‘प्रख्यात इराकी वास्तुरचनाकार कोण?’ या प्रश्नावर, वास्तुरचनेच्या क्षेत्रातील भले भले लोकही झाहा हदीद यांचे नाव सांगतील! त्या झाहा हदीद दोन वर्षांच्या होत्या तेव्हा- म्हणजे १९५२ सालीच, परदेशातून वास्तुरचनाकार होऊन रिफात चादिरजी इराकमध्ये परतले होते आणि इराकी वास्तूंच्या रूपामध्ये क्रांती घडविण्यासाठी सिद्ध झालेले होते.. ‘इराकी आधुनिक वास्तुरचनेचे जनक कोण?’ या प्रश्नावर एकच नाव येते, ते रिफात चादिरजी यांचे. हे रिफात चादिरजी इराक युद्धाच्या काळापासून लंडनला राहू लागले होते. तेथेच १० एप्रिल रोजी, वयाच्या ९३ व्या वर्षी ते निवर्तले.

सद्दाम हुसेन यांची राजवट इराकमध्ये आली ती जुलै १९७९ मध्ये. त्याआधीची किमान २५ वर्षे चादिरजी हे बगदादमधील अव्वल वास्तुरचनाकार मानले जात. ‘अज्ञात सैनिकांचे स्मारक’ ही अवघ्या चार पायांवरली उंच कमान (१९५९) सद्दामकडून पाडण्यात येण्यापूर्वी जगद्विख्यात रचनांपैकी एक ठरली होती. टपाल कार्यालय, इराकी तंबाखू महामंडळाचे मुख्यालय आदी सरकारी इमारतींचे सौंदर्य त्यांनी खुलवलेच आणि या कचेऱ्यांत नैसर्गिक प्रकाश उत्तम येऊनही हवा खेळती राहील आणि उष्मा मात्र जाणवणार नाही याची काळजी (आपल्या अच्युत कानविंदे यांच्या रचनांप्रमाणे) घेतली. कमानीचे बिगरइस्लामी रूप ज्या अनेकांनी शोधले, त्यांमध्ये रिफात चादिरजी यांचाही समावेश होतो. इराकी वास्तुपरंपरेशी इमान राखताना त्यांनी इस्लामीकरण कटाक्षाने टाळले. मतभेद होऊन सरकारी काम नाकारल्यामुळे १९७४ मध्ये त्यांना तुरुंगवासही घडला होता. पण सद्दाम हुसेन राजवटीत त्यांना पुन्हा बगदादच्या नगररचनेपर्यंत अनेक कामे मिळाली. आधुनिकतावाद जपताना, इस्लामीकरण नाकारताना रिफात यांनी इराकी परंपरा म्हणजे काय, तिचा तोल आणि तिची लय समाजजीवनात कुठे कुठे सापडते याचा कसून अभ्यास केला. त्यासाठी फोटोग्राफी हे साधन वापरले. त्या छायाचित्रांचा संग्रह एवढा झाला की, वेळोवेळी त्याची आठ पुस्तके तयार झाली. एकंदर १५ पुस्तके रिफात यांच्या नावावर आहेत, त्यांपैकी सात अरबी भाषेत लिहिलेली, तर एक फ्रेंच भाषांतर आहे. लिखाणातून इराकचा पुनशरेध धर्मनिरपेक्ष पद्धतीने घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. गेल्या सुमारे ३० वर्षांत, कामे कमी करून ते लिखाणाकडेच वळले होते. त्यांच्या नावाचे ‘रिफात चादिरजी फाऊंडेशन’ त्यांच्या हयातीतच स्थापन झाले आणि २०१७ पासून या प्रतिष्ठानातर्फे इराक, इजिप्त व लेबनॉनमधील तरुण वास्तुरचनाकारांना ५००० डॉलर रोख व मानचिन्ह अशा स्वरूपाचे ‘रिफात चादिरजी पारितोषिक’देखील देण्यात येते. त्यांच्या निधनाने इराकीच नव्हे, तर आधुनिकतावादी बिगरपाश्चात्त्य वास्तुकलेचा दुवा निखळला आहे.