सत्तरच्या दशकात छबिलदास रंगभूमीवरील प्रायोगिक नाटय़चळवळ आणि समांतर चित्रपटांतील प्रयोगशील कलावंत, ‘अभिव्यक्ती’ नाटय़संस्थेची निर्माती व दिग्दर्शक, तसेच संस्कृत रंगभूमीवरही तितक्याच आत्मविश्वासाने वावरणाऱ्या रंगकर्मी, ‘युवक बिरादरी’ या देशभरातील तरुणांच्या एकात्मतेसाठी कार्य करणाऱ्या सांस्कृतिक संस्थेच्या एक संस्थापक, किरण नगरकरांच्या कादंबऱ्यांच्या सशक्त अनुवादिका, मुंबई मराठी साहित्य संघाच्या उपक्रमांत नवनव्या कल्पनांचे स्वागत करून त्या मूर्त स्वरूपात आणण्यासाठी सातत्याने धडपडणाऱ्या रेखा सबनीस यांचे जाणे हे एका निखळ प्रयोगधर्मी कलावंताचा अपमृत्यू होय. निधनसमयी त्यांचे शारीरिक वय जरी ७४ वर्षांचे असले, तरी त्यांचे मानसिक वय कायम तरुणाईचेच राहिले.

गर्भश्रीमंत घरात जन्माला आलेल्या रेखा सबनीस यांना कलेला कधीही पोटार्थी राबवावे लागले नाही. त्यांनी कलाक्षेत्रात कायम ‘स्वान्त सुखाय’ मुशाफिरी केली. त्यांच्या घरी साहित्य व कला क्षेत्रातील मंडळींचा सतत राबता असे. त्यामुळे काव्य/नाटय़वाचन, वैचारिक चर्चा, वादविवादांच्या सन्निध्यातच त्यांची जडणघडण झाली. राजा रविवर्मासारख्या चित्रकारांची चित्रे आणि प्राचीन कलाकुसरीच्या वस्तूंनी सुशोभित प्रशस्त घरात आयुष्य व्यतीत केलेल्या रेखा सबनीसांवर कळत-नकळत कलाजाणिवांचे संस्कार आपसूक न घडते तरच नवल. संस्कृत आणि इंग्रजीवरील प्रभुत्वामुळे प्राचीन व अर्वाचीन रंगभूमीशी त्यांचा परिचय असणे स्वाभाविक होते. त्यामुळे एकीकडे प्राचीन रंगभूमीशी नाळ जोडलेली असतानाच आधुनिक पाश्चात्त्य रंगभूमीही त्यांना अस्पर्श नव्हती. या दोन्ही रंगभूमींवर त्यांचा लीलया वावर होता. व्यावसायिक रंगभूमीला मात्र त्यांनी हेतुत: दूरच ठेवले.

सत्यदेव दुबे, किरण नगरकर, महेश एलकुंचवार यांच्यासारख्या बुद्धिवादी, सर्जनशील व्यक्तींचे मैत्र लाभलेल्या रेखा सबनीस यांच्या कलाजाणिवा त्यामुळे अधिकच समृद्ध झाल्या. किरण नगरकरांच्या ‘रावण आणि एडी’ आणि ‘प्रतिस्पर्धी’ (‘ककोल्ड’) या कादंबऱ्यांचे त्यांनी केलेले अनुवाद हे निव्वळ भाषांतरापलीकडे जात स्वतंत्र अनुसर्जनाचा प्रत्ययकारी अनुभव देतात, ते यामुळेच.

अलीकडच्या काळात अनेक कारणांनी अवकळा आलेल्या साहित्य संघात स्व. दामू केंकरे प्रायोगिक नाटय़महोत्सव भरविण्याकामी पुढाकार, तसेच  नव्या रक्ताच्या तरुणांना  आधुनिक रंगशैलीचे प्रशिक्षण देणारा उपक्रम राबविण्याकरता रेखा सबनीस यांनीच आपले वजन खर्ची घातले होते. वाढत्या वयाचा त्यांच्या सर्जक वृत्तीवर कधीच परिणाम झाला नाही, याचेच हे द्योतक. कर्करोगाशीही त्या आपल्या उपजत विजिगीषु वृत्तीने लढल्या. परंतु अखेरीस त्याने त्यांच्यावर मात केली.