12 July 2020

News Flash

रौला खलाफ

पश्चिम आशियातील लेबनॉन या देशाच्या राजधानीचे शहर असलेल्या बैरुतमध्ये जन्मलेल्या रौला यांचे बालपण तेथील यादवी युद्धाच्या छायेत गेले.

फिकट अबोली रंगाच्या कागदावरील छपाई, जगभरच्या आर्थिक-राजकीय घडामोडींची विश्लेषणे आणि ओसंडून वाहणारी आर्थिक सांख्यिकी अशी ओळख असलेले ‘फायनान्शियल टाइम्स’ अर्थात ‘एफटी’ हे मूळचे लंडनचे आणि आता जपानी कंपनीच्या मालकीचे वृत्तपत्र जगभरच्या धोरणकर्त्यांना वाचावेच लागते. गॉर्डन न्यूटन, जॉफ्री ओवेन, रिचर्ड लँबर्ट, अँड्रय़ू गोवर्स आणि गेले दीडएक दशक लिओनेल बार्बर अशा तगडय़ा पत्रकारांनी वाहिलेली ‘एफटी’ची धुरा आता पत्रकार रौला खलाफ यांच्याकडे सोपवली जाणार, अशी बातमी अधिकृतपणे मंगळवारी आली. विशेष म्हणजे, सव्वाशेहून अधिक वर्षांपासून प्रसिद्ध होणाऱ्या या वृत्तपत्राच्या रौला खलाफ या पहिल्या महिला संपादक ठरल्या आहेत.

पश्चिम आशियातील लेबनॉन या देशाच्या राजधानीचे शहर असलेल्या बैरुतमध्ये जन्मलेल्या रौला यांचे बालपण तेथील यादवी युद्धाच्या छायेत गेले. पुढे न्यू यॉर्कच्या सायराक्यूज विद्यापीठातून पदवी आणि तिथल्याच कोलंबिया विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर रौला यांनी थेट पत्रकारितेचा मार्ग धरला. सुरुवातीला फोब्र्ज या पाक्षिकातून रौला यांचे लेखन प्रसिद्ध होऊ लागले, अन् चारएक वर्षे त्यांनी या पाक्षिकात पूर्ण वेळ कामही केले. त्यानंतर मात्र त्या फायनान्शियल टाइम्समध्ये दाखल झाल्या, त्या आजतागायत. १९९५ पासून आजवरची २४ वर्षे त्या एफटीमध्ये कार्यरत असून, आधी उत्तर आफ्रिका व नंतर मध्य-पूर्वेतील देश येथील विशेष प्रतिनिधी म्हणून त्यांनी सुरुवातीची काही वर्षे काम पाहिले. मध्य-पूर्वेतील राजकीय-आर्थिक घडामोडी हा रौला यांच्या विशेष अभ्यासाचा विषय. त्यांच्या वृत्तपत्रीय लिखाणाचा बराचसा भाग याच विषयाने व्यापला आहे. ‘अरब स्प्रिंग’च्या काळातील घडामोडींचे रौला यांनी केलेले वार्ताकन वाचले की या भागातील राजकारणाची त्यांची जाण स्पष्टपणे दिसते. त्यामुळेच पाचेक वर्षांपूर्वी रौला यांची एफटीच्या मध्य-पूर्वविषयक विभागाच्या संपादकपदी नेमणूक झाली होती. अलीकडे त्या एफटीच्या आंतरराष्ट्रीय वृत्तसंपादक म्हणून काम पाहत होत्या. आता तर जॉन थॉर्नहिल, अ‍ॅलेक रसेल अशा एफटीमधीलच जुन्याजाणत्या सहकाऱ्यांना मागे टाकत रौला यांनी संपादक पदाला गवसणी घातली आहे.

आर्थिक आणि राजकीय उदारमतवादाचा पुरस्कार करणाऱ्या फायनान्शियल टाइम्ससमोर नव्वदच्या दशकाअंती नव्या तंत्रमाध्यमांचे आव्हान उभे राहिले होते. त्याला यशस्वीपणे तोंड देत एफटीच्या इंटरनेट आवृत्तीला आकार देण्याचे काम मावळते संपादक लिओनेल बार्बर यांनी केले. नव्या डिजिटल माध्यमांच्या स्पर्धेत आपल्या मूळ रूपासह तगून राहण्याचे आव्हान त्यांनी लीलया पेलले होते. आता ती जबाबदारी पेलत एफटीला बदलत्या काळाला सुसंगत स्वरूप देण्याचे आव्हान रौला खलाफ यांच्यावर असणार आहे. त्या ती कशी पार पाडणार, याचे उत्तर येणारा काळच देईल. पण तोवर खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय असलेल्या एका वृत्तपत्राच्या संपादकपदी महिला पत्रकाराचे येणे, ही बातमीही अनेकांसाठी निश्चितच आनंददायक असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2019 12:48 am

Web Title: raula khalaf profile akp 94
Next Stories
1 नारायण रेड्डी
2 प्रा. मोहन आपटे
3 डॉ. सुधीर रसाळ
Just Now!
X