पत्रकारितेत राहून साहित्याच्या जगात विहार करणारे अनेक ज्येष्ठ पत्रकार आहेत. ही परंपरा अगदी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांपासून सुरू होते आणि ती अखंडितच आहे. शंकर सारडा हे या परंपरेतील एक लक्षात राहणारे व्यक्तिमत्त्व. दैनिकाच्या धबडग्यात बातमीदारी किंवा बातम्यांची भाषांतरे करणे, याहून जरा निराळे पण आवडीचे असे पुरवणी संपादनाचे काम त्यांना मिळाले आणि त्यामुळेच त्यांना त्यांचा व्यासंगही करता आला. उत्तम लेखक आणि समीक्षक ही त्यांची ओळख. वृत्तपत्रीय स्तंभांमध्ये येणारी पुस्तक परीक्षणे ही परिचयात्मक न राहता, त्यामध्ये अधिक सखोलता यायला हवी, असा सारडा यांचा हट्ट असे. त्यांनी लिहिलेली परीक्षणे याची साक्ष आहेत. त्या लेखनामुळे साहित्य वर्तुळात त्यांचा दबदबा तर निर्माण झालाच, परंतु स्वत:च्या लेखनाकडेही त्यांना समीक्षकाच्या नजरेतून पाहता आले. लहानपणापासून असलेली वाचनाची आवड जशी त्यांच्या उपयोगाला आली, तशीच लेखनाची पारखही करता आली. ज्या काळात मराठी साहित्यामध्ये आधुनिकतेचा प्रवाह क्षीण स्वरूपात का होईना सुरू झाला, तेव्हा शंकर सारडा यांनी त्या प्रवाहाला उजळ केले आणि वासूनाका, चक्र यांसारख्या कादंबऱ्यांचे महत्त्व वाचकांसाठी अधोरेखित केले. आनंद, साधना यांसारख्या नियतकालिकातून ते लिहिते झाले आणि त्यांनी स्वतंत्र लेखनालाही प्रारंभ केला. टॉलस्टॉय, गीबन यांच्या कादंबऱ्यांचा अनुवाद आणि सोन्याच्या टेकडीचा शोध, जादूमंतर छू, शर्थ पराक्रमाची यांसारख्या बालसाहित्यात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांच्या नावावर जमा आहेत. विश्वसाहित्याची मराठी वाचकांना ओळख करून देणारा त्यांचा ग्रंथही वाचकप्रिय ठरला. बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जसे त्यांनी भूषवले, तसेच विभागीय साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष राहिले. महाराष्ट्र टाइम्स या दैनिकाच्या साप्ताहिक पुरवणीला साहित्यिक अंगाने नटवण्याचे त्यांचे कसब त्या काळी अतिशय नावाजले गेले. मराठी ग्रंथव्यवहारात वृत्तपत्रीय परीक्षणांचे महत्त्व वाढीस लावण्यासाठी सारडा यांनी प्रयत्न केले. साहित्य हा केवळ करमणुकीचा विषय नसून त्याकडे अधिक गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे, या त्यांच्या भूमिकेमुळे साहित्य जगात नव्या विचारांना दिशा मिळाली. नव्या लेखकांना प्रोत्साहन देत असतानाच त्यांच्या साहित्यिक कृतीचे यथायोग्य मूल्यमापन करण्याचे कामही त्यांनी केले. साधना साप्ताहिकात सहसंपादक म्हणून काम करताना वैचारिक लेखनाकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज त्यांच्या लक्षात आली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नियतकालिकाचे संपादन करतानाही त्यांनी जाणीवपूर्वक साहित्यिक मूल्ये वाढीस लागावीत यासाठी प्रयत्न केले. संपादक, लेखक, अनुवादक, समीक्षक आणि बालसाहित्यकार अशा अनेक पातळ्यांवर त्यांनी केलेले काम लक्षात राहणारे ठरले आहे. साहित्याकडे पाहण्याची विचक्षण वृत्ती आणि ममत्व हा त्यांच्या व्यक्तित्वाचा विशेष.

त्यांच्या निधनाने मराठी साहित्याची मशाल सतत तेवत ठेवणारा एक लेखक आणि समीक्षक हरपला आहे.