तामिळनाडूत कलपक्कम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात अणुइंधनावर फेरप्रक्रियेची यंत्रणा तसेच अरिहंत या पाणबुडीसाठी अणुऊर्जा पुरवठा करणारा प्रकल्प उभारण्यात मोठी भूमिका पार पाडणारे प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ शेखर बसू यांची अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. बसू हे सध्या भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक आहेत.

कल्पक्कम येथील अणुपाणबुडी इंधन प्रकल्पाचे शिल्पकार म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. त्यांनी ८० मेगावॉट क्षमतेचा हा प्रकल्प उभारून भारतीय अरिहंत पाणबुडी प्रकल्पात मोठी भूमिका पार पाडली. स्वदेशी अणुपाणबुडी बनवणाऱ्या देशांमध्ये भारताला स्थान मिळवून देण्यात बसू यांचा मोठा वाटा आहे. अरिहंत अणुपाणबुडी २००९ मध्ये पूर्ण झाली. विविध चाचण्यांनंतर ती वर्षअखेरीस नौदलात सामील होत आहे. शेखर बसू यांचा जन्म कोलकाता येथे २० सप्टेंबर १९५२ रोजी झाला. त्यांचे शिक्षण कोलकात्यातील सरकारी शाळेत झाले व मुंबईच्या वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय) या संस्थेतून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली. १९७४ मध्ये ते भाभा अणुसंशोधन केंद्रात प्रशिक्षण शाळेत रुजू झाले. अणुविज्ञान व अभियांत्रिकीतील एक वर्षांचा प्रशिक्षण अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. १९७५ मध्ये त्यांनी अणुभट्टी विभागात काम सुरू केले. १९८८ मध्ये बसू यांची कलपक्कम प्रकल्पाचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. तेथील प्रकल्प त्यांनी २००६ मध्ये पूर्ण केला. किनाऱ्यावरील अणुपाणबुडी इंधन प्रकल्प त्यांनी सुरू केला. कलपक्कमव्यतिरिक्त त्यांनी तारापूर, तुर्भे येथेही अणुइंधन फेरप्रक्रियेवर काम केले. तामिळनाडूतील ठेनी येथे भारताच्या न्यूट्रिनो वेधशाळेची मुहूर्तमेढ त्यांनीच रोवली. २०१२ मध्ये ते भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक झाले. अन्न, आरोग्य, शेती व औषधे यासाठी अणुतंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठीही त्यांनी बरेच काम केले. विशाखापट्टनम येथे फेरप्रक्रिया यंत्रणा उभारताना १ जीईव्ही क्षमतेचा अतिवाहक त्वरणक (अ‍ॅक्सिलरेटर) तयार करण्यातही त्यांची मोठी भूमिका होती. त्यांना भारत सरकारने पद्मश्रीने सन्मानित केले आहे. अत्यल्प काळात तामिळनाडूतील कलपक्कम येथील फास्ट ब्रीडर अणुभट्टी कार्यान्वित करणे व कुडनकुलम येथील एक हजार मेगावॉटचा प्रकल्प सुरू करणे, ही दोन आव्हाने त्यांच्यापुढे आहेत.

Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Vartaknagar Police Colony
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित
Founder and CEO of Cafe Mutual Prem Khatri
बाजारातली माणसं : फंड वितरकांचा हक्काचा माणूस- प्रेम खत्री
Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे