जगाच्या इतिहासातील एकमेव रक्तविहीन क्रांती म्हणून ज्या घटनेचा उल्लेख केला जातो, ती घटना म्हणजे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ५ लाख समाजबांधवांसोबत नागपुरात घेतलेली बौद्ध धम्माची दीक्षा होय. सम्यक क्रांतीचा हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी करण्यासाठी अनेक हात अविरत काम करत होते. यात अग्रभागी होते नागपूर शहराचे तत्कालीन उपमहापौर सदानंद फुलझेले. या बौद्ध धम्म क्रांतीपासून आजवरच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले फुलझेले १६ मार्च रोजी निवर्तले.

सदानंद फुलझेले हे जणू नागपुरातील आंबेडकरी चळवळीचे दुसरे नाव होते. त्यांचा नि बाबासाहेबांचा संबंध १९४२ मध्ये आला. तो चळवळीचा मंतरलेला काळ होता. शेडय़ुल्ड कास्ट्स फेडरेशनची स्थापना झाली होती. या संघटनेचे अधिवेशन नागपूरला झाले, तेव्हा डॉ. आंबेडकर यांना जवळून पाहण्याची संधी फुलझेले यांना मिळाली. त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १९२८चा. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना समता सैनिक दल व शेडय़ुल कास्ट फेडरेशन तसेच सामाजिक चळवळीत व राजकीय क्षेत्रात त्यांनी काम सुरू केले. १९५२ मध्ये रामदासपेठ वॉर्डातून महापालिकेची निवडणूक लढवून ते विजयी झाले. १९५६ मध्ये उपमहापौर म्हणून त्यांनी काम केले. ३ ऑक्टोबर १९५७ रोजी रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेवेळी सदानंद फुलझेले पदाधिकारी होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर बाबासाहेबांचा पूर्ण विश्वास होता. म्हणूनच रिपब्लिकन पक्षात प्रदेश अध्यक्ष आणि त्यानंतर राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. १९६३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या सचिवपदी त्यांची निवड झाली. तहहयात त्यांनी दीक्षाभूमीसाठी स्वत:ला वाहून घेतले होते. बाबासाहेबांचा वैचारिक वारसा पुढच्या पिढीला सोपवायचा असेल तर शोषित, वंचितांसाठी शिक्षणाची दारे उघडायला हवी, हे ते चांगले जाणून होते. यातून पुढे त्यांनी दीक्षाभूमी परिसरात डॉ. आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय सुरू केले. फुलझेले यांनी श्रीलंका, टोकियो, बुडापेस्ट हंगेरी, रशिया, बँकॉक, सिंगापूर, द. कोरिया, नेपाळ, अमेरिका, व्हिएतनाम, कंबोडिया, आदी देशांना भेटी देत आंबेडकरी विचारांचा आवाज बुलंद केला. विदर्भ विकास महामंडळावर संचालक म्हणून पाच वर्षे कार्य केले. नागपूर विद्यापीठाच्या सिनेट परिषदेवर ते नामनियुक्त सदस्य होते. या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्य शासनाचा शाहू फुले आंबेडकर पुरस्कार, सारथी संस्थेचा विदर्भरत्न पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांच्या जाण्याने शोषित, वंचितांच्या चळवळीचा एक गौरवशाली अध्याय संपला आहे.

solapur dr babasaheb ambedkar jayanti 2024
डॉ. आंबेडकर जयंतीचा सोलापुरात अखंड उत्साह
In front of BJP candidate Navneet Rana Congress workers shouted slogans like Vare Panja Aya Panja
जेव्‍हा नवनीत राणांसमोर ‘वारे पंजा…’च्या घोषणा दिल्या जातात…
Ambedkari movement in the Bhil community Tribal woman and Dr Babasaheb Ambedkar
आदिवासी स्त्री आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
balmaifal, symbol of revolution, dr ambedkar balmaifal
बालमैफल: क्रांतीचे प्रतीक