महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचा वसा घेऊन ५०-५० वर्षांपूर्वी जी पिढी पुढे येऊन पुरोगामी चळवळीत सक्रिय झाली, त्यात प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर यांचा आवर्जून नामोल्लेख करावा लागेल. त्या काळी जमातवादाचा प्रभाव असूनही मुस्लीम समाजातून हा बंडखोर आणि जिज्ञासू वृत्तीचा तरुण पुढे येतो आणि स्त्रियांच्या तलाक प्रश्नावर हमीद दलवाई यांच्याबरोबर मुस्लीम सत्यशोधक समाजाशी जोडला जातो. पुढे प्रा. डॉ. मोईन शाकीर आणि डॉ. असगरअली इंजिनीयर यांच्या संपर्कात आल्यानंतर प्रा. बेन्नूर यांच्या सामाजिक वाटचालीची दिशा बदलली तरी स्त्रियांच्या प्रश्नांवरील त्यांची मते अखेपर्यंत ठाम होती.

स्त्री शिक्षण, स्त्रियांचे स्वातंत्र्य आणि स्वावलंबन, त्यांचा सन्मानाने जगण्याचा हक्क याविषयी ते नेहमीच जागरूक राहात. बागवान या मुस्लीम ओबीसी समाजात जन्मलेले प्रा. बेन्नूर हे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे कट्टर समर्थक, सामाजिक  सौहार्दाचे सच्चे पुरस्कर्ते आणि विवेकवादी होते. मात्र कधीही कोणतीही वैचारिक गुलामगिरी त्यांनी पत्करली नाही. महात्मा गांधीजी हा त्यांचा श्रद्धेचा विषय असूनही ते गांधीवादी झाले नाहीत. मार्क्‍सवादाविषयी आपुलकी निर्माण झाली तरीही ते मार्क्‍सवादी झाले नाहीत. समाजवादी, आंबेडकरी चळवळीशी खूप घनिष्ठ संबंध आला. मात्र तरीही त्याचा शिक्का त्यांनी लावून घेतला नाही. निधर्मवादी राज्यव्यवस्थेच्या संकल्पनेवर त्यांची अगाध निष्ठा होती. ती आयुष्याच्या अखेपर्यंत त्यांनी कधीही ढळू दिली नाही. सामाजिक चळवळ पुढे नेताना प्रा. बेन्नूर हे मुस्लीम ओबीसी चळवळीबरोबरच मुस्लीम मराठी साहित्य परिषदेची उभारणी करून थांबले नाहीत, तर ही चळवळ नेहमीच सक्रिय कशी राहील, याची काळजी ते नेहमीच घेत. राष्ट्रीय एकात्मता परिषद, विचारवेध संमेलन आदी चळवळीलाही त्यांनी बळ देण्याचे काम केले. १९८०च्या सुमारास गुजरातेत राखीव जागांच्या विरोधात आंदोलन सुरू झाले तेव्हा त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी राखीव जागांचे कट्टर समर्थक असलेल्या प्रा. बेन्नूर यांनी त्याच काळात सोलापुरात डॉ. अरुण लिमये यांच्यासमवेत राखीव जागा समर्थन परिषद भरविली होती. त्यांच्या साहित्यलेखनात हिंदू-मुस्लीम ऐक्य व मुस्लीम समाजाच्या समस्यांचे पैलू आढळतात. आज सोमवारी त्यांना मानपत्र प्रदान करण्याचे तसेच त्यांच्या तीन पुस्तकांच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन करण्याचे ठरले होते; परंतु  शुक्रवारीच बेन्नूर यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने पुरोगामी विचारवंत आपण गमावला आहे.