24 April 2019

News Flash

रेमंड चाउ

एक पोरगेला तरुण, लवचीक अंगाचा, ‘एन्टर द ड्रॅगन’मध्ये हाणामारीच्या दृश्यांत दिसला होता.

रेमंड चाउ

ब्रूस ली, जॅकी चॅन हे ‘कराटेपट’ किंवा ‘कुंग-फू चित्रपट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चित्रपटांचे सुपरिचित नायक. या दोघाही नायकांना पडद्यावर आणणारे रेमण्ड चाउ! तरुणपणी स्वत:देखील कराटे शिकलेले आणि व्यवसायाने चित्रपट-निर्माते असलेले रेमण्ड चाउ तसे प्रसिद्धीविन्मुखच राहिले होते. ३ नोव्हेंबरच्या शनिवारी त्यांची निधनवार्ता आली. नुकतीच नव्वदी साजरी केलेले रेमण्ड चाउ जन्माने हाँगकाँगचे, पण १९४० च्या दशकातील या व्यापारी बेटावर शिक्षणाच्या पुरेशा सोयी नाहीत, म्हणून शांघायच्या विद्यापीठात गेले. तेथे पत्रकारिता शिकले. एक क्रीडाविषयक नियतकालिकही त्यांनी चालवून पाहिले; पण माओच्या चीनमध्ये आपल्यासारख्या प्रयोगशील लोकांना स्थान नसल्याचे ओळखून पुन्हा हाँगकाँगला आले. येथे ‘शॉ ब्रदर्स’ या स्थानिक माध्यम संस्थेसाठी प्रसिद्धी विभागात ते काम करू लागले, तेव्हा शॉ स्टुडिओतर्फे चित्रपटही बनवले जाऊ लागले होते. त्या चित्रपटांच्या दर्जावर बोचरी टीका करणाऱ्या रेमण्ड यांनाच १९५७ मध्ये याच कंपनीत, चित्रपट निर्मिती विभागाचे प्रमुखपद मिळाले. कमीत कमी पैशात तुलनेने बरे चित्रपट त्यांनी दिले, पण पुढे स्वत:च्या ‘गोल्डन हार्वेस्ट’ चित्रपटसंस्थेची स्थापना केल्यानंतर खरोखरच त्यांची ‘सोन्याची सुगी’ सुरू झाली!

काय केले या ‘गोल्डन हार्वेस्ट’ने? एका चित्रवाणी कार्यक्रमात ब्रूस ली या तरुणाला पाहताच त्याचा थांगपत्ता काढून त्याला रेमण्ड यांनी गाठले. पहिल्याच बैठकीत साध्या कागदावर त्याच्याशी तीन चित्रपटांचा करार केला! बिग बॉस (फिस्ट्स ऑफ फ्यूरी) हा चित्रपट १९७० सालचा, अवघ्या ५० हजार अमेरिकी डॉलरमध्ये तयार झालेला.. त्याने क्रांतीच घडवली. एवढी की, हॉलीवूडवाले दारी आले.. हाँगकाँगच्या इटुकल्या सिनेसृष्टीत प्रथमच हॉलीवूडची भागीदारी झाली. ‘वॉर्नर ब्रदर्स’सह रेमण्ड-ब्रूस ली यांचा ‘एन्टर द ड्रॅगन’ हा भव्य, खर्चीक चित्रपट आला. पुढे ‘वे ऑफ द ड्रॅगन’ हा तिसरा चित्रपटही आला.. पण तो झळकण्याच्या अवघा आठवडाभर आधी, ब्रूस लीचा मृत्यू झाला.

एक पोरगेला तरुण, लवचीक अंगाचा, ‘एन्टर द ड्रॅगन’मध्ये हाणामारीच्या दृश्यांत दिसला होता. स्टंट करून सध्या बरे पैसे कमावत होता. त्याला रेमण्ड यांनी ब्रूस लीनंतर नायक केले.. हा जॅकी चॅन! त्याहीनंतर ‘टीनएज म्यूटंट निन्जा टर्टल्स’ या सचेतपटाचे ‘खऱ्या’ चित्रपटात रूपांतर करण्याचे आव्हान रेमण्ड यांनीच पेलले होते! त्यांना ‘ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर’खेरीज पाश्चात्त्य पुरस्कार मिळालेले नसले, तरी २०११ चा ‘एशियन फिल्म अ‍ॅवॉर्ड – कारकीर्द गौरव’ मिळाला होता.

First Published on November 6, 2018 3:55 am

Web Title: raymond chow profile