरी त्यांना मिळाला नाही, तरी दलित वा आदिवासी साहित्यासाठी दिले जाणारे अनेकानेक पुरस्कार त्यांना लाभले.

एरवी ‘पैसेवाल्या कार्यकर्त्यां’ म्हणून सहज नाकारले जावे, असा रमणिका यांचा भूतकाळ; पण मानवाधिकारांवरील अविचल निष्ठा, राज्यघटनेवरील निस्सीम प्रेमामुळे आणि भयमुक्त होऊन संघर्ष करण्याच्या धडाडीमुळे त्यांना समाजाकडूनही साथ मिळाली. कृतार्थपणे ‘रमणिका फाऊंडेशन’ स्थापून, त्याद्वारे आदिवासी/ दलित/ स्त्रीवादी लेखकांना पुरस्कार त्यांनी सुरू केला. तो सुरू राहीलच, आणि ‘आपहुदरी’ ही त्यांची आत्मकथा तर कुठल्याही काळातील मुलींना ‘स्व’प्रेरणा देत राहील.