‘ऑपरेशन ब्लू स्टार’च्या वर्षभर आधी, १९८३ मध्येच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हरमिंदर साहिबवर (सुवर्ण मंदिर) हल्ला करून दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी योजना तयार करण्याची सूचना त्यांना केली होती. सुवर्ण मंदिरात धडक कारवाई केल्यास शीख समाजात असंतोष उफाळेलच, पण लष्करातील ऐक्यही धोक्यात येईल. म्हणून ही कारवाई वेगळ्या पद्धतीने करावी असे त्या लष्करी अधिकाऱ्याचे मत होते. सुवर्ण मंदिरातील कारवाई आपल्याच नेतृत्वाखाली व्हावी, ही त्यांची इच्छा होती. पण त्यांची योजना इंदिराजींपर्यंत पोहोचलीच नाही. लेफ्टनंट जनरल श्रीनिवास कुमार अर्थात एस के सिन्हा हे त्या अधिकाऱ्याचे नाव.

मग १९८३ मध्ये अरुणकुमार वैद्य यांच्यावर सैन्यदलाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली; तेव्हा लष्करप्रमुखपदासाठी पात्र असतानाही डावलल्याच्या भावनेने दुखावलेल्या सिन्हा यांनी लष्करी सेवेला रामराम केला. पुढे १९८४ मध्ये सुवर्ण मंदिरात सैन्याने धडक कारवाई करून भिंद्रनवाले नावाच्या भस्मासुराचा अंत केला तरी त्यानंतर इंदिराजी आणि जनरल वैद्य यांनाही अतिरेक्यांच्या हल्ल्यात प्राण गमवावे लागले, तेव्हा सिन्हा यांची भूमिका किती योग्य होती याची प्रचीती आली.

सैन्यात १९४३ ते १९८३ अशी तब्बल चाळीस वर्षे त्यांनी विविध पदे भूषविली. या काळात काश्मीर, आसाम, मणिपूर या संवेदनशील भागांत त्यांच्या सेवेतील मोठा कालखंड गेल्याने १९९७ मध्ये सिन्हा यांची आसामच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली. लष्करातील ऐक्याची भावना वृद्धिंगत करणे, आर्थिक विकास आणि राज्यातील भरकटत जाणाऱ्या तरुणाईला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या समुपदेशनावर त्यांनी भर दिला. लष्करातील जवान आणि अधिकाऱ्यांना अत्याधुनिक हत्यारे देऊन फुटीरवाद्यांचा कणा मोडण्याचे काम त्यांच्या काळात झाले.

नंतर २००३ मध्ये ते जम्मू-काश्मीरचे राज्यपाल बनले. मात्र आसामप्रमाणे त्यांना येथे यश मिळू शकले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री मुफ्ती महमद सईद यांच्याशी त्यांचे संबंध कायमच तणावाचे राहिले. पुढे गुलाम नबी आझाद राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सिन्हा यांना पुन्हा मुक्तहस्ते त्यांच्या योजना राबवण्याची मुभा दिली. याच काळात सिन्हा यांनी वादग्रस्त मुस्लीम धर्मोपदेशक झाकीर नाईक हे समाजाच्या भल्यासाठी करीत असलेल्या कामाचे कौतुक करून राजभवनात त्यांचा सत्कारही केला होता. १९४७ मध्ये लष्करातील अधिकारी ते २००७ मध्ये राज्यपाल अशी ५० वर्षे त्यांचा काश्मीरशी संबंध आला. काश्मीरसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी विविध वृत्तपत्रांत अनेक वर्षे स्तंभलेखन केले. काश्मीर आणि आसाम प्रश्नावर मूलगामी विचार मांडणारी दोन व अन्य विषयांवरील सात पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. ९२ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य जगल्यानंतर गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा सैन्यदलात प्रशंसनीय सेवा बजावलेला एक योद्धा देशाने गमावला अशीच भावना अनेकांनी व्यक्त केली.