चित्रवाणी वृत्तवाहिन्यांवरील  चर्चात राजकीय पक्षांचे प्रवक्ते तावातावाने बाजू मांडताना दिसतात. या ‘वक्तृत्वा’च्या जोरावर अनेकदा पक्षात या प्रवक्त्यांचे महत्त्व वाढते. मात्र दोन दशकांपूर्वी जेव्हा खासगी दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्यांच्या प्रसाराला सुरुवात झाली होती, त्याच काळात सुदिनी जयपाल रेड्डी यांनी सरकार असो वा पक्ष, आपली बाजू प्रवक्ते म्हणून नेमक्या शब्दांत लोकांपर्यंत पोहोचवली. रविवारी रेड्डी यांच्या निधनाने अनुभवी राजकारणी निमाला.

१९६९ ते ८४ या काळात चार वेळा आंध्र प्रदेश विधानसभा सदस्य, पाच वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व व दोनदा राज्यसभा सदस्य अशी त्यांची कारकीर्द. १९९१-९२ मध्ये ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. १९९८ मध्ये उत्तम संसदपटू म्हणूनही त्यांना गौरवण्यात आले होते. आपल्याला जे पटेल ते मांडत राहिले, त्या अर्थाने त्यांनी तत्त्वाचे राजकारण केले. तेलंगणा राज्याचे खंदे पुरस्कर्ते असलेल्या जयपाल रेड्डी यांचा राजकीय प्रवास जनता पक्ष, पुढे जनता दल ते काँग्रेस असा होता. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांना विरोध करण्याचे धाडस त्यांनी दाखविले. १९८० साली जनता पक्षातून मेडक मतदारसंघातून इंदिराजींच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढविली. पुढे जनता दलात ते सामील झाले. भाषेवर कमालीचे प्रभुत्व व उत्तम वक्तृत्वाच्या जोरावर युनायटेड फ्रंट, नॅशनल फ्रंट तसेच पुढे काँग्रेसचे ते प्रवक्ते होते. १९९९ मध्ये ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. माहिती प्रसारण, नगरविकास, पेट्रोलियम ही खाती त्यांनी केंद्रात भूषवली. युनायटेड फ्रंट सरकारमध्ये माहिती प्रसारण खाते सांभाळतानाच प्रसारभारती या स्वायत्त संस्थेची उभारणी झाली.

त्या काळातील त्यांच्या वक्तृत्वाची हातोटी काही पत्रकार सांगतात. १९९७-९८ मध्ये रेड्डी हे संयुक्त आघाडी (युनायटेड फ्रंट) सरकार व जनता दल यांचे प्रवक्ते होते. सरकारबाबत अडचणीचा प्रश्न विचारला, की मी पक्षाचा प्रवक्ता आहे अन् पक्षाबाबत विचारला तर मी सरकारचा प्रवक्ता आहे, असे सांगण्याचा मुरब्बीपणा त्यांच्याकडे होता. २००२ मध्ये लोकसभेत त्यांनी ‘ुमंगस’ हा शब्द वापरला. त्याचा अर्थ इतरांना माहीत नसल्याने गदारोळ झाला. नंतर दोन दिवसांनी रेड्डी यांनीच, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा संदर्भ देत या शब्दाचा अर्थ विशद केला. मग कामकाजातही हा शब्द कायम राहिला! २०१० मध्ये तेलंगण राज्यासाठी आंदोलन सुरू होते तेव्हा जयपाल रेड्डी हे राज्यातील काँग्रेस नेत्यांचे मार्गदर्शक होते. राजकारणात घराणेशाहीच्या विरोधात ते होते. त्यामुळेच आपल्या मुलांना वा भावांना राजकारणापासून त्यांनी दूर ठेवले.