28 January 2021

News Flash

रोद्दम नरसिंहा

केवळ विज्ञानच नव्हे तर योगविद्या, भारतीय तत्त्वज्ञान, इतिहास व गणित यांत त्यांना रुची होती.

रोद्दम नरसिंहा

 

भारताच्या अवकाश कार्यक्रमात १९८० च्या दशकात पहिल्या काही प्रक्षेपकांचे उड्डाण अपयशी झाले असतानाही खचून न जाता तो कार्यक्रम पुढे नेण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता त्यातील एक  वैज्ञानिक म्हणजे १४ डिसेंबर रोजी कालवश झालेले रोद्दम नरसिंहा. त्यांच्या प्रयत्नातूनच पुढे एएसएलव्ही  (ऑग्मेंटेड सॅटेलाइट लाँच व्हेइकल) उड्डाणे यशस्वी झाली. त्यामुळेच आज आपण गगनयानसारख्या मानवी अवकाश मोहिमांचे स्वप्न पाहात आहोत. ‘एएसएलव्ही’नंतर ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक व भूसंकालिक उपग्रह प्रक्षेपकांची उड्डाणे यशस्वी झाली होती. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) सर्वच अवकाश मोहिमांची भिस्त या दोन प्रक्षेपकांवर आहे. त्यांच्या यशस्वितेचे श्रेय नरसिंहा यांना द्यावे लागेल. ‘एएसएलव्ही’ या प्राथमिक प्रक्षेपकाची काही उड्डाणे अपयशी झाल्यावर त्यातील दोष दुरुस्त करण्यासाठी इस्रोचे तेव्हाचे अध्यक्ष व प्रसिद्ध वैज्ञानिक सतीश धवन यांनी ज्या दोन समित्या नेमल्या होत्या, त्यांत नरसिंहांचा समावेश होता. वायुगतिकीतील तज्ज्ञ या नात्याने त्यांनी ज्या सूचना केल्या त्यातूनच एएसएलव्हीची उड्डाणे नंतर यशस्वी झाली. प्रत्येक वैज्ञानिकाकडे असायलाच  हवेत असे स्पष्टवक्तेपणा व धाडस हे  दोन्ही गुण त्यांच्यात होते. त्यांच्या निधनाने वैज्ञानिक समुदायातील एक धडाडीचे नेतृत्व हरपले आहे. नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज व नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्सड स्टडीज या दोन महत्त्वाच्या संस्थांचे नेतृत्व करीत असतानाच वायुगतिकी तज्ज्ञ या नात्याने त्यांनी नेहमीच इस्रोला मोलाची साथ दिली. या दोन्ही संस्थांचे नेतृत्व करताना त्यांनी शैक्षणिक व आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाला प्राधान्य दिले, त्यामुळे त्यांची कामगिरी उठून दिसली. ‘भारताचे राफेल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘तेजस’ या हलक्या लढाऊ विमानांची रचना व विकास यांत त्यांचा मोठा वाटा होता.  केवळ विज्ञानच नव्हे तर योगविद्या, भारतीय तत्त्वज्ञान, इतिहास व गणित यांत त्यांना रुची होती. नरसिंहा यांचा जन्म आंध्रातील अनंतपूर जिल्ह्य़ातील रोद्दम गावचा. त्यांचे शिक्षण म्हैसूर विद्यापीठात झाले. आईवडिलांना त्यांनी रेल्वेत नोकरी करावी असे वाटत होते, पण वेगळा मार्ग निवडून बेंगळूरुच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या नामांकित संस्थेत दाखल झाले. नंतर ते बेंगळूरुच्या सेंट्रल कॉलेज येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. इस्रोचे अध्यक्ष सतीश धवन यांच्यासह त्यांना काम करायला मिळाले. पुढे अमेरिकेत उच्चशिक्षण घेऊन ते भारतात परतले. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यासमवेत त्यांनी ‘डेव्हलपमेंट इन फ्लुइड मेकॅनिक्स अ‍ॅण्ड स्पेस टेक्नॉलॉजी’ हे पुस्तक लिहिले होते. त्यांना ‘पद्मविभूषण’ किताबाने गौरवण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 12:06 am

Web Title: roddam narasimha profile abn 97
Next Stories
1 पावलो रॉस्सी
2 श्रीपती खंचनाळे
3 मंगलेश डबराल
Just Now!
X