रांगडय़ा पंजाबी आवाजातली भांगडागीते सर्वदूर पसरली, धृपदगायकीची आठवण देणारे शबद कीर्तनही गायकीच्या जाणकारांना भावले पण पंजाबीमधील ‘ढ़ाढ़ी ’ हा संगीतप्रकार काहीसा पडद्याआडच राहिला. पंजाबी ढाल्या आवाजात सूफी संगीताचा दर्द मिसळून, शूरवीरांची गाणी गाणारे ‘ढमड’ जे गातात, ते ‘ढ़ाढ़ी’. ही परंपरा शाहिरीसारखीच, पण डफाच्या थापेवर स्वार न होता सारंगीसोबत वाहात जाणारी. तत्त्वासाठी लढणाऱ्या शीख वीरांच्या कहाण्या जीव ओतून सांगणारी. कोकेवाल्यांची गाणी उत्तर महाराष्ट्रातही ऐकली जात, त्याची आठवण अधिक करून देणारे हे संगीत. या संगीतपरंपरेचे पाईक म्हणून ज्यांना २००६ मध्ये ‘संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार मिळाला होता, ते इदू शरीफ मंगळवारी निवर्तले.

लोककलावंतांना पिढय़ान्पिढय़ा गरीबच, पिढय़ान्पिढय़ा इतरांच्या मर्जीवर अवलंबूनच ठेवणारा आपला देश स्वतंत्र झाला तेव्हापासून स्थिती बदलू लागली पण किती? याची एक कहाणी इदू शरीफ यांच्या कारकीर्दीतून उभी राहात होती. पंजाबी भाषकांबाहेर त्यांची ख्याती नव्हती हे खरे, पण पिढीजात ढ़ाडांच्या कुटुंबातले इदू शरीफ हे पंजाबी सिनेसंगीतापर्यंत पोहोचले होते, त्यांच्या काही गाण्यांचे रेकॉर्डिग उपलब्ध आहे आणि पंजाबीच्या मुख्य धारेतील अनेक गायकांनी त्यांच्याकडून धडे घेतले होते, हे सारेच विशेष. स्टुडिओत गेले तर बरे पैसे मिळत, पण एरवी खाण्यापिण्याचीही भ्रांत आणि एकत्र कुटुंब. त्यामुळे इदू शरीफ रस्त्यावरच सारंगी घेऊन बसत, गात, पैसे मिळवत. ते मूळचे लालोदा गावातले. तरुणपणी चंडीगडनजीक मणिमाजरा वस्तीत राहू लागले. संधी अनेक आल्या, पण शिक्षणाच्या अभावामुळे, कौटुंबिक कारणांमुळे त्यांना व्यावहारिक यश नेहमी हुलकावण्याच देत राहिले. त्यातच, २०११ साली त्यांना पक्षाघाताचा झटका आला. त्यातून पुरेसे सावरले नसतानाच दुसरा, तिसराही. शरीफ यांचे कुटुंबच उमेद हरवून बसले. नवज्योतसिंग सिद्धू यांनी त्यांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली, ती बहुतेक परतफेडीत गेली. तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडून संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार स्वीकारणाऱ्या तरतरीत इदू शरीफ यांचे छायाचित्र आणि त्यांचे उत्तरायुष्य यांची सांगड घालणे रसिकांसाठी कठीणच आहे.