28 February 2021

News Flash

शरू रांगणेकर

रांगणेकर यांनीही जीवनभर ‘सामान्य’पणाच्या खुणा विनातक्रार आणि जाणिवेने जपल्या.

शरू रांगणेकर

 

ठरविलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योजलेली सुविहित यंत्रणा म्हणजेच जर व्यवस्थापन असेल तर ते वरपासून खालपर्यंत सर्वच कर्मचारीवृंदाकडून अंगीकारले जायला हवे. व्यवस्थापनशास्त्राची ‘बॉटम ऑफ पिरॅमिड’ अर्थात पदसूचीतील तळाच्या घटकालाही तितकीच गरज आहे. ‘भारताचे स्वत:चे’ म्हणून विकास पावलेल्या व्यवस्थापनशास्त्राची ही संकल्पनात्मक देणगी आणि तिचे निर्विवाद जनकत्व हे शरू रांगणेकर यांनाच जाते! भारतात व्यवस्थापनशास्त्राच्या उदयकाळात त्याची ओळख, महत्त्व अनेक सोप्या इंग्रजी पुस्तकांद्वारे पटवून देऊन ते सर्वतोमुखी करण्यात रांगणेकर यांचा सिंहाचा वाटा होता. म्हणूनच त्यांना ‘व्यवस्थापन गुरू’ अशी समर्पक उपाधी. पण त्यांच्या व्यक्तित्व व कर्तृत्वाला न्याय देणारी ही परिपूर्ण ओळख नक्कीच नाही. लेखक, चिंतक, व्याख्याते, प्रभावी वक्ते, प्रशिक्षक, संघटक व कुशल नेते अशा वेगवेगळ्या भूमिकांसह त्यांची व्यवस्थापन सल्लागार क्षेत्रात चार दशके मुशाफिरी राहिली. पीटर ड्रकर, फिलिप कोटलर, मायकेल पोर्टर आदी जगाच्या विकसित कप्प्यातील बडय़ा नावांच्या पंक्तीत शरू रांगणेकर यांना मानाचे स्थान आहे. नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी कौन्सिल (एनपीसी), इंडियन सोसायटी फॉर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट (आयएसटीडी), इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट कन्सल्टंट्स ऑफ इंडिया (आयएमसीआय) अशा अनेक व्यावसायिकांच्या संघटनांच्या उभारणीत रांगणेकर यांचे योगदान राहिले. कॉर्पोरेट जगतात वावर, जग पालथे घालणारी भ्रमंती, प्रचंड मोठा अनुभव आणि दांडगा व्यासंग असणाऱ्या माणसाचा साधेपणा इतका की, परिषद-परिसंवादासाठी वक्ते म्हणून आलेले निमंत्रण : मग ते साताऱ्यातून येवो अथवा जबलपुरातून; प्रवास रेल्वेने करावा लागो अथवा बसने; सवड असेल तर आलेले निमंत्रण नाकारायचे नाही हा शिरस्ता त्यांनी कायम पाळला. सफारी सूट आणि पायात ठरलेली सँडल्स हा त्यांचा प्रमाणित पेहरावही परिचितांना माहीत असेल. उद्योग-व्यवसायांना उपलब्ध संसाधनांचा इष्टतम वापर करण्याचा सल्ला देऊन, त्यांचे उत्पादकता व पर्यायाने नफ्याचे गणित रांगणेकर जुळवून देत आले. व्यक्तिगत आयुष्यातही पैशाचे मोल पुरेपूर ठाऊक असलेल्या रांगणेकर यांनी दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू शेजार असतानाही, प्रवासासाठी काळ्या-पिवळ्या टॅक्सीचा कायम वापर केला. रांगणेकर यांची इंग्रजीतील अनेक पुस्तके गाजली आहेत. पुस्तकांची लोकप्रियता पाहता त्यांचे अनेक भाषांमध्ये अनुवादही प्रसिद्ध झाले आहेत. ‘आपल्या पत्नीकडून व्यवस्थापन कसं शिकावं’ हे स्वयंपाकघर सांभाळणाऱ्या गृहिणीच्या व्यवस्थापकीय कौशल्याचे रूपक अथवा व्यवस्थापनाच्या आदर्शापेक्षा, व्यवस्थापन कसे नसावे याचा वस्तुपाठ असलेल्या ‘भारतीय व्यवस्थापकांच्या अद्भुत दुनियेत’ वगैरे मराठीत उपलब्ध त्यांच्या पुस्तकांचे काही दमदार नमुने आहेत. त्यांच्या पुस्तकांना ‘इंडिश’ लेखक

आर. के. नारायण यांच्या प्रशंसेची आणि ‘कॉमन मॅन’ आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांची जोड मिळाली. रांगणेकर यांनीही जीवनभर ‘सामान्य’पणाच्या खुणा विनातक्रार आणि जाणिवेने जपल्या. करोना साथीचा काळ असल्याने मृत्यूपश्चात देहदानाची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली, पण आर्थिक संपत्तीतील मोठा हिस्सा त्यांनी दान केला आहे. अशा या अलौकिक तरीही ‘सामान्य’ चिंतनमूर्तीला आदरांजली!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 12:01 am

Web Title: sharu ranganekar profile abn 97
Next Stories
1 व्ही. शांता
2 उस्ताद गुलाम मुस्तफा खाँ
3 डॉ. जुल्फी शेख
Just Now!
X