21 October 2019

News Flash

रिकाडरे गियाकोनी

विश्वाचा पसारा अगाध आहे, त्याचा अभ्यास करण्याचा माणसाचा प्रयत्न हा गेली अनेक वर्षे सुरू आहे.

रिकाडरे गियाकोनी

विश्वाचा पसारा अगाध आहे, त्याचा अभ्यास करण्याचा माणसाचा प्रयत्न हा गेली अनेक वर्षे सुरू आहे. यातून एकेक कोडे उलगडत आपण गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध करण्यापर्यंत मार्गक्रमण केले आहे. अनेक खगोल भौतिकशास्त्रज्ञांनी आतापर्यंत मानवाला असलेल्या विश्वाच्या ज्ञानात भर टाकली. त्यातील एक म्हणजे रिकाडरे गियाकोनी. क्ष-किरणांच्या मदतीने विश्वाचा वेध घेण्यात ते आघाडीवर होते. त्यांनी कृष्णविवरे, स्फोटक तारे व दीर्घिकांतील तेजोमेघ यांच्यातून बाहेर पडणाऱ्या क्ष-किरणांच्या मदतीने अभ्यास केला. गियाकोनी यांच्या निधनाने विश्वरचनेच्या ज्ञानातील एक वाटाडय़ा आपण गमावला आहे.

आतापर्यंत जे काही मोठे विज्ञान प्रकल्प विश्वाच्या अभ्यासासाठी आखले गेले त्यात त्यांचा मोठा वाटा होता. वेधशाळा या विसाव्या-एकविसाव्या शतकातील विश्वशोधनाच्या मोठय़ा खिडक्या आहेत, असे गियाकोनी म्हणत असत. कुठल्याही मोठय़ा विज्ञान प्रकल्पाच्या उभारणीत त्यांनी धडाडीने काम केले. त्यांना प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कारही २००२ मध्ये मिळाला होता. खगोलशास्त्रात महिलांना स्थान देण्यावर त्यांचा भर होता त्यामुळे अनेक संस्थांत महत्त्वाच्या पदांवर त्यांनी महिलांची नेमणूक केली. रिकाडरे गियाकोनी यांचा जन्म इटलीतील गिनोआचा. ते वाढले मिलानमध्ये. त्यांना लहानपणी शिस्त नव्हती. मिलान विद्यापीठातून ते भौतिकशास्त्रात पीएच.डी. झाले. नंतर वैश्विक किरणांचा अभ्यास सुरू केला. नंतर इंडियाना व प्रिन्स्टन येथे काम केल्यानंतर त्यांनी केंब्रिजमधील एका कंपनीत काम सुरू केले. नंतर नासात संशोधन कार्य केले. अग्निबाण उड्डाण व अणुस्फोटातील क्ष-किरणांचा वेध घेण्याचे कामही त्यांनी केले. चंद्रावर वैश्विक किरण आदळून निर्माण होणाऱ्या क्ष-किरणांच्या अभ्यासासाठी त्यांनी १९६२ मध्ये फ्लायिंग गिगर काऊंटर नावाचा प्रयोग केला. पण त्या वेळी वृश्चिक तारकासमूहात क्ष-किरण सापडले. त्यांच्याच प्रयत्नातून पहिला क्ष-किरण खगोलशास्त्र उपग्रह १९७० मध्ये सोडला गेला. त्यातून आकाशाचा धांडोऴा घेताना क्ष-किरणांचे अनेक स्रोत सामोरे आले, त्यातून कृष्णविवराचे अस्तित्वही सिद्ध झाले. विश्वाची क्ष-किरण चित्रे घेणारी दुर्बीण त्यांनी तयार केली होती. त्यातूनच त्यांनी निसर्गाशी हॉटलाइन सुरू केली. १९७८ मध्ये नासाने आइनस्टाइन क्ष-किरण दुर्बीण सोडली. त्यांच्याच पुढाकारातून चंद्रा दुर्बीण सोडली गेली. स्पेस टेलिस्कोप सायन्स इन्स्टिटय़ूटचे ते पहिले संचालक होते. बाल्टीमोर येथील ही संस्था हबल अवकाश दुर्बिणीचे  संचालन करते. अवकाश संशोधनाचा अनुभव नसलेल्या खगोलशास्त्रज्ञांकडून त्यांनी या दुर्बिणीच्या प्रकल्पाची मोठी कामगिरी करून घेतली त्यामुळे वैज्ञानिकाबरोबरच त्यांच्यात नेतृत्वाचे गुण होते.

First Published on December 20, 2018 1:43 am

Web Title: riccardo giacconi profile