सुमारे ४० वर्षांपूर्वी १९७९ मध्ये एका महिलेने विज्ञानातील अगदीच वेगळ्या क्षेत्रात मुशाफिरी करण्याचे धाडस केले, आज त्या नामांकित भूभौतिकशास्त्रज्ञ (जिओफिजिसिस्ट) आहेत. त्यांना नुकताच पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा पहिला महिला वैज्ञानिक पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे नाव आहे डॉ. कुसला राजेंद्रन.

महासागर विज्ञान, वातावरण तंत्रज्ञानातील कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. त्या बेंगळूरुच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या संस्थेत प्राध्यापक आहेत. १९७९ मध्ये त्यांनी उपयोजित भूभौतिकशास्त्रात रुरकी विद्यापीठातून एम-टेक केले. रसायनशास्त्रातील पदवी असूनही त्या रुरकी येथे शिकायला गेल्या कारण तिथे त्यांची बहीण काम करीत होती. तिथे त्या रसायनशास्त्र शिकण्याच्या उद्देशाने गेल्या असताना त्यांनी प्रत्यक्षात भूभौतिकीची वाट निवडली. त्या वेळी भूकंपशास्त्र हा विषय महिलांसाठी वेगळाच होता, पण त्यांनी त्यात काम करण्याचे ठरवले. १९८१ मध्ये सेंटर फॉर अर्थ सायन्स स्टडीज या संस्थेत त्यांनी काम सुरू केले. नंतर अमेरिकेत जाऊन युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅरोलिना विद्यापीठातून पीएचडी केली. देशप्रेमापोटी भारतात परतून येथील भूकंपाचा त्यांनी सखोल अभ्यास केला. किल्लारी (१९९३) व भूज(२००१) भूकंपांच्या अभ्यासाआधारे त्यांनी काही पुस्तकेही लिहिली. २००७ मध्ये डॉ. राजेंद्रन या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेसमध्ये सुरू झालेल्या सेंटर फॉर अर्थ सायन्सेसमध्ये रुजू झाल्या.

भूकंपाचा अभ्यास करण्यासाठी भूगर्भशास्त्राचा अभ्यास आवश्यक असतो. कुसला या त्यांच्या पतीसमवेत याच क्षेत्रात काम करीत आहेत. वादळांचा अभ्यास करून अंदाज वर्तवता येतो तसा भूकंपाचा अंदाज वर्तवता येत नाही. यात केवळ आधीच्या भूकंपांचा अभ्यास करून काही प्रारूपे तयार करून सूचना देता येतात, पण त्यातही फार काही सांगता येत नाही त्यामुळे हे शास्त्र अवघड आहे असे त्यांचे मत आहे. कुसला व त्यांचे पती सीपी राजेंद्रन (भूभौतिकशास्त्रज्ञ) यांनी तमिळनाडूतील कावेरीपट्टिनम येथील २००४ च्या सुनामीचा अभ्यास केला. तेथे पूर्वी, चोल राजांच्या काळातही असे घडल्याचा अंदाज त्यांनी मणीमेखलाई या खंडकाव्यातून बांधला. राजेंद्रन यांनी तेथील वाळूच्या थरांचा अभ्यास केला असता तेथे खरोखर एक हजार वर्षांपूर्वी सुनामी आली होती हे सिद्ध झाले. गुजरात, महाराष्ट्र व हिमालयातील भूकंपाचा मोठा अभ्यास त्यांनी केला असून किमान ४० शोधनिबंध सादर केले आहेत.