29 May 2020

News Flash

षडाक्षरी शेट्टर

केंद्रीय साहित्य अकादमीचा भाषा सन्मान, कर्नाटक व केंद्र सरकारचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते.

इतिहासकाराच्या अंगी जो व्यासंग व संशोधनाचा पिंड असावा लागतो तो कर्नाटकचे प्रा. षडाक्षरी शेट्टर यांच्यात पूर्णत्वाने होता. त्यांच्या निधनाने जगभरात नावाजलेल्या इतिहासकाराला आपण मुकलो आहोत. त्यांची ओळख ही केवळ इतिहासकार एवढीच नव्हती तर ते पुरातत्त्वशास्त्रज्ञ, भाषाविद्वानही होते. त्यांचे संशोधन बहुआयामी होते. इतिहासकार म्हणून काम करताना त्यांनी पुरालेखविद्येत (एपिग्राफी) कुशलता मिळवली होती, त्यामुळे इतिहासातील अनेक हरवलेले दुवे त्यांना जोडता आले. अनेक भाषांचे ज्ञान असल्याने ते प्राचीन साहित्याचा अर्थ लावू शकत होते. भाषाशास्त्र व मानववंशशास्त्र हेही त्यांच्या अभ्यासाचे विषय. कन्नड भाषा व धर्म यांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांचा जन्म कर्नाटकातील बळ्ळारी जिल्ह्य़ातील हम्पसागरचा. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण म्हैसुरूत व नंतरचे धारवाडला झाले. ते उच्चशिक्षणासाठी केम्ब्रिज विद्यापीठात गेले. तेथे पीएच.डी. मिळवून त्यांनी व्यासंग कायम ठेवला. कन्नड व इंग्रजी भाषेत त्यांच्या नावावर एकूण ३० शोधनिबंध आहेत. ‘सल्लेखना व्रत’या जैन धर्मगुरूंमधील व्रताबाबतचा त्यांचा डॉक्टरेटचा शोधनिबंध विशेष गाजला होता. सल्लेखना व्रत ही मृत्युसंस्काराची जैन धर्मातील एक रीत. कन्नड भाषेतील प्राचीन पुरालेखांचा संग्रह त्यांनी केला व त्यांचे वैज्ञानिक पद्धतीने जतन केले. शेट्टर यांनी त्यांच्या इतिहास संशोधनात असे म्हटले होते की, कन्नड भाषा व संस्कृतीत पायाभूत मानला जाणारा कविराजमार्ग हा ग्रंथ आतापर्यंत समजला जात होता, त्यापेक्षाही जुना असून त्यात आपल्याला द्रविडकाळाच्या पाऊलखुणा सापडतात. भारतीय विशेषकरून कर्नाटकी इतिहासावर त्यांची हुकमत होती. कन्नड इतिहासातील अनेक महत्त्वाच्या नोंदी त्यांना तोंडपाठ होत्या. शेट्टर यांनी अनेक नामवंत संस्थांतून काम केले. भारतीय इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. धारवाड येथील भारतीय कलाइतिहास संस्थेचे ते संचालक होते. केम्ब्रिज, हार्वर्ड, हायडलबर्ग, लेडन व मॉस्को या नामवंत विद्यापीठांतून त्यांनी अभ्यागत प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे काम केले. केंद्रीय साहित्य अकादमीचा भाषा सन्मान, कर्नाटक व केंद्र सरकारचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. कन्नड भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांच्या संशोधनाचा बराच उपयोग झाला होता. इतिहास संशोधनातील शाम बा जोशी पुरस्कार त्यांना मिळाला होता. वयाच्या ऐंशीव्या वर्षीही ते कार्यरत होते. अलीकडे, ८५व्या अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलनात त्यांनी इतिहास संशोधन या विषयावर व्याख्यानही दिले. श्रवणबेळगोळ, हम्पी, सोमनाथपुरा या पुरातत्त्व स्थळांच्या संशोधनाखेरीज जालियनवाला बाग नरसंहार, फाळणीच्या जखमा याही विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली. इतिहासाचा नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न घेणारा एक जाणता इतिहासकार आपण त्यांच्या निधनाने गमावला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2020 2:28 am

Web Title: renowned historian shadakshari settar profile zws 70
Next Stories
1 जोगिंदर सिंग सैनी
2 फ्रीमन डायसन
3 जॅक वेल्श
Just Now!
X