04 March 2021

News Flash

शंकर बडे

राज्य शासनाने त्यांना मतदान जागृतीचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले होते.

वऱ्हाडात ज्या काळात बाजीराव पाटील, शरच्चंद्र सिन्हा, प्रा. देवीदास सोटे, प्रा. विठ्ठल वाघ यांच्यासारखे कवी, कथाकार वऱ्हाडी भाषासमृद्धीसाठी साहित्यनिर्मिती आणि प्रख्यात मराठी शायर भाऊसाहेब पाटणकर वऱ्हाडी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवत होते त्याच काळात बोरी अरबसारख्या गावातील पस्तिशीतील शंकर बडे नावाचा तरुण अस्सल वऱ्हाडी बोलीतून ग्रामीण जीवनाचे वेदनादायी चित्र विनोदाच्या कोंदणात बसवून भिंगरीसारखा फिरत राज्यभर काव्यमंच गाजवत होता. ‘बॅरिस्टर गुलब्या’ आणि ‘अस्सा वऱ्हाडी माणूस’ या एकपात्री प्रयोगांनी उभ्या महाराष्ट्रात त्यांनी रसिक श्रोत्यांना वेड लावले होते. ‘पावसानं इची बहीन कहरच केला अन् नागो बुढा म्हने काल वाहूनच गेला..’ या त्यांच्या पहिल्याच कवितेच्या ढंगदार सादरीकरणाने तर असा काही विक्रम केला की, शंकर बडे यांचा कोणताही कार्यक्रम या कवितेशिवाय पारच पडत नसे.

बडे यांच्या साध्या सरळ आणि सर्वावर निष्पाप प्रेम करणाऱ्या व्यक्तित्वातून प्रगट होणाऱ्या डोळ्यांत करुणा, हृदयात प्रेम व ओठांवरील हास्य कुणालाही भुरळ पाडत असे. आयुष्यात जीवघेण्या स्पध्रेत माणूस जी ‘धापाधापी’ करतो, माझं माझं करीत भौतिक सुखासाठी झटतो, त्यांना बडे सांगत की, ‘वाडी, माडी, गाडी, घोडी कस्या वाकुल्या दावते, ज्याची मिरवली शान थे तं इथचं राह्य़ते’, ‘माहं माहं म्हनत रे राहे सांगाच्या गोठी, आखरीच्या वखताले पानं तुयसीचा ओठी’. बडे यांचे वैशिष्टय़ हे की, हृदयात शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदनांचा सागर साठवत रसिकांना मात्र त्यांनी सतत हसत ठेवले. त्याच वेळी डोळ्यांत येणारा अश्रूंचा पूर पापणबांधावर अडवून ठेवणे तुम्हाला शक्य नसल्याचाही अनुभव त्यांनी ‘गाद्यांवरचा पावना, बास्यावरती झोपला जसा, आला येकलाच तसा चालला येकलाच’ अशा शब्दकळेतून श्रोत्यांना दिला. ‘इरवा’, ‘मुगूट’, ‘सगुना’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘गोंदन’ आणि ‘धापाधापी’ ही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर होती. विदर्भ साहित्य संघाच्या आर्णी येथील संमेलनाचे आणि मेटीखेडा येथील राज्यस्तरीय मजूर साहित्य संमेलनाचे अराज्य शासनाने त्यांना मतदान जागृतीचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले होते.ध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. विविध संस्थांचे लोकमित्र, कलायात्री, कृतार्थ असे पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले होते. नवोदित वऱ्हाडी कवींचा आधारवड असलेल्या बडे यांच्या साहित्यसेवेचे ऋण व्यक्त करण्यासाठी यवतमाळकरांनी त्यांचा भव्य सत्कार केला होता. राज्य शासनाने त्यांना मतदान जागृतीचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले होते.

शेतकरी व कष्टकऱ्यांच्या दु:खाशी नाते सांगणारा ‘बाबा’ म्हणून ओळख असलेले शंकर बडे मेंदूत रक्तस्राव झाल्याने रुग्णालयात दाखल होऊन ऐन पोळ्याच्या दिवशीच सत्तरीच्या उंबरठय़ावरून इहलोकाची यात्रा सोडून गेल्याने सर्वत्र व्यक्त झालेली हळहळ अधिकच गडद झाली.

((   शंकर बडे  )))

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2016 3:21 am

Web Title: shankar bade
Next Stories
1 नलिनीधर भट्टाचार्य
2 जो सटर
3 अनुराधा राव
Just Now!
X