25 January 2020

News Flash

सब्यसाची भट्टाचार्य

ब्रिटिश साम्राज्याच्या आर्थिक पायाचा त्यांनी अभ्यास केला होता.

शिकागो विद्यापीठ, ऑक्सफर्ड, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ यांसारख्या अनेक शिक्षण संस्थांतील विद्यार्थिप्रिय प्राध्यापक व इतिहासकार सब्यसाची भट्टाचार्य हे जवळपास वर्षभर कर्करोगाने आजारी होते. अखेर त्यांना मृत्यूने गाठलेच. त्यामुळे भारतातील इतिहास संशोधनाच्या प्रांतात एक मोठी पोकळी निर्माण झाली. इतिहासाचा पैस त्यांनी विस्तारत नेला. आर्थिक इतिहासातून ते कधी सांस्कृतिक व व्यक्तिचित्रात्मक इतिहासात प्रवेश करीत हे कळतही नसे, इतकी त्यांची प्रतिभा चतुरस्र होती. समकालीन इतिहासकारांपेक्षा यामुळेच त्यांचे वेगळेपण ठसले.

ब्रिटिश साम्राज्याच्या आर्थिक पायाचा त्यांनी अभ्यास केला होता. त्या काळात आर्थिक कारभार ब्रिटिश कसा पार पाडत होते याचा वेध त्यांनी घेतला. २०१६ च्या फेब्रुवारीत त्यांचे ‘दी कलोनियल स्टेट- थिअरी अ‍ॅण्ड प्रॅक्टिस’ या पुस्तकाचे प्रकाशन इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे झाले, त्या वेळी हे माझे शेवटचे पुस्तक.. असे ते म्हणाले; पण कुणाचा त्यावर विश्वास बसला नव्हता. सर्वच इतिहास हा खरे तर समकालीन इतिहास असतो, या बेनेडिट्टो क्रोस यांच्या दृष्टिकोनातूनच त्यांनी इतिहासाकडे पाहिले. धर्मनिरपेक्षतेची संकल्पना वेगळ्याच विषारी विळख्यात असताना ती अधिक प्रभावीपणे ठसवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ‘टॉकिंग बॅक- सिव्हिलायझेशन इन दी इंडियन नॅशनॅलिस्ट डिस्कोर्स’ हे त्यांचे पुस्तक नेहमीच विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे. टागोर, गांधी, नेहरू व इतर अनेकांचा राष्ट्रवादाचा विचार त्यांनी अभ्यासला. व्ही.व्ही. गिरी नॅशनल लेबर इन्स्टिटय़ूट या संस्थेने जेव्हा कामगार चळवळींचा इतिहास लिहिण्याचे काम हाती घेतले, तेव्हा त्यात त्यांनीच मार्गदर्शन केले. ऐतिहासिक कागदपत्राचे मोल त्यांना माहीत होते. त्यातूनच त्यांनी गुरुदेव टागोर व महात्मा गांधी यांच्या पत्रांचे संकलन (दी महात्मा अ‍ॅण्ड दी पोएट) केले होते.

१९५० च्या मध्यावधीत कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजातून त्यांनी सुरुवात केली. त्या वेळी सुशोभन सरकार हे त्यांचे शिक्षक होत. एमए करीत असताना त्यांची इतिहास अभ्यासाची व्याप्ती व खोली वाढत गेली. नंतर बरून डे यांच्यासारख्या प्राध्यापकांनी त्यांची इतिहासातील वाटचाल पक्की केली. ब्रिटिशकाळातील भारताचा आर्थिक इतिहास हाच त्यांच्या संशोधनाचा विषय होता. नंतर त्यांना शिकागो विद्यापीठाची विद्यावृत्ती मिळाली. ऑक्सफर्डचे अ‍ॅगाथा हॅरिसन फेलो हे पद त्यांना मिळाले. ऑक्सफर्डहून परतल्यावर भट्टाचार्य जेएनयूत आले. चार दशके तेथे त्यांनी विद्यार्थी घडवले, मुलांसाठी ते लाडके ‘बाप्पा’ होते. त्यांनी केवळ आर्थिक इतिहासकार म्हणून रिंगण आखून घेतले नाही तर ते सांस्कृतिक इतिहासातही तितक्याच सहजतेने विहरले. त्यातूनच त्यांनी ‘बंदे मातरम्’ हे विचारप्रवृत्त करणारे पुस्तक लिहिले. बंगाली नसलेल्या लोकांसाठी त्यांनी टागोरांवर एक पुस्तक वेगळे लिहिले होते. विश्वभारतीचे कुलगुरू, भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे अध्यक्ष, कोलकात्याच्या सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेस या संस्थेचे अध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी भूषवली. वर्गात शिकवताना त्यांची प्रतिभा तर बहरत असे, पण ते विद्यार्थ्यांना शोधक प्रश्न करून विचार करण्यास भाग पाडत.

First Published on January 12, 2019 12:03 am

Web Title: sabyasachi bhattacharya
Next Stories
1 हर्षवर्धन शृंगला
2 रॉय जे ग्लॉबर
3 नॅन्सी ग्रेस रोमन
Just Now!
X