एखाद्या विषयात तज्ज्ञ असणे आणि त्या विषयाचा प्रत्यक्षात उपयोग करून त्यातून एक रचनात्मक व्यवस्था वाढीस लावणे तसे विरळाच. पण ह्य़ा दोहोची सांगड अगदी नेमकेपणाने घालून संग्रहालयासारखा सर्वसामान्यांच्या दृष्टीने काहीसा निरस विषय डॉ. सदाशिव गोरक्षकरांनी निगुतीने जोपासला आणि वाढवला. संग्रहालयाच्या जपणुकीत आणि त्यांच्या या योगदानाबद्दल केंद्राने त्यांचा पद्मश्री देऊन गौरव केला आहे, तर नुकताच त्यांना चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव सन्मान जाहीर झाला आहे.

प्रिन्स ऑफ वेल्स म्युझिअममध्ये (आताचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय) साहाय्यक अभिरक्षक म्हणून १९६४ मध्ये त्यांनी कारकीर्दीला सुरुवात केली. संग्रहालयशास्त्रातील डॉक्टरेटदेखील त्यांनी मिळवली. पण ते केवळ पुस्तकी संग्रहालय शास्त्रज्ञ राहिले नाहीत. त्यांनी संग्रहालयशास्त्र पुस्तकातून अंमलबजावणीच्या पातळीवर तेवढय़ाच ताकदीने उतरवले. बहुतांश वेळा एखाद्या विषयातील तज्ज्ञ प्रशासनात कमी पडतो. पण गोरक्षकर हे उत्तम प्रशासकदेखील आहेत. १९७४ ते १९९६ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे संचालक म्हणून कार्यरत असताना त्यांनी संग्रहालयात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांची भर घातली. अनेक दुर्मीळ वस्तू संग्रहालयात याव्यात यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. नवनवीन दालनं सुरू करणे, दालनांची रचना बदलणे, त्यात कलात्मकता आणणे हे त्यांचे महत्त्वाचे वैशिष्टय़ सांगावे लागेल. अभिरक्षकांना अभ्यासाच्या पलीकडे जाऊन पाहायला शिकवलं. त्यामुळे संग्रहालयशास्त्र हे केवळ पुस्तकी न राहता ते प्रत्यक्ष संग्रहालयात दिसण्यास मदत झाली.  गोरक्षकरांचे काम हे केवळ संग्रहालयाच्या चार भिंतीत बंदिस्त राहिले नाही. संग्रहालायतील तसेच काही इतर संग्रहालयातील मौलिक वस्तूंच्या आधारे त्यांनी ‘अ‍ॅनिमल इन इंडियन आर्ट’, ‘हिस्ट्री ऑफ मेरिटाईम इंडिया’ अशा प्रदर्शनांची रचना केली. आणि या प्रदर्शनातून जपान, इंग्लंड, मॉरिशस, स्वीडन येथे त्यांनी भारताचे वारसा वैभव प्रभावीपणे पोहचवण्याचे काम केले. परळ येथील शिव मूर्ती, कार्ल खंडालवाला यांचा संग्रह हा त्यांच्याच कालावधीत संग्रहालयाला मिळाला.  केवळ स्वत:च्या संग्रहालयापुरते मर्यादित न राहता त्यांनी आपल्या ज्ञानाचा वापर इतर अनेक संग्रहालयांसाठी केला. पोलीस संग्रहालय, सावरकर संग्रहालय, आर्टिलरी संग्रहालय देवळाली, सर्वोच्च न्यायालयाचे शतक महोत्सवी प्रदर्शन अशा सुमारे १६ विविध संग्रहालय व प्रदर्शनांच्या संकल्पना व रचनेत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. मेरिटाईम संग्रहालयाच्या पुनर्रचनेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. गोरक्षकरांचे वैशिष्टय़ म्हणजे प्रशासकीय कामाला संशोधनाची मोलाची जोड होती. धातू मूर्तिकला हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. पूर्व भारतातील कांस्य मूर्तीच्या र्सवकष अशा सर्वेक्षणावर आधारित पुस्तकाचे ते सहलेखक आहेत. संग्रहालयशास्त्रावर देशविदेशात अनेक शोधनिबंधांचे वाचन त्यांनी केले आहे.