डॉ. मुबाशिर हसन यांची निधनवार्ता गत शनिवारी पाकिस्तानातून आली आणि भारत-पाकिस्तान संबंध शांततापूर्ण राहावेत यासाठी सीमारेषेच्या दोन्ही बाजूंस प्रयत्न करणाऱ्या शांतताप्रेमींचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त झाली. गेली पंचवीसएक वर्षे डॉ. हसन हे ‘पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अ‍ॅण्ड डेमोक्रसी’ या नागरी गटात सक्रिय होते. वयाच्या ९८व्या वर्षी अखेरचा श्वास घेईपर्यंत डॉ. हसन यांच्याकडून मिळणारा अनुभवी, शहाणिवेचा सल्ला पीपल्स फोरमच्या कार्यकर्त्यांना कामाची दिशा दाखवणारा ठरत होता.

डॉ. हसन यांचा जन्म पानिपतातला. फाळणीदरम्यान त्यांचे कुटुंब लाहोरला स्थायिक झाले. तिथल्या पंजाब विद्यापीठात स्थापत्य अभियांत्रिकीतली पदवी घेऊन ते अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी गेले. कोलंबिया विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवून परतलेल्या डॉ. हसन यांनी काही काळ स्थापत्य अभियांत्रिकी आणि भौतिकशास्त्राचे अध्यापनही केले. मात्र, १९६५च्या भारत-पाक युद्धानंतर त्यांनी लिहिलेल्या ‘ए डिक्लेरेशन ऑफ युनिटी ऑफ पीपल’ या जाहीरनाम्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. ‘तंत्रज्ञाननिष्ठ लोकशाही समाजवादा’ची मांडणी त्यांनी त्यात केली होती. त्या संकल्पनेने डॉ. झुल्फिकार अली भुत्तोही प्रभावित झाले. भुत्तोंनी साद घातल्यानंतर डॉ. हसन यांनी अध्यापनाचे क्षेत्र सोडले आणि राजकीय चळवळीत प्रवेश केला. भुत्तोंच्या नेतृत्वाखाली १९६७ साली स्थापन झालेल्या ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ची स्थापना डॉ. हसन यांच्या घरीच झाली होती. डाव्या तोंडवळ्याचा हा पक्ष तळागाळात पोहोचवण्यात डॉ. हसन यांचाही मोलाचा वाटा होता. पुढे १९७१च्या युद्धानंतर भुत्तोंकडे पाकिस्तानची सूत्रे आली आणि त्यांच्या मंत्रिमंडळात डॉ. हसन वित्तमंत्री झाले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच १९७२ मध्ये पाकिस्तानात स्वतंत्र विज्ञान मंत्रालयाची निर्मिती झाली. आता ‘खान रिसर्च लॅबोरेटरी’ म्हणून ओळखली जाणारी आणि वादग्रस्त ठरलेली पाकिस्तानची आण्विक प्रक्रिया संस्था स्थापण्यातही डॉ. हसन यांनी पुढाकार घेतला होता. पुढे झिया उल हकच्या राजवटीत सात वर्षे तुरुंगवास भोगून १९८४ मध्ये त्यांची सुटका झाली. त्यानंतर सक्रिय राजकारणातून त्यांनी निवृत्तीच स्वीकारली. १९८८ मध्ये बेनझीर भुत्तो यांनी आपल्या मंत्रिमंडळात येण्याचा आग्रह त्यांना केला, पण बेनझीर सरकारच्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणामुळे ते त्यात सामील झाले नाहीत. पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगात त्यांनी काम केले, अध्यापन केले, ‘द मिराज ऑफ पॉवर’सारखी पुस्तके लिहिली आणि १९९४ साली स्थापन झालेल्या ‘पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अ‍ॅण्ड डेमोक्रसी’तर्फे उपखंडातील शांततेसाठी अखेपर्यंत कार्यरत राहिले.