21 September 2020

News Flash

अमृतलाल वेगड

अमृतलाल वेगड यांनी जन्मभूमी ते पितृभूमी असा प्रवासही परिक्रमेच्या निमित्ताने केला

अमृतलाल वेगड

‘अमृतस्य नर्मदा’, ‘तीरे-तीरे नर्मदा’, ‘नर्मदा तुम कितनी सुंदर हो’ तसेच ‘सौंदर्य की नदी नर्मदा’ ही त्यांची चार पुस्तके, एकाच नदीबद्दल आहेत. या नर्मदेची परिक्रमा त्यांनी दोनदा केली : पहिली वयाच्या पन्नासाव्या वर्षी, तर दुसरी पंचाहत्तरी गाठल्यावर! याखेरीज अन्य पुस्तकेही त्यांनी लिहिली, चित्रे काढली.. नव्वदीपर्यंतचे कृतार्थ, कलामय जीवन जगूनच त्यांनी गेल्या शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला.

अमृतलाल वेगड हे ‘नर्मदापुत्र’ म्हणूनच प्रख्यात होते. लेखक म्हणून त्यांना दोनदा – हिंदी आणि गुजराती या दोन भाषांसाठी- साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. महापंडित राहुल सांस्कृत्यायन पुरस्कारही लेखक म्हणूनच त्यांनी स्वीकारला होता; पण त्यांचे ‘नर्मदापुत्र’ असणे, लेखकपणावरही मात करणारे होते. एकाच नदीवर असे प्रेम करणारे साहित्यिक-चित्रकार त्यांच्याआधीही होऊन गेले आहेत. वॉल्डनकाठचा थोरो आहे, आनंदयात्री रवीन्द्रनाथ ठाकूर आणि त्यांची (आता बांगलादेशात गेलेली) ‘पद्मा’ नदी आहे.. यापैकी रवीन्द्रनाथांच्या ‘शांतिनिकेतन’मध्ये ते शिकले. त्या वेळी नंदलाल बोस तिथे होते. राष्ट्राची सांस्कृतिक उभारणी करण्याचे काम महत्त्वाचे आहे, हे या बोस यांनी जाणले होते. त्यासाठी लोकसंस्कृतीच्या खुणा महत्त्वाच्या मानल्या होत्या आणि निसर्गाशी नाते अपरिहार्य असल्याची खूणगाठ बांधली होती. अमृतलाल यांनी नंदलाल बोस यांच्याकडून संस्कार घेतला, तो निसर्गाशी नाते जोडण्याचा.

जबलपुरात अमृतलाल यांचे वडील कामानिमित्त येऊन राहिले. मूळचे कच्छचे हे वेगड कुटुंब तत्कालीन मध्य प्रांतात स्थिरावले. त्यामुळे अमृतलाल यांच्यावर बालपणापासूनच गुजराती आणि हिंदी या दोन्ही भाषांचे संस्कार झाले होते. आजचा मध्य प्रदेश आणि आजचे गुजरात ही दोन्ही राज्ये नर्मदेचा जल-आशीर्वाद लाभलेली. नर्मदा मध्य प्रदेशात अमरकंटक येथून सुरू होते आणि गुजरातेत भडोच येथे तिच्या खाडय़ा होतात. अमृतलाल वेगड यांनी जन्मभूमी ते पितृभूमी असा प्रवासही परिक्रमेच्या निमित्ताने केला, त्यातून सांस्कृतिक संचिताची झळाळी दोन्ही राज्यांत थोडय़ाफार फरकाने सारखीच आहे हेही त्यांना जाणवले आणि यातून ‘थोडूं सोनूं, थोडूं रूपुं’ हे लोककथांचे पुस्तक सिद्ध झाले.

नर्मदेवर निस्सीम प्रेम करणारे, लोककथांचे संकलन करणारे अमृतलाल नर्मदाकाठच्या आदिवासी जमातींनी महाप्रचंड सरदार सरोवर- इंदिरासागर प्रकल्पाविरुद्ध दिलेल्या लढय़ापासून मात्र अलिप्त राहिले. ‘नर्मदा समग्र ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेचे ते विश्वस्त आणि अध्यक्ष होते; पण गेली काही वर्षे त्यांचे पद नामधारीच राहून, भाजप प्रदेश सरचिटणीसांच्या हाती कारभार गेला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 1:04 am

Web Title: renowned writer amritlal vegad profile
Next Stories
1 माधवराव भिडे
2 डॉ. अरविड कार्लसन
3 मकेना ओनजेरिका
Just Now!
X