शिक्षणाचे बाजारीकरण ‘अटळ’ मानले जात असताना, जगातील प्रत्येकाला आवडेल ते आणि पाहिजे ते शिक्षण मोफत उपलब्ध करून देण्याचे धाडस सलमान खान ऊर्फ ‘सल’ यांनी करून दाखविले. सुरुवातीला काहीशी हास्यास्पद वाटणारी खान यांची कल्पना आता जगातील तरुणाईची मार्गदर्शक ठरली आहे. या प्रयत्नाला नुकतीच रतन टाटा यांनीही साथ दिल्यामुळे भारतात सलमान यांच्या शिक्षणव्रताचा तळागाळातील विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकणार आहे.
साध्या बेरजांपासून ते जनुकावलीच्या रचनेपर्यंत, इंग्रजी मुळाक्षरांपासून ते संगणकीय भाषेपर्यंत सर्व प्रकारचे शिक्षण खान यांनी सुरू केलेल्या http://www.khanacademy.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणताही अर्ज न भरता, गुणवत्ता यादीत नाव आले आहे की नाही हे न पाहताच येथे वाणिज्य शाखेतील पदवीधराला अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याची मुभा आहे. शिक्षणाला कोणत्याही सीमा आणि बंधन नको हे सूत्र हातात घेऊनच ही खानप्रबोधिनी सुरू झाली. जन्माने अमेरिकन असलेले खान यंदा चाळिशीत प्रवेश करतील. त्यांचे वडील मूळचे बांगलादेशी, तर आई मूळची कोलकात्यातील. ‘मसाच्युसेट्स तंत्रज्ञान संस्थे’तून गणित, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग आणि संगणक विज्ञान या शाखेत पदवी मिळवून तेथे इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग आणि संगणक विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदव्या, पुढे हार्वर्डहून एमबीए.. असे शिक्षण झाल्यावर, नोकरी करत असतानाच २००३मध्ये सलमानने याहू डूडल नोटपॅडचा वापर करून आपल्या बहिणीला गणित शिकविले. यातूनच त्याच्या शिकवणीची अनोखी पद्धत हळूहळू इतर नातेवाईकांपर्यंत त्यांच्याकडून मित्रांपर्यंत पोहोचू लागली आणि विद्यार्थिसंख्या वाढू लागली.
१६ नोव्हेंबर २००६ रोजी खानने त्याच्या शिकवणीची यूटय़ूब वाहिनी सुरू केली. त्याच्या व्हिडीओंना मिळणारा प्रतिसाद व वाढती मागणी लक्षात घेऊन २००९ मध्ये त्याने आपली डॉक्टर पत्नी उमैमा मार्वी हिच्या मसलतीने नोकरी सोडून, पूर्णवेळ विद्यादान करण्याचा निर्णय घेतला. शंतनू बलाल, बेन, जेसन आणि मर्सिया या मित्रांनीही मदत केल्यामुळे संकेतस्थळाचा जन्म झाला. अवघड संज्ञा सोप्या भाषेत समजावून सांगण्याचे कौशल्य या संकेतस्थळाने अवगत केले आणि अल्पावधीतच त्याला यश मिळू लागले. हे संकेतस्थळ पूर्णत: देणगीवर चालते, त्यातील बहुतांश कामे ही शिक्षक वा जाणकार स्वयंसेवकांकडून पूर्ण केली जातात. यामुळे हे संकेतस्थळ लोकांनी लोकांसाठी सुरू केलेले ‘जनज्ञानपीठ’ आहे.