महाश्वेता देवी यांच्यानंतर वीस वर्षांनी साहित्यातील सर्वोच्च सन्मान असलेला ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध बंगाली कवी व समीक्षक शंख घोष यांना जाहीर झाला आहे. अकरा लाख रुपये रोख व वाग्देवीची प्रतिमा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कवी व समीक्षक याशिवाय शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले आहे. त्यांच्या साहित्यकृतींचे हिंदी, मराठी, आसामी, पंजाबी व मल्याळम तसेच पंजाबी या भारतीय तसेच काही परदेशी भाषांत भाषांतर झालेले आहे. त्यांच्या कवितेला गेयता तर आहेच त्याचबरोबर त्यांच्या कवितांतून समाजातील वरवरचेपणावर संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांना २०११ मध्ये पद्मभूषण हा सन्मान मिळाला, त्याशिवाय साहित्य अकादमी पुरस्कार, सरस्वती सन्मान, रवींद्र पुरस्कार, नरसिंहदास पुरस्कार हे इतर मानाचे पुरस्कार त्यांना पूर्वीच मिळाले आहेत.

आदिम लता गुलमोमय, मुर्खो बारो, सामाजिक नॉय, बाबोरेर प्रार्थना, दिंगुली रातगुली, निहिता पतलछाया या त्यांच्या साहित्यकृती विशेष गाजल्या. त्यांच्या कवितेने समाजाला नेहमीच नवीन संदेश दिला आहे. कवितेत त्यांनी नेहमी वेगवेगळे प्रयोग केले. बंगाली साहित्याला नवीन शक्ती देण्याचे काम त्यांच्या साहित्यकृतींनी केले. घोष यांचा जन्म आता बांगलादेशात असलेल्या चांदपूर येथे १९३२ मध्ये झाला. त्यांचे शिक्षण कोलकात्यात झाले. तेथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून त्यांनी १९५१ मध्ये बंगाली भाषेत पदवी घेतली. नंतर कोलकाता विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांनी या पुरस्कारावर प्रतिक्रिया दिलेली नाही, त्यांच्या नम्र व संकोची स्वभावाला अनुसरूनच ते आहे. त्यांनी टागोरांवर काही निबंधही लिहिले आहेत. टागोरांवर अधिकारवाणीने लेखन करणारे साहित्यिक म्हणून ते परिचित आहेत. त्यांचे निकटचे मित्र देबेश रॉय यांच्या मते त्यांच्या साहित्यकृती या मुळातच वाचनीय आहेत. घोष यांच्या पुरस्काराने पश्चिम बंगालला पुन्हा एकदा साहित्यात अनेक वर्षे अपेक्षित असलेला पुरस्कार मिळाला आहे. साहित्याशिवाय त्यांनी शिक्षण क्षेत्रातही मोठे काम केले. बंगवासी कॉलेज व सिटी कॉलेज या कोलकाता विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात त्यांनी अध्यापन केले.  १९९२ मध्ये ते जादवपूर विद्यापीठातून निवृत्त झाले. अमेरिकेत लोवा रायटर्स वर्कशॉपमध्ये ते १९६० मध्ये सहभागी झाले होते. दिल्ली विद्यापीठ, सिमल्याची इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स स्टडीज तसेच विश्वभारती विद्यापीठातही त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. ते कवी असले तरी शिक्षण क्षेत्रावर त्यांचे पहिले प्रेम आहे. ताराशंकर, विष्णू डे, सुभाष मुखोपाध्याय, आशापूर्णा देवी, महाश्वेता देवी या बंगाली ज्ञानपीठ विजेत्यांमध्ये आता शंख घोष यांचाही समावेश झाला आहे.