अंजली भागवत, सुमा शिरूर, दीपाली देशपांडे, लीना शिरोडकर, अनुजा तेरे, राखी सामंत, गगन नारंग, अभिनव बिंद्र्रा, आयोनिका पॉल, विश्वजीत शिंदे… असे एकापेक्षा एक सरस नेमबाज घडवणारे द्रोणाचार्य म्हणजे संजय चक्रवर्ती. नव्वदच्या दशकात भारतीय नेमबाजीच्या क्षितिजावरील यशस्वी महिला नेमबाजांची पहिली पिढी घडवल्यानंतर देशात हा खेळ रुजून त्याची लाट आली, याचे श्रेय ‘संजयसरांना’च जाते. ऑलिम्पिक, विश्वचषक, राष्ट्रकुल, आशियाई आदी स्पर्धांत नेमबाजी हा आता हमखास पदक मिळवून देणारा क्रीडाप्रकार ठरला आहे, ही त्याचीच फलश्रुती. ज्या काळात नेमबाजीसाठी पुरेशी सराव केंद्रे, साधनसामुग्री उपलब्ध नव्हती, दोन ते सात नेमबाजांसाठी एक रायफल वापरली जायची त्या वेळी चक्रवर्ती यांनी दीपस्तंभाप्रमाणे या नेमबाजांना मार्गदर्शनाची दिशा दिली. चक्रवर्ती मूळचे उत्तर प्रदेशचे; परंतु वडिलांच्या भारतीय रेल्वेतील नोकरीमुळे मुंबईत आले. सेनादलात रुजू झाल्यावर त्यांच्या नेमबाजीच्या कारकीर्दीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. ३०व्या वर्षी ते प्रथमच राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सहभागी झाले, मग दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. परंतु कालांतराने खेळाडू घडवण्याचा वसा घेतला. अंजली-सुमा यांची पिढी घडण्याआधी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेमबाजीतील यश माफक होते, त्यामुळे पद्धतशीर प्रशिक्षणाविषयी अनास्था होती. परंतु चक्रवर्ती यांच्या तंत्रशुद्ध मार्गदर्शनामुळेच भारताला नेमबाजीत आपले स्थान अधोरेखित करता आले. त्यांची शिकवण तांत्रिक ज्ञानापुरती मर्यादित नसे, तर सैन्यदलाच्या संस्कारांमुळे चांगले खेळाडू घडवण्यासाठी शिस्त, समर्पण यांचे धडे ते देत. कारकीर्दीत झोकून दिल्याशिवाय यश मिळत नाही, असे ते नेहमी सांगत. खेळाशी खेळाडूचे नाते कसे असावे, खेळाडूची वागणूक कशी असावी, हेही चक्रवर्ती आपल्या शिष्यांमध्ये रुजवत. गेली चार दशके त्यांनी हा वसा जपला होता. महाराष्ट्र शासनाने चक्रवर्ती यांना दादोजी कोंडदेव पुरस्काराने आणि केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवले. वयाच्या ७०व्या वर्षी त्यांना कर्करोग झाला. परंतु तरीही त्यांचे प्रशिक्षणाचे कार्य खंडित झाले नाही. चक्रवर्ती यांनी स्वत:ची ‘अकादमी’ काढली नाही की आपल्या शिष्यांकडून गुरुदक्षिणाही मागितली नाही. परंतु ऑलिम्पिक विजेता शिष्य गगन नारंगची पुण्यातील ‘गन फॉर ग्लोरी’ अकादमी किंवा अन्य शिष्यांच्या अकादम्यांतही ते युवा नेमबाजांना मार्गदर्शनासाठी हिरिरीने जात. त्यामुळेच करोनाच्या आजारपणामुळे ७९व्या वर्षी चक्रवर्ती यांच्या जाण्याने नेमबाजी क्षेत्रात आधारवड हरपल्याची भावना निर्माण होणे स्वाभाविकच आहे.