28 January 2021

News Flash

रॉबर्ट लेवांडोवस्की

चॅम्पियन्स लीगमधील लेवांडोवस्कीच्या १५ गोलांमुळे बायर्न म्युनिकला जेतेपदावर मोहोर उमटवता आली.

रॉबर्ट लेवांडोवस्की

 

जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणल्या जाणाऱ्या लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी गेल्या १३ पैकी ११ वर्षे आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) ‘सर्वोत्तम खेळाडू’च्या पुरस्कारावर नाव कोरले. २०१८ मध्ये ही मक्तेदारी रेयाल माद्रिदच्या लुका मॉड्रिचने मोडीत काढली. यंदा त्याच मक्तेदारीला बायर्न म्युनिकच्या रॉबर्ट लेवांडोवस्कीने छेद दिला आहे. शांत, संयमी, अत्यंत चपळ, मजबूत तसेच प्रतिस्पध्र्याच्या गोलक्षेत्रातील २० यार्डावरून कुठूनही गोल करण्याची क्षमता असलेल्या लेवांडोवस्कीला जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी मात्र ३२ व्या वर्षांपर्यंत वाट पाहावी लागली. गेल्या मोसमात चॅम्पियन्स लीगच्या बाद फेऱ्यांमध्ये चमकदार कामगिरी केल्यामुळेच लेवांडोवस्कीचा या पुरस्कारासाठीचा मार्ग मोकळा झाला. चॅम्पियन्स लीगमधील लेवांडोवस्कीच्या १५ गोलांमुळे बायर्न म्युनिकला जेतेपदावर मोहोर उमटवता आली.

२०११-१२ च्या मोसमात बोरुशिया डॉर्टमुंड या क्लबकडून मध्य आघाडीवीर म्हणून मुख्य प्रशिक्षक युर्गेन क्लोप यांनी संधी दिल्यानंतर लेवांडोवस्कीची कारकीर्द खऱ्या अर्थाने बहरू लागली. वजनाने कमी असल्याने लेवांडोवस्की किती प्रभावी ठरेल, याची चिंता क्लोप यांना भेडसावत होती. पण लेवांडोवस्कीने चपळता आणि क्षमतेच्या जोरावर टीकाकारांना चोख उत्तर द्यायला सुरुवात केली. डॉर्टमुंडला लागोपाठ दोन वर्षे बुंडेसलीगाचे जेतेपद मिळवून देण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला. २०१३ मध्ये चॅम्पियन्स लीगच्या उपान्त्य फेरीत रेयाल माद्रिदसारख्या तगडय़ा प्रतिस्पध्र्याविरुद्ध तब्बल चार गोल करत लेवांडोवस्कीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. युरोपियन चषकाच्या उपान्त्य फेरीत चार गोल झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला. या ऐतिहासिक कामगिरीनंतर आघाडीवीर म्हणून लेवांडोवस्कीच्या क्षमतेविषयी चर्चा होऊ लागली. डॉर्टमुंडनंतर बायर्न म्युनिकने करारबद्ध केल्यानंतर लेवांडोवस्कीला पहिल्या मोसमात ४९ सामन्यांत २५ गोल करता आले. पण त्यानंतर पुढील पाचपैकी चार वर्षे बुंडेसलीगामधील सर्वोत्तम गोल करण्याचा मान लेवांडोवस्कीने पटकावला. त्यामुळेच गेली सहा वर्षे बायर्न म्युनिकने बुंडेसलीगाच्या जेतेपदावर आपले वर्चस्व कायम राखले आहे. ऑक्टोबर महिन्यात त्याला युरोपातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. इतकेच नव्हे, तर कमीत कमी वेळेत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही (वुल्फ्सबर्गविरुद्ध नऊ मिनिटांत पाच गोल) लेवांडोवस्कीच्या नावावर आहे. तंदुरुस्ती आणि आहाराबाबत कायम सजग असलेला लेवांडोवस्की मोजक्या वेळा जायबंदी पडला आहे. त्यामुळे फुटबॉलमधील नामांकित खेळाडूंकडून त्याची ‘अचूक व्यावसायिक फुटबॉलपटू’ म्हणून प्रशंसा केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2020 12:06 am

Web Title: robert lewandowski profile abn 97
Next Stories
1 मोतीलाल व्होरा
2 मा. गो. वैद्य
3 चक येगर
Just Now!
X