27 February 2021

News Flash

कॉ. मधु शेटय़े

शिवसेनाप्रमुखांना ‘बाळ’ या नावाने हाक मारू शकणाऱ्या काही मोजक्या मंडळींत मधु शेटय़े होते.

सामाजिक भान, मूल्यनिष्ठा हे पत्रकाराकडे आवश्यक असणारे मूलभूत ऐवज. याव्यतिरिक्त लोकलढे, प्रसंगी तुरुंगवास आणि वेळ आली तेव्हा राजकारणात येऊन लोकप्रतिनिधित्वही करणारी पत्रकारांची एक पिढी महाराष्ट्राने पाहिली आहे. या पिढीचा बहुधा शेवटचा प्रतिनिधी बुधवारी मधु शेटय़े यांच्या जाण्याने लोप पावला.

स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ पत्रकार, लेखक, मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक यापेक्षा पत्रकारांच्या लढाऊ चळवळीचा नेता ही मधु शेटय़े यांची ओळख अधिक समर्पक ठरते. लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि समाजमनाची अभिव्यक्ती म्हटला जाणारा पत्रकार हा अल्पवेतनी पांढरपेशा नोकरदार बनून राहणार नाही, याचे पहिले भान त्यांनीच दिले. त्यासाठी सक्रियताही त्यांनी दाखविली. ‘बॉम्बे युनियन ऑफ जर्नालिस्टस’मार्फत पत्रकारांच्या हक्कासाठी झालेल्या लढय़ात मधु शेटय़े अग्रभागी राहिले. इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्टस या श्रमिक पत्रकारांच्या राष्ट्रीय संघटनेतही ते सक्रिय होते. दर तीन वर्षांनी पत्रकारांसाठी वेतन आयोग स्थापून, वेतनवाढीचा प्रघात या प्रयत्नांतून सुरू झाला. आर्थिक बाजूची काळजी घेतल्यानंतर, पत्रकारांसाठी सांस्कृतिक व व्यावसायिक मंच म्हणून मुंबई प्रेस क्लबच्या घडणीतही त्यांचा मोलाचा वाटा राहिला.

वयाच्या १२व्या वर्षी ‘चले जाव’ चळवळीत सहभाग, नाविकांच्या बंडात मुंबईच्या रस्त्यावर पोलिसांच्या लाठय़ा झेलण्याचा ‘संस्कार’ ८९ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपला. गोवामुक्ती, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भूमिगत कारवाया, तुरुंगवास भोगावा लागावा इतकी त्यांची सक्रियता होती. कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने त्यांनी गिरगावातील पूर्वाश्रमीच्या चिखलवाडी प्रभागातून दोनदा निवडणूक लढली आणि दोन्हींत ते यशस्वी ठरले. १९६०च्या दशकातील त्या निवडणुकात धनशक्तीपेक्षा लोकशक्ती हा महत्त्वाचा घटक होता आणि हाडाचा पत्रकार असल्याने जनसामान्यांशी कायम नाळ शेटय़े यांच्या स्वभावगुणातच होती. शिवसेनाप्रमुखांना ‘बाळ’ या नावाने हाक मारू शकणाऱ्या काही मोजक्या मंडळींत मधु शेटय़े होते. सामाजिक जाणिवांविना घडलेली ‘गहाळ पिढी’ असा पत्रकारांच्या आजच्या पिढीचा उल्लेख करण्यामागे तुच्छतेपेक्षा त्यांची आत्मीयताच असे. म्हणूनच प्रेस क्लबमध्ये तरुण पत्रकारांशी त्यांचा सहज संवाद, ज्येष्ठतेचा कोणताही अहंभाव न राखता होत असे. त्यांनाही ‘मधु’ असे एकेरी नावाने संबोधणारे अनेक तरुण पत्रकार म्हणूनच पाहायला मिळत. इंग्रजी वृत्तपत्र-नियतकालिकांमध्ये पत्रकारिता करीत असताना, त्यांनी मराठीत पुस्तिकांचे लेखनही केले. त्यांचे हे लेखन योगदान त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2019 4:34 am

Web Title: senior journalist activist madhu shetye profile zws 70
Next Stories
1 सुधीर दर
2 शौकत कैफी आझमी
3 नितीन काकडे
Just Now!
X