News Flash

शशिकला

आपण कधी खलनायिका होऊ, असे न वाटलेल्या शशिकला यांना या चित्रपटानंतर मात्र तशाच भूमिका मिळत गेल्या.

शशिकला

दिवाळखोरीमुळे सोलापूरसारखे शहर सोडून मुंबईला काम मिळवण्यासाठी आलेल्या अभिनेत्री शशिकला यांच्या वडिलांना मुलीबद्दल नुसता अभिमानच नव्हता, तर विश्वासही होता. वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच नृत्य करू लागलेल्या शशिकला पुढे हिंदी सिनेसृष्टीत स्वत:चे स्थान मिळवतील, याबद्दलही त्या पित्याच्या मनात खात्री असावी. हिंदी सिनेसृष्टीत येणाऱ्या अनेकांना त्यांची जात, धर्म, कौटुंबिक पार्श्वभूमी यांपैकी कशाबद्दलही उलट प्रश्न न करता प्रवेश मिळत होता, असा तो काळ. त्यामुळेच शशिकला यांना नूरजहाँ यांचे पती शौकत हुसेन रिझवी तयार करत असलेल्या सिनेमातील कव्वालीच्या चित्रीकरणात समाविष्ट करून घेण्यात आले. आपोआपच त्यांचे जवळकर हे आडनाव गळून पडले आणि त्या नुसत्याच शशिकला राहिल्या, त्या शेवटपर्यंत. व्ही. शांताराम यांच्यासारख्या त्या काळातील अतिशय चोखंदळ समजल्या जाणाऱ्या दिग्दर्शकाने त्यांच्यातील अभिनयगुण ओळखले आणि त्यांच्या ‘तीन बत्ती चार रास्ता’ या सिनेमात त्यांना भूमिका दिली. आपण कधी खलनायिका होऊ, असे न वाटलेल्या शशिकला यांना या चित्रपटानंतर मात्र तशाच भूमिका मिळत गेल्या. खलनायिका ही कैदाशीण, दुष्ट, कजाग आणि नतद्रष्टच असते, या समजातून बाहेर पडून त्यांनी आपल्या अभिनयामुळे या प्रकारच्या भूमिकांनाही दर्जा प्राप्त करून दिला. बिमल रॉय, ताराचंद बडजात्या यांच्यासारख्या दिग्दर्शकांकडे काम केल्यामुळे मीनाकुमारी, अशोककुमार, शम्मी कपूर, प्रदीपकुमार यांच्यासारख्या कलाकारांबरोबर त्यांना काम करण्याची संधी मिळाली. सिनेमासारख्या झगमगत्या दुनियेत राहूनही आपली वेगळी ओळख जपण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात. एरवी सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी ज्या नाना क्लृप्त्या कराव्या लागतात, त्यांपैकी कोणतीच गोष्ट शशिकला यांना करावी लागली नाही. आपल्या कलाजीवनात तटस्थ राहण्याची वृत्ती जोपासल्यामुळेच ऐंशीच्या दशकात मदर तेरेसांच्या कार्यामुळे आकर्षित होऊन घराचा त्याग करून ‘मिशनरीज् ऑफ चॅरिटी’ या संस्थेत त्यांनी कामास सुरुवात केली. कुष्ठरुग्णांची सेवा हे त्यांनी आपले जीवनकार्य मानले. विशिष्ट लकबींचा उपयोग करून व्यक्तिरेखा साकार करण्याची त्यांची पद्धत सिनेरसिकांमध्ये चर्चेचा विषय होत असे. ‘पद्माश्री’ हा पुरस्कार त्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा ठरला. सहनायिका किंवा खलनायिका म्हणून चित्रपटसृष्टीत मान मिळवलेल्या अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील, अशा कलाकारांपैकी शशिकला या एक. नकारात्मक भूमिकाही रसिकांच्या पसंतीला उतरू शकतात, याचे शशिकला हे एक उत्तम उदाहरण. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील एक गुणी अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 12:01 am

Web Title: shashikala profile abn 97
Next Stories
1 लॅरी मॅकमट्र्री
2 जय झरोटिया
3 अनिता पगारे
Just Now!
X