शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे आदरास पात्र ठरलेल्या रेव्ह. फादर रोमाल्ड डिसूझा एस जे यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी गोव्यात निधन झाले. २० डिसेंबर १९२५ रोजी गोव्यात अल्डोना येथे जन्मलेल्या रोमाल्ड डिसूझा यांनी १९५८ साली बेल्जियममध्ये ख्रिस्ती धर्मगुरूसाठी असणारा अभ्यासक्रम पूर्ण केला. मग अमेरिकेतील फोर्डहॅम विद्यापीठातून समुपदेशनात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. कोलंबिया विद्यापीठातून मानसशास्त्र आणि व्यवस्थापन क्षेत्रात पुढील शिक्षण घेतले. शिक्षण क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने १९६७ साली भारतात परतलेल्या फादर रोमाल्ड डिसूझा यांची नेमणूक धर्मपीठाने पुण्यातील ‘सेंट व्हिन्सेंट हायस्कूल’चे प्राचार्य म्हणून केली. १९७८ मध्ये मायदेशी परतून पणजीजवळील पर्वरीत इतिहास संशोधनात आज जगभर प्रसिद्ध असलेल्या ‘झेविअर सेंटर फॉर हिस्टॉरिकल रिसर्च’ या इतिहास संशोधन केंद्राची स्थापना केली. पदव्युत्तर व्यवस्थापन शिक्षणासाठी नावाजल्या गेलेल्या जमशेटपूरच्या झेवियर्स लेबर रिलेशन्स इन्स्टिटय़ूट अर्थात एक्सएलआरआयचे ते १९८२ ते १९८९ या काळात संचालक होते. १९८९ मध्ये ‘झेवियर्स इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’ भुवनेश्वर येथे स्थापून, त्या संस्थेचे ते पाच वर्षे संचालक होते. या पाच वर्षांत त्यांनी संस्थेला, देशातील व्यवस्थापन शिक्षणासाठी एक आघाडीचे केंद्र म्हणून लौकिक प्राप्त करून दिला. वयाच्या ६८ व्या वर्षी १९९३ मध्ये त्यांनी गोव्यात गोवा इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटची स्थापन केली आणि २००४ पर्यंत या संस्थेचे संचालक पद भूषविले. अनेक विषय ते शिकवत असत. गोव्यातील उद्योगांना बदलत्या काळात व्यवस्थापकांची गरज भासणार असल्याने साळगांवकर, चौगुले, ढेपे, मिनेझिस यांसारख्या उद्योग-घराण्यांची मदत घेतली. गोव्यात उत्पादन प्रकल्प असलेल्या सेसा गोवा, हिंदुस्थान युनिलिव्हर, मर्क, सिप्ला यांसारख्या कंपन्यांनी सुरुवातीस या संस्थेस मदत केली ती फादर डिसूझा यांचा लौकिक माहीत होता म्हणून. या संस्था स्थापन करण्यात कायम अपयशी ठरण्याची एक प्रकारची जोखीम होती. शिक्षणसंस्था स्थापन करूनदेखील शिक्षणसम्राट हे बिरुद त्यांना कधीच चिकटले नाही. वैयक्तिक जीवनात त्यांचे वागणे अत्यंत साधे. ख्रिस्ताला आवडणाऱ्या प्राथमिक शाळांऐवजी त्यांनी व्यवस्थापन शिक्षण संस्था स्थापन केल्यामुळे ‘त्याचे’ अद्याप बोलावणे आलेले नाही, असे ९० व्या वाढदिवशी सांगत आपल्या विनोदबुद्धीचा पुरावा त्यांनी दिल्याचे त्या समारंभातील उपस्थितांना स्मरते! साऊथ एशिया असोशिएशन ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट्स, अ. भा. व्यवस्थापन अभ्यास मंडळ, गोवा विद्यापीठ कार्यकारी परिषद यांसारख्या विविध शैक्षणिक संस्थांचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. ते अमेरिकेतील अकादमी ऑफ मॅनेजमेंट, इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ सायकोलॉजिस्ट्सचे व्यावसायिक सदस्य होते. व्यवस्थापन शिक्षणातील योगदानाबद्दल त्यांना ‘पद्मश्री’ (२०१०)ने गौरविण्यात आले होते.