28 February 2021

News Flash

सरोज खान

भारतीय नृत्याचा फिल्मी बाज लोकप्रिय करणारी नृत्यदिग्दर्शिका म्हणून सरोज खान यांचे योगदान महत्त्वाचे आहे

सरोज खान

 

कमालीची ऊर्जा, प्रचंड शिस्तीचे वातावरण आणि जोपर्यंत मनासारखे नृत्य समोरच्या अभिनेत्याकडून वा अभिनेत्रीकडून येत नाही तोवर त्यांच्याकडून करून घेतली जाणारी कठोर मेहनत हे चित्र केवळ सरोज खान यांच्याच सेटवर दिसायचे. त्यांच्यासमोर रेखासारखी प्रचंड लोकप्रिय, ताकदीची अभिनेत्री नृत्य करत असो वा करिश्मा कपूरसारखी कपूर घराण्याचा वारसा घेऊन आलेली तरुण अभिनेत्री असो.. सरोज खान यांच्यासाठी प्रत्येक जण हा मातीच्या गोळ्यासारखा होता. त्यांना आकार देण्याचे काम त्या समरसून, मेहनतीने करत. हेच त्यांच्या यशाचे गमक होते.

भारतीय नृत्याचा फिल्मी बाज लोकप्रिय करणारी नृत्यदिग्दर्शिका म्हणून सरोज खान यांचे योगदान महत्त्वाचे आहे. ऐंशी आणि नव्वदच्या दशकांतील मसालापटांत गाणीही वेगळ्या ढंगातील होती. त्या काळात जेव्हा विजय ऑस्कर, पद्मश्री गोपीकृष्ण अशी नामांकित नृत्यदिग्दर्शक मंडळी चित्रपटसृष्टीत कार्यरत होती, त्यावेळी सहायक नृत्यदिग्दर्शक म्हणून काम करून पुढे आलेल्या सरोज खान यांनी स्वतंत्रपणे नृत्यदिग्दर्शन करायचे ठरवले. त्यासाठी शास्त्रीय नृत्यशैलीला लोकनृत्याचा बाज दिला. त्यात रंग भरले,  पदन्यास आणि भावमुद्रा यांना महत्त्व दिले. भव्य, रंगसंगतीने सजलेली, मोहक अदाकारी आणि मादकतेची किनार असलेली ही नृत्ये होती. ‘खलनायक’ चित्रपटातील ‘चोली के  पीछे क्या है’ या गाण्याचा के वळ मुखडा प्रकाशित झाला आणि टीकेची एक झोड उठली. प्रत्यक्षात गाणे कसे असेल, याबद्दल चर्चा सुरू झाली. मात्र सरोज खान यांचे नृत्यदिग्दर्शन इतके  सुंदर होते की गाणे अश्लील असल्याची टीका कोणीही के ली नाही. ज्या गाण्यावर नृत्य बसवायचे आहे ते गाणे रेकॉर्डिग होत असतानाच त्या ऐकायच्या. प्रत्यक्षात रेकॉर्ड झालेले गाणे चित्रीकरणाला येईपर्यंत काही दिवस, कधी काही महिने उलटून जायचे, मात्र सरोज यांचा अभ्यास आधीच सुरू झालेला असे.

कलाकारांची एक पिढीच त्यांनी नृत्यदिग्दर्शिका म्हणून घडवली, मात्र श्रीदेवी, माधुरी दीक्षितसारख्या नृत्यप्रशिक्षित अभिनेत्रींनी सरोज खान यांच्या नृत्यशैलीला खरी प्रसिद्धी मिळवून दिली. नृत्यासाठी मेहनत घेणाऱ्यांना त्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळे, त्याउलट अनेक अभिनेत्रींना जाहीर टीके चेही धनी व्हावे लागले होते. तरीही सरोज खान यांच्याकडून नृत्याचे धडे घेण्यासाठीची कलाकारांची धडपड असे. पुढे ठेक्यावर कवायतीनृत्ये बसवणाऱ्या शामक दावरसारख्या नृत्यदिग्दर्शकांनी सरोज खान यांची सद्दी संपवली. भारतीय चित्रपट, गीत-संगीत-नृत्य संस्कृतीची जाण आणि अभ्यास असणाऱ्या सरोज खान या अखेरच्या नृत्यदिग्दर्शिका ठरल्या. त्यांच्या जाण्याने भारतीय नृत्यशैलीचा प्रभाव असलेल्या फिल्मी बाजाच्या नृत्यशैलीचे पर्वच लयाला गेले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 12:01 am

Web Title: saroj khan profile abn 97
Next Stories
1 लीलाधर कांबळी
2 पंडितकाका कुलकर्णी
3 कमल शेडगे
Just Now!
X