उर्दू साहित्याचा तो सोनेरी काळ. मीर, गालिबला जाऊन शतके लोटली होती. पण या दोघांपैकी कोणाची अभिव्यक्ती श्रेष्ठ आहे, यावर उर्दू सारस्वतांच्या तासन्तास चर्चा घडत. दोघांच्याही ‘काफिया’, ‘मिसऱ्यां’चे दाखले दिले जात. पण या युक्तिवादात केवळ शब्दच्छलच अधिक असे. अशा काळात, म्हणजे साठच्या दशकात शम्सुर रहमान फारुकी हे साक्षेपी विश्लेषक उर्दू साहित्यविश्वात दाखल झाले. त्यांनी ‘तनकीद’ अर्थात साहित्यावरील विश्लेषणात्मक टीकेच्या पारंपरिक पद्धतीलाच छेद दिला. सखोल आणि तटस्थ अभ्यासाच्या बळावर फारुकी यांनी मीर, गालिबच नव्हे तर फैज, जौक यांच्याही शायरीचे वस्तुनिष्ठ आकलन वाचकांपुढे ठेवले. यामुळे उर्दू समीक्षेत कायमच आदरणीय ठरलेल्या फारुकी यांची निधनवार्ता शुक्रवारी आली, तेव्हा उर्दू साहित्यातील शहाणिवेचा आवाज स्तब्ध झाल्याची सार्वत्रिक भावना व्यक्त झाली.

फारुकी यांचा जन्म अलाहाबादचा. तेव्हा अलाहाबादचे प्रयागराज झाले नव्हते. त्यामुळे अर्थातच ‘गंगा-जमनी तहजीब’ कट्टर धर्मवाद्यांच्या परिघाबाहेर आनंदाने नांदत होती. गंगा-यमुनेच्या काठावरील हिंदू-मुस्लिमांच्या एकत्रित संस्कृतीच्या प्रतिमा तेथील सर्व शायर-कवींच्या रचनांमधून प्रतिबिंबित होत होत्या. फारुकी ते साहित्य वाचतच लहानाचे मोठे झाले. पुढे लिहिते झाले. त्याकाळी आजच्याइतका धर्मज्वर टोकाचा नसला, तरी अधूनमधून काही ठिकाणी तो डोके वर काढीच. अशा वेळी समाज एकसंध ठेवायचा असेल तर साहित्याचा हा वारसा प्राणपणाने जपला पाहिजे, असा फारुकी यांचा आग्रह होता. त्यांच्या साऱ्याच लेखनात ही दृष्टी आणि तिचा आग्रह दिसतो. साठच्या दशकाच्या शेवटाकडे त्यांनी-

‘मसल कर फेंक दूँ आँखें तो कुछ तनवीर हो पैदा

जो दिल का खमून कर डालूँ तो फिर तासीर हो पैदा’

अशा जहाल शब्दांत आपल्या मनातला कोलाहल कागदांवर उतरवला होता खरा; पण त्यामागे आधुनिक जगाची ओढ होती. त्यामुळेच तब्बल ५० वर्षे त्यांनी नेटाने चालवलेल्या ‘शबखून’ या नियतकालिकातून उर्दू साहित्याचे आधुनिक पडसाद उमटले. ‘दास्तानगोई’ या सोळाव्या शतकातल्या कथनप्रकाराचे पुनरुज्जीवन करण्याचे श्रेय ज्यांना दिले जाते, त्यात फारुकी यांचेही नाव समाविष्ट आहे. शायरी, गजल वा कादंबरी- साहित्य प्रकार कुठलाही असो, फारुकी यांच्या लेखनाच्या मुळाशी समाजहिताचा विचार कायम राहिला. ऐंशीच्या दशकात ‘तनकिदी अफकार’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार, नव्वदच्या दशकात मीर ताकी मीर यांच्या कवितांवरील चतरुखडी समीक्षाग्रंथाला सरस्वती सन्मानाने आणि गेल्या दशकात पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. स्वत:च्या बऱ्याचशा लेखनाचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला आहे.