१९८०च्या दशकात गुगल नव्हते वा विविध वाहिन्याही नव्हत्या त्या काळात इस्लामी देशांतील विविध घडामोडींवर मराठीतून अभ्यासपूर्ण लिखाण करणाऱ्या मोजक्या लेखकांमध्ये मुजफ्फर हुसेन यांचे नाव घ्यावे लागेल. पाकिस्तान वा अरब देशांतील महत्त्वाच्या घटनांवर विविध वृत्तपत्रांचे संपादक त्यांना आवर्जून लिहायला सांगत. कोणताही पूर्वग्रह न ठेवता एखाद्या विषयाचे नेमके विवेचन करणे, हा त्यांच्या लेखनाचा महत्त्वाचा पैलू होता.

मुजफ्फर हुसेन यांचा जन्म २० मार्च १९४०चा. भोपाळ ही त्यांची जन्मभूमी. विक्रमविश्वविद्यालयातून ते पदवीधर झाल्यानंतर नोकरीसाठी मुंबईत आले आणि मग इथलेच बनून गेले. वकील होण्याची इच्छा असल्याने त्यांनी विधि शाखेची पदवी घेतली.  त्यांनी कधी वकिली केली नाही पण इस्लाममधील तलाकसारख्या जाचक प्रथा-परंपरांवर तसेच दहशतवादावर त्यांनी आपल्या प्रभावी भाषणांतून वेळोवेळी टीका केली. लेखनातून त्यावर निर्भीडपणे आसूड ओढले. ते कट्टर राष्ट्रवादी मुस्लीम आणि लढवय्ये पत्रकार होते. सामाजिक चळवळीतही त्यांचे योगदान होते.

हुसेन यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व  होते. दहशतवाद, मुस्लीम राष्ट्रांमधील घडामोडी यावर त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांची विविध विषयांवरील अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली. ‘इस्लाम व शाकाहार’, ‘मुस्लीम मानसशास्त्र’, ‘दंगों में झुलसी मुंबई’, ‘अल्पसंख्याक वाद- एक धोका’, ‘इस्लाम धर्मातील कुटुंबनियोजन’, ‘लादेन, दहशतवाद आणि अफगाणिस्तान’, ‘समान नागरी कायदा’ ही त्यांची  पुस्तके वाचकप्रिय ठरली. मुंबईतील विश्व संवाद केंद्राच्या स्थापनेपासून ते उपाध्यक्ष होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा जवळचा संबंध होता. मुस्लिमांनी हिंदूंशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवणे गरजेचे आहे हे नेहमीच ते निक्षून सांगत. गेल्या अनेक वर्षांपासून ते शाकाहारी बनले होतेच, पण ‘इस्लाम व शाकाहार’ या बहुचर्चित पुस्तकात त्यांनी याविषयी सविस्तर भाष्यही केले आहे. ते जितके सच्चे मुसलमान होते तितकेच सच्चे सावरकरभक्तही होते. सावरकरांचा हिंदुत्ववाद भारताच्या राष्ट्रीयत्वाशी जोडला गेलेला आहे, हे त्यांनी मान्य केले होते. ते जितक्या अभिमानानं कुराण पठण करत तितक्याच अभिमानानं वंदे मातरम्ही म्हणत. ‘पद्मश्री’ किताबासह अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले होते. परभणी येथे झालेल्या समरसता साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. राष्ट्रीय एकजूट या विद्याधर गोखले अध्यक्ष असलेल्या  मंचाच्या उभारणीत आणि कार्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांच्या निधनाने मुस्लीम समाजातील उत्तम प्रबोधक व व्यासंगी पत्रकार आपल्यातून निघून गेला आहे.