निवृत्त जनरल जोगिंदर जसवंत सिंग हे देशाचे पहिले शीख लष्करप्रमुख. अर्थात, त्यांनी स्वत:ला कधी तसे म्हणवून घेतले नाही. उलट, लष्करप्रमुख हे पद ते धर्मनिरपेक्षच असल्याचे त्यांचे सांगणे असते. १९९१ मध्ये काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया भरात होत्या, त्या आव्हानात्मक काळात त्यांनी लष्करप्रमुखपदावर काम केले. त्यांना यापूर्वी भारतात अनेक मानसन्मान मिळाले आहेत पण आता फ्रान्सचा ‘ऑफिसर ऑफ द लिजन ऑनर हा फ्रान्स’चा मोठा नागरी सन्मान मिळाला आहे. फ्रान्स व त्यांचे नाते वेगळे आहे त्यांचा मुलगा तेथे एका पालिकेत आयुक्त आहे. भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण व भारत-फ्रान्स यांच्या लष्करांचे सहकार्य वाढवण्यातील भूमिका यासाठी त्यांना हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला जात आहे. फ्रान्सच्या लष्करी दलांच्या संचलनात सलामी स्वीकारण्याचा मानही त्यांना मिळाला होता. त्यांच्या कार्यकाळातच भारत व फ्रान्स यांच्यात वरुण, गरुड व शक्ती या संयुक्त कवायती झाल्या होत्या.

‘जनरल जेजे’ या नावाने ते ओळखले जातात, सैनिकांच्या कुटुंबातच जन्मलेले जेजे हे त्यांच्या कुटुंबातील सैनिकांच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी. त्यांचे आजोबा दुसऱ्या महायुद्धात पंजाब रेजिमेंटमध्ये होते, त्यांचे वडील जे. एस. मारवाह हे १९४३ ते १९७३ या काळात दुसऱ्या महायुद्धात सहभागी होते. जेजेंचा जन्म आता पाकिस्तानात असलेल्या बहावलपूरचा. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी. लष्करात कामाचा बारा वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. १९९१ मध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी छुपे युद्ध छेडले होते तेव्हा त्यांनी माऊंट ब्रिगेडचे कमांडर म्हणून काम करताना आघाडीवर राहून लष्करी दलांचे नेतृत्व केले होते. जम्मू-काश्मीर, अरुणाचल, नागालॅण्ड, सिक्कीम या राज्यांतही त्यांनी काम केले. ‘मराठा लाइट इन्फंट्री’तच त्यांना परमविशिष्ट सेवा पदक मिळाले. कारगिल युद्धाच्या वेळी त्यांनी लष्करी कारवाई विभागाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून लोकांना सामोरे जाण्याची जनमानसातील लढाईही अनुभवली. त्या वेळी त्यांना अतिविशिष्ट सेवापदक मिळाले.

‘मराठा लाइट इन्फंट्री’त काम केल्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. गुरू गोविंद सिंग, रणजित सिंग, राणा संग, टिपू सुलतान, जोरावर सिंग व छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांनी प्रेरणास्थानी ठेवले. ‘अ सोल्जर्स जनरल’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. अल्जिरियात संरक्षण खात्याचे दूत म्हणून त्यांनी काम केले असल्याने त्यांना अरबी व फ्रेंच या भाषा चांगल्या येतात. अरुणाचल प्रदेशाचे राज्यपालपद त्यांनी जानेवारी २००८ ते मे २०१३ या काळात सांभाळले. ते चांगले नेमबाज तर आहेत शिवाय त्यांना बास्केटबॉल, स्क्वॉश व गोल्फची आवड आहे. गिर्यारोहणाचे प्रशिक्षण त्यांनी ‘एव्हरेस्ट वीर’ तेनसिंग नोर्गे यांच्याकडून घेतले आहे. या चतुरस्रपणालाही फ्रेंच पुरस्काराने दाद मिळाली आहे.