20 January 2021

News Flash

सत्या पॉल

‘भारतीय साडी’ खऱ्या अर्थाने अखिल भारतीय झाली.

स्वातंत्र्यपूर्व काळात असहकार चळवळीतील स्त्रियांनी ‘सकच्छ की विकच्छ’ यासारख्या वादांना फाटा देऊन खादीच्या पाचवारी साडय़ा नेसणे सुरू केले, तेव्हा ‘भारतीय साडी’ खऱ्या अर्थाने अखिल भारतीय झाली. मग पुढे ‘खटाव वॉयल’ सारख्या अनेक साडी-कंपन्यांतील अनेकानेक टेक्स्टाइल डिझायनरांनी भरपूर काम करून, काठापदराच्या साडीऐवजी नव्या डिझाइनच्या साडय़ा लोकप्रिय केल्या! यानंतर सत्या पॉल (जन्म २ फेब्रु. १९४२- मृत्यू ६ जानेवारी २०२१) साडीच्या क्षेत्रात उतरले आणि तिथे त्यांनी क्रांती केल्याचे मानले जाते.. मग सत्या पॉल यांचे नेमके वैशिष्टय़ ते काय?

ते सविस्तरच सांगावे लागेल. साडी भारतीय होती, समकालीन होती, छपाईदार डिझाइनचीही होती हे सारे खरे; पण ही साडी फॅशन डिझायनिंगमध्ये येण्यासाठी जे आवश्यक होते, ते सत्या पॉल यांनी दिले. फॅशन डिझाइन ही अखेर एक दृश्यकला. अन्य दृश्यकलांप्रमाणेच मानवी भावनांचे कल ओळखून त्यांच्याशी नाते जोडणे हे याही क्षेत्रातील कलावंत करतात. चित्रशिल्पादी कलांत अनेकदा चित्राचा वा शिल्पाचा ‘विषय’ हाच प्रेक्षकाचा भावनिक कल जोखणारा ठरतो, पण फॅशनमध्ये तसे नसते. इथे वस्त्राचा प्रकार म्हणजे त्याचा पोत, डिझायनरने निवडलेले रंग, आकार एवढे मूळ घटकच हाताशी असतात. मग कुणी प्रतिष्ठा वा दबदब्याशी, कुणी उत्फुल्लपणाशी, कुणी मैत्रीपूर्ण आवाहकपणाशी, तर कुणी भावदर्शक रंगांशी नाते जोडून त्यासाठी प्रख्यात होतो. एक डिझायनर म्हणून सत्या पॉल यांचे असे नाते ‘विस्मय’ किंवा चमत्कृतीशी होते. भपकेदार वाटणारे जर्द रंग ते वापरत. गुलाबी, लाल, गुलबक्षी रंग तर होतेच; त्या आनंदी- स्त्रण रंगांना फिरोझी, राखी, हळदीपिवळा अशा थेट विरोधी नाही, पण मिश्र आणि अनवट छटांची जोड सत्या पॉल अशी काही देत की, रंगांचे पारंपरिक अर्थ बदलून टाकणारा, विशिष्ट कपडय़ामधील त्या रंगांच्या वापराकडेच लक्ष वेधणारा सर्वरंगसमभाव दिसे.

सत्या पॉल यांचा जन्म फाळणीपूर्व पंजाबातला. पण कुटुंब आधीच भारतात आले, १९६० च्या दरम्यान कापड निर्यातीचा व्यवसाय सत्या यांनी सुरू केला. ‘खास भारतीय’ म्हणून हातमागाची किंवा रेशमी वस्त्रे परदेशांत पाठवायची; जमदानी, जामावार आदी शोभिवंत प्रकारही विकायचे, असे सुरू असताना वयाच्या तिशी-पस्तिशीत, या पारंपरिक कापडांवर छपाईचे तंत्र सत्या पॉल यांनी वापरून पाहिले.. ही नवी सुरुवात होती! हातविणीच्या कापडाचे वा साडीचे डिझाइन हे विणीतच असते, हे गृहीतकच सत्या पॉल यांनी नाकारले. प्रिंटमध्ये पारंपरिक वा फुले-पाने-नक्षी हे सारे ‘खटाव’मध्येही मिळे; पण भौमितिक आकारांचा डौल सत्या पॉल यांनी आणला आणि मुख्य म्हणजे ‘अंगभर ठरावीक पॅटर्न’ हे छापील साडीचे चलन बदलून, अख्खी साडी हे एक ‘स्टेटमेंट’ अथवा दृश्यविधान मानण्याची रीत सुरू केली! हे खरोखर नवीन होते. १९८५ साली आपल्या ‘लेबल’चे पहिले दुकान काढणाऱ्या पॉल यांनी २००१ मध्ये मुलाकडे व्यवसाय सोपवून निवृत्ती घेतली, तर २०१० पासून त्यांनी डिझायनिंगही थांबवले. साडीप्रमाणेच पुरुषांचे टाय डिझाइन करण्यासाठी त्यांची ख्याती होती. अगदी बॅगा आणि अन्य वस्तूही ‘सत्या पॉल’ लेबलाच्या मिळत, परंतु खरे वैशिष्टय़ वस्त्रांतच होते. निवृत्तीनंतर ईशयोगाकडे वळलेल्या पॉल यांचे निधन कोइमतूर आश्रमातच झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 1:03 am

Web Title: satya paul mppg 94
Next Stories
1 ए. माधवन
2 गॅरी रन्सिमन
3 विलासकाका पाटील-उंडाळकर
Just Now!
X