News Flash

रिचर्ड एडवर्ड  टेलर

टेलर यांचा जन्म कॅनडातील एका छोटय़ाशा गावात दुसऱ्या महायुद्धाच्या काळातला.

रिचर्ड एडवर्ड  टेलर
रिचर्ड एडवर्ड  टेलर

शरीराने थोडेसे आडदांड,  पण स्वभावाने मृदू, कणभौतिकीशास्त्रात काम करूनही विनोद बुद्धी तेवढीच तरल असलेले रिचर्ड एडवर्ड टेलर हे स्टॅनफर्डचे मानद प्राध्यापक तर होतेच, शिवाय त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेलही मिळाले होते.  नॅशनल अ‍ॅक्सिलरेटर लॅबोरेटरी या दोन किलोमीटर लांबीच्या रेषीय त्वरणक यंत्राच्या मदतीने त्यांनी बरेच प्रयोग केले होते. अणूतील अनेक उपकण कालांतराने शोधले गेले, त्यात क्वार्क या कणाचा शोध लागला नसता तर आपण गॉड पार्टिकल (हिग्ज बोसॉन) पर्यंतची वाटचाल करू शकलो नसतो. या क्वार्क कणाचा शोध घेण्याच्या कामगिरीसाठी टेलर, जेरोम फ्रिडमन व हेन्री केण्डॉल यांना नोबेल मिळाले होते. एसएलएसी या त्वरणक प्रयोगशाळेमागे टेलर यांचीच प्रेरणा सुरुवातीपासून होती.

टेलर यांचा जन्म कॅनडातील एका छोटय़ाशा गावात दुसऱ्या महायुद्धाच्या काळातला. युद्धानंतर त्यांचे मेडिसीन हाट नावाचे अल्बर्टातील गाव जैविक व रासायनिक युद्धतंत्राचे संशोधन केंद्र बनले होते. १९४५ मध्ये अणुबॉम्बचा वापर झाला त्या वेळी टेलर यांनी भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरवले. शाळेत ते फारच सुमार विद्यार्थी होते. लॅटिनमध्ये ते नापास झाले व पदवी मिळालीच नाही. पण विज्ञान व गणितात त्यांची गती पाहून शिक्षकांनी त्यांना अल्बर्टा विद्यापीठात प्रवेश मिळवून दिला, तेथे त्यांना भौतिकशास्त्रात एमएस करता आले. १९९२ मध्ये ते स्टॅनफर्डला आले , हाय एनर्जी फिजिक्स लॅबमध्ये काम करू लागले. फ्रान्समधील ओरसे येथील त्वरणकाच्या उभारणीसाठी त्यांनी स्वत:ची पीएच.डी. तीन वर्षे लांबणीवर टाकली होती. १९६१ मध्ये त्यांनी कॅलिफोर्निया येथे लॉरेन्स रॅडिएशन लॅब येथे काम केले, पण नंतर ते परत स्टॅनफर्ड लिनियर अ‍ॅक्सिलरेटर सेंटर येथे परत आले. प्रोटॉनवर इलेक्ट्रॉन शलाकेचा मारा करून दगडावरची डोकेफोड त्यांनी केली, पण ती सार्थकी लागली कारण प्रोटॉनचेही विभाजन होते व तो काही अदृश्य अणुकणांचा बनलेला असतो, असे स्पष्ट झाले. या कणांनाच क्वार्क असे म्हणतात, त्यातूनच भौतिकशास्त्राचे प्रमाणित प्रारूप पुढे आले. टेलर प्रयोगशाळेत बॉस म्हणून वावरण्यापेक्षा प्रयोगात एकात्म होत गेले. पहाटे पाच वाजता ते प्रयोगशाळेत येत असत व सायंकाळपर्यंत थांबत. ज्या दिवशी क्वार्कच्या शोधासाठी फ्रीडमन, केण्डॉल (एमआयटी) व टेलर यांना नोबेल जाहीर झाले तेव्हा टेलर यांनी किमान तीस लोकांचे आभार मानताना, केवळ मी  बुजुर्ग व या गटातील जास्त ठोस आवाजाचा संशोधक असल्याने हा मान मला मिळाला, असे नम्रपणे म्हटले होते. अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस, नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस, रॉयल सोसायटी ऑफ लंडन या संस्थांचे ते मानद  सदस्य होते. त्यांना ऑर्डर ऑफ कॅनडा, हुम्बोल्ट प्राइज असे अनेक पुरस्कार मिळाले. क्वार्क आणि तारे तुम्ही जन्माला आलात तेव्हापासून  तुमच्याबरोबर आहेत, तुम्ही जाल तरी ते येथेच राहतील, असे ते म्हणायचे. आता टेलर जरी गेले असले तरी क्वार्कच्या रूपाने मात्र ते आपल्यातच आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 4:13 am

Web Title: richard edward taylor profile
Next Stories
1 डॉ. बी. के. गोयल
2 कमल देसाई
3 भिकू पै आंगले
Just Now!
X