दैनिकांतील ठरवून दिलेल्या शब्दमर्यादेत लोकांना आवडेल, रुचेल आणि विचार करायला प्रवृत्त करणारा स्तंभ चालवणे सोपे नसते. अफाट वाचकप्रिय असणाऱ्या लेखकांनाही हे अनेकदा जमत नाही. ‘वॉशिंग्टन पोस्ट’, ‘न्यू यॉर्क टाइम्स’ यांसारखी जागतिक कीर्तीची वृत्तपत्रे तेथील संपादकांबरोबरच त्या दैनिकांत नियमितपणे प्रसिद्ध होणाऱ्या स्तंभांसाठीही ओळखली जातात. यातीलच एक होते रसेल बेकर. कर सुधारणांसारख्या आर्थिक विषयांपासून एकटेपण, भय, मृत्यू..अशा विविध विषयांवर लेखन करून त्यांनी कधी वाचकांना हसवले तर कधी अंतर्मुख होऊन विचार करायला लावले.

१९२५ मध्ये व्हर्जिनिया प्रांतात जन्मलेल्या रसेल यांच्या लहानपणीच त्यांचे पितृछत्र हरपले. शाळेत असताना लिहिलेल्या एका निबंधाने त्याचे शिक्षकही चकित झाले होते. आईच्या दुसऱ्या विवाहानंतर ते बाल्टिमोर येथे आले. १९४२ मध्ये अमेरिका दुसऱ्या महायुद्धात ओढली गेल्याने  शिक्षण अर्धवट सोडून ते नौदलात दाखल झाले. फ्लोरिडा, जॉर्जिया, साऊथ कॅरोलिना यांसारख्या प्रांतांत त्यांनी काम केले. युद्ध समाप्तीनंतर त्यांनी पुन्हा महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९४७ मध्ये ते पदवीधर झाले. एका वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून काम करण्यास त्यांनी सुरुवात केली तरी त्यात त्यांचे मन रमत नव्हते. १९५० मध्ये न्यू यॉर्क टाइम्सच्या वॉशिंग्टनस्थित ब्यूरोत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. व्हाइट हाऊस, अमेरिकी काँग्रेस तसेच राष्ट्रीय राजकारण हे विभाग त्यांना तेथे हाताळायला मिळाले. ‘ऑब्झव्‍‌र्हर’ हा त्यांचा स्तंभ न्यू यॉर्क टाइम्समध्ये सुरू झाला आणि रसेल बेकर हे नाव लाखो वाचकांच्या परिचयाचे झाले. नंतर सातत्याने, या वाचकप्रिय स्तंभामधून त्यांनी विविध विषयांवर लेखन केले. १९८२ मध्ये यासाठी त्यांना पुलित्झर पारितोषिक मिळाले. पुढे अनेक वर्षे त्यांनी आपल्या नर्मविनोदी शैलीतील लेखनाने चार दशके वाचकांना हसवले. काही वर्षे दूरचित्रवाणीवरील ‘मास्टरपीस थिएटर’ या कार्यक्रमाचेही सूत्रसंचालन त्यांनी केले. पुढे ‘ग्रोइंग अप’ हे त्यांचे आत्मचरित्रही त्या काळच्या बेस्टसेलर यादीत होते. नंतर यालाही पुलित्झर पारितोषिक प्राप्त झाले. एकंदर १७ पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. नो कॉज फॉर पॅनिक, द गुड टाइम्स, अ‍ॅन अमेरिकन इन वॉशिंग्टन आदी त्यांची पुस्तके लोकप्रिय ठरली. गेल्या आठवडय़ात, २२ रोजी त्यांचे निधन झाल्याने अमेरिकेने जुन्या पिढीतील एक चांगला पत्रकार व लेखक गमावला आहे.