18 January 2018

News Flash

रविचंद्रन आश्विन

चार वर्षांपूर्वी, २०११च्या विश्वचषकात न खेळताही अश्विनच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती.

लोकसत्ता टीम | Updated: February 19, 2017 7:49 AM

रविचंद्रन आश्विन 

सर्वात कमी कसोटी सामन्यांमध्ये २५० बळी मिळवण्याचा पराक्रम केल्याबद्दल भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्याच्या घडीला खेळत असणारा सर्वोत्तम फिरकीपटू असेही त्याचे वर्णन केले जाते आहे. अश्विन ज्या पद्धतीने बळी मिळवीत होता, ते पाहता त्याचा हा पराक्रम लवकर होईल, असे अनेकांना वाटले होतेच. अखेर बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीत त्याने या विक्रमाला गवसणी घातली.

चार वर्षांपूर्वी, २०११च्या विश्वचषकात न खेळताही अश्विनच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. कारण संघातल्या अनुभवी हरभजन सिंगकडून चांगली कामगिरी होत नव्हती. कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सारे ज्ञात होतेच. त्यामुळे योग्य वेळ पाहून त्याने अश्विनला संघात स्थान दिले. त्यानंतर अश्विनने बळी मिळवण्याचा सपाटा लावला. अश्विन खरा तर ऑफ स्पिनर. पण काही दिवसांपासून तो चेंडू टाकतो ते मधल्या आणि डाव्या यष्टीच्या बाहेर. जे एके काळी करून हरभजन संघाबाहेर गेला, तेच अश्विनकडून बऱ्याचदा पाहायला मिळत आहे. कॅरम बॉल टाकण्याची त्याची क्षमता आहे. पण काही वेळा ‘सीम’वर सरळ हात ठेवून वेगवान गोलंदाजांसारखा चेंडू टाकण्याचा मोह त्याला का होतो, हे कळत नाही. भारतामध्ये अश्विनच्या गोलंदाजीला तोड नाही, असे म्हटले जाते. पण जी खेळपट्टी फिरकीला मदत करते, तिथेच त्याचे चेंडू वळतात आणि बळी मिळतात, हेदेखील पाहायला मिळते. कारण दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या फलंदाजांना त्याने कसोटी मालिकेत चांगलेच नाचवले. पण बांगलादेशसारख्या अननुभवी संघापुढे त्याची गोलंदाजी लौकिकाला साजेशी होऊ शकली नाही.

आयपीएलमधून अश्विन खऱ्या अर्थाने नावारूपाला आला. धोनीने त्याच्यावर संस्कार केले. आंतरराष्ट्रीय दर्जावर आणले आणि एकदिवसीय व ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये त्याने कधीही निराश केले नाही. एक अतिशय शांत आणि गुणी खेळाडू, अशी अश्विनची प्रतिमा. पण विराट कोहली कर्णधार झाल्यापासून त्याच्यामध्ये आक्रमकपणा दिसायला लागला. एका स्थानिक सामन्यातील रौद्ररूप काही जणांनी पाहिले. पण मुंबईतील इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात अश्विन जेम्स अँडरसनवर चाल करून गेला, तेव्हा हा खरेच का तो शांत अश्विन, असा प्रश्न साऱ्यांना पडला होता.

अश्विनने जलद अडीचशे बळींचा टप्पा गाठला, पण तरीही त्याला महान फिरकीपटूचा दर्जा मिळालेला नाही. त्याची कारणेही तशीच आहेत. फिरकीपटूने चेंडूला उंची देऊन फलंदाजाला मोहात पाडायचे असते, त्याच्याउलट नेमके अश्विनकडून होताना दिसते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतातील आखाडा खेळपट्टय़ांवर त्याचे चेंडू वळतात, पण परदेशात-  विशेषत: इंग्लंड-न्यूझीलंडसारख्या देशांमध्ये त्याची खरी कसोटी ठरेल.

अश्विनने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले आहे तेव्हापासून कोणत्याही गोलंदाजाला जलद अडीचशे बळी मिळवण्याचा टप्पा गाठता आलेला नाही. अश्विन सुरुवातीला फक्त एक गोलंदाज वाटत असला तरी गेल्या काही सामन्यांमध्ये दमदार फलंदाजी करीत तो अष्टपैलू खेळाडूंच्या पंक्तीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. २५० बळींचा टप्पा गाठल्यावर त्याने लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे यापुढे त्याच्यावर जास्त जबाबदारी असेल, हेदेखील खरे.

First Published on February 14, 2017 12:46 am

Web Title: ravichandran ashwin 5
  1. No Comments.