News Flash

सत्यप्रिय महाथेरो

जुन्या बौद्ध मठामध्ये सत्यप्रिय महाथेरो यांनी अनेक लढवय्यांना आश्रय दिला.

समाजोपयोगी काम तसेच राष्ट्रप्रेमाची भावना यांना कोणताही धर्म मर्यादा घालत नाही. धर्माचे अनुयायी मात्र या मर्यादा लादत असतात : म्हणजे, परधर्माचे नागरिक राष्ट्रप्रेमी नाहीतच असे गृहीत धरतात किंवा परधर्मीयांना सामावून घेणारे सामाजिक कार्य केल्यास, धर्मातराच्या इराद्याचा ठपका ठेवला जातो. ज्यांना आपापल्या धर्मामधील मानवतेचे मूळ तत्त्व उमगले आहे असे काही जण मात्र, इतरांनी कोतेपणाने लादलेल्या मर्यादांना धूप घालत नाहीत. अशांचा जीवनक्रम केवळ स्वधर्मापुरता मर्यादित राहत नाही. बांगलादेशातील बौद्ध धर्मगुरू सत्यप्रिय महाथेरो हे अशा मोजक्या मानवतानिष्ठांपैकी एक होते. त्यामुळेच, चार ऑक्टोबरच्या शुक्रवारी त्यांचे निधन झाल्याची वार्ता पोहोचल्यावर अनेक देशांतील भारतीय दूतावासांनीही दु:ख व्यक्त केले.

सत्यप्रिय महाथेरो यांचे मूळ नाव बिधुभूषण बरुआ. कॉक्सबझार जिल्ह्यात १० जून १९३० रोजी त्यांचा जन्म झाला. बालवयातच ते धार्मिक शिक्षण घेऊ लागले आणि थेरवाद बौद्ध पंथाचे भिख्खू बनले. कुमारवयात फाळणीतील धार्मिक तेढ दुरूनच पाहिलेले महाथेरो चाळिशीच्या आसपास होते, तेव्हा तत्कालीन पूर्व पाकिस्तानात मुक्तिवाहिनीची चळवळ सुरू झाली. भाषा आणि स्थानिक संस्कृतीवरील आक्रमणाविरुद्ध त्या देशातील बांगलाभाषक लढू लागले आणि पाकिस्तानच्या हुकमाचे ताबेदार असलेले लष्कर या भाषाप्रेमी लढवय्यांना दिसताक्षण गोळ्या घालू लागले. अशा काळात रामू या गावातील जुन्या बौद्ध मठामध्ये सत्यप्रिय महाथेरो यांनी अनेक लढवय्यांना आश्रय दिला. शेकडो जीव वाचविले.

बांगलादेशमुक्तीनंतरही, त्यांनी हा बौद्ध मठ सर्वधर्मीयांसाठी खुला ठेवला. पंचक्रोशीतील गरिबांसाठी अन्न, शुश्रूषा या गरजा पुरवण्याचे काम अंगीकारताना त्यांनी कुणाचा धर्म पाहिला नाही. हा जीवनक्रम २०१२ पर्यंत अव्याहत सुरू होता. पण त्या वर्षी बांगलादेशच्या त्या भागात एका फेसबुक-नोंदीचे निमित्त होऊन, लोकसंख्येचे प्रमाण अवघा एक टक्का असलेल्या  बौद्धांविरुद्ध हिंसाचार उसळला. मुस्लीम धर्मीय दंगेखोरांनी, अल्पसंख्याकांना कायमची जरब बसवण्यासाठी बहुसंख्याक दंगेखोर जे जे करतात, ते ते सारे केले. या हिंसाचारात रामू येथील मठ उद्ध्वस्त करून जाळला गेला. पिढय़ान्पिढय़ा तिथे असलेली वास्तू होत्याची नव्हती झाली. खुद्द सत्यप्रिय महाथेरो यांना वयाच्या ७२ व्या वर्षी, जीव वाचविण्यासाठी भातशेतीत लपून राहावे लागले. उद्ध्वस्त मठ पुन्हा उभारण्यासाठीच्या पहिल्या सभेत, ‘मला केवळ मठ नव्हे, सद्भाव होत्याचा नव्हता झालेला दिसतो आहे,’ असे महाथेरो म्हणाले होते.

बांगलादेश सरकारने २०१५ साली त्यांना ‘एकुशे पदक’ हा राष्ट्रीय सन्मान दिला. ढाक्यातील शेख मुजीब आयुर्विज्ञान संस्थेत १५ सप्टेंबरपासून अत्यवस्थ सलेल्या महाथेरोंनी अखेर जगाचा निरोप घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 2:09 am

Web Title: satya priya mahathero profile zws 70
Next Stories
1 कोलातुर गोपालन
2 माया परांजपे
3 क्रिस्टलिना जॉर्जीव्हा
Just Now!
X