22 January 2019

News Flash

डॉ. रॉबर्ट लँगलँड्स

१९६२ मध्ये लँगलँड्स यांची नेमणूक प्रिन्स्टनच्या स्कूल ऑफ मॅथेमेटिक्सचे सदस्य म्हणून झाली होती.

रॉबर्ट लँगलँड्स

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या मुलाला विद्यापीठातील शिक्षणात रस नव्हता हे त्याच्या शिक्षकांच्या लक्षात आले होते. त्यामुळे एका तासाला सर्व विद्यार्थ्यांसमक्ष त्याला विद्यापीठ शिक्षण घेण्यासाठी आग्रह करण्यात आला. त्यालाही ते पटले असावे त्यामुळे त्याने अखेर वयाच्या सोळाव्या वर्षी ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला व नंतर येल विद्यापीठातून गणितात डॉक्टरेटही केली. आता हा मुलगा जगातील प्रसिद्ध गणितज्ञ तर आहेच पण त्याला गणितातील नोबेल मानला जाणारा आबेल पुरस्कारही नुकताच मिळाला आहे. त्याचे नाव आहे डॉ. रॉबर्ट लँगलँड्स.

कॅनडाचे नागरिक असलेल्या लँगलँड्स यांना ‘लँगलँड्स प्रोग्रॅम’ या नावाने गणितात प्रसिद्ध असलेल्या संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. आधुनिक गणितात इतक्या मोठय़ा प्रमाणावर फलनिष्पत्ती असलेले कुठलेही गणिती संशोधन सध्या तरी अस्तित्वात नाही. त्यांच्या या गणिती सिद्धांतांवर देशोदेशीचे गणितज्ञ पुढे संशोधन करीत आहेत. गेल्या पन्नास वर्षांतील एक उत्तम गणितज्ञ असा त्यांचा गौरव निवड समितीने केला आहे. लँगलँड्स प्रोग्रॅमवरील काम त्यांनी १९६७ मध्ये सुरू केले होते, ते प्रिन्स्टन येथे गणिताचे सहयोगी प्राध्यापक झाले ते वर्ष होते १९६०. उमेदवारीच्या काळात त्यांनी प्रिन्स्टनमध्ये सेलबर्ग, आंद्रे वेल व हरीश चंद्रा यांच्यासमवेत काम केले. हरीश चंद्रा यांच्या कामाचा त्यांच्या कामावर प्रभाव आहे. क्लास फिल्ड थिअरी, ऑटोमॉर्फिक फॉर्म व नंबर थिअरी यात त्यांनी बरेच काम केले. १९६२ मध्ये लँगलँड्स यांची नेमणूक प्रिन्स्टनच्या स्कूल ऑफ मॅथेमेटिक्सचे सदस्य म्हणून झाली होती. १९६६ मध्ये ख्रिसमसच्या सुटीत त्यांना नंबर थिअरी व ऑटोमॉर्फिक फॉर्म यांना एकत्र जोडणारी सैद्धांतिक कल्पना सुचली तोच ‘लँगलँड्स प्रोग्रॅम’चा जन्म होता. त्यांचा हा नवीन प्रकल्प गणितातील महाएकात्मिक सिद्धांत मानला जातो. रॉबर्ट लँगलँड्स यांचा जन्म कॅनडातील न्यू वेस्टमिनस्टरचा. नऊ  वर्षांच्या वयात ते अमेरिकेच्या सीमेजवळील एका शहरात आईवडिलांबरोबर आले. शाळेनंतर शिक्षणात रस नसताना शिक्षकांच्या सल्ल्यानुसार ते पुढे गेले व नंतर ‘सेमी ग्रुपस अ‍ॅण्ड रिप्रेंझेटेशन्स इन लाय ग्रुप्स’ हा पीएच.डी.चा प्रबंध लिहिला. नंतरच्या काळात येल विद्यापीठात असताना त्यांनी ‘प्रॉब्लेम्स इन थिअरी ऑफ ऑटोमॉर्फिक फॉर्मस’ हे पुस्तक लिहिले. भाषांवर त्यांचे विशेष प्रेम. त्यातूनच ते जर्मन, रशियन, तुर्कीश या भाषा बोलायला शिकले. गणित आणि भाषा या दोन टोकाच्या विषयांचे एक वेगळे रसायन त्यांच्यात आहे. आतापर्यंत त्यांना वुल्फ, स्टीली, नेमर्स, शॉ यांच्या नावाने दिले जाणारे गणितातील सर्व मोठे पुरस्कार मिळाले आहेत. सध्या ते प्रिन्स्टनमध्ये इन्स्टिटय़ूट फॉर अ‍ॅडव्हान्सड स्टडी या संस्थेत आइनस्टाइन ज्या कार्यालयात गणितज्ञ म्हणून काम करीत होते, तेथे मानद प्राध्यापक आहेत.

First Published on March 31, 2018 2:29 am

Web Title: robert langlands personal information