‘फिल्म अ‍ॅण्ड टेलीव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ (एफटीआयआय) ही भविष्यातील चित्रपटकर्मी घडवणारी मान्यवर संस्था. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दिग्दर्शनाचा अनुभव गाठीशी असलेले अभिनेता-दिग्दर्शक शेखर कपूर यांची या संस्थेच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही खूप महत्त्वाची आणि वेगळी मानली जाते. मुळातच, चित्रपटांकडे बघण्याचा तद्दन बॉलीवूडी दृष्टिकोन शेखर कपूर यांना मान्य नाही. त्यामुळे हिंदी चित्रपटांपासून दिग्दर्शनाची सुरुवात करत हॉलीवूडमध्ये रमलेल्या शेखर कपूर यांनी निर्माता-दिग्दर्शक म्हणून आपली वहिवाट निर्माण के ली. संवेदनशील विषय त्याच तरलतेने, सहजतेने रुपेरी पडद्यावर चितारणाऱ्या शेखर कपूर यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे विचार हे कायमच तरुण पिढीला आकर्षित करणारे ठरले.

लाहोरमध्ये जन्मलेल्या शेखर कपूर यांच्या वाटय़ालाही फाळणीचे वेदनादायी अनुभव आले. फाळणीच्या जखमा अंगावर घेऊन भारतात स्थिरावलेल्या कुटुंबांपैकी एक त्यांचेही कुटुंब होते. वडील कुलभूषण कपूर हे डॉक्टर आणि आई शीलकांता कपूर या देव आनंद यांच्या भगिनी. तरीही चित्रपटांचा थेट वारसा त्यांच्याकडे नव्हता, किं बहुना त्यांनी चित्रपट क्षेत्रात येण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्या वडिलांना मान्य नव्हता. पण इंग्लंडमध्ये सनदी लेखापाल म्हणून कार्यरत असताना तिथल्या चळवळींचा भाग झालेल्या शेखर कपूर यांना तरुणांनी अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून केलेली वेगवेगळ्या कलांची निवड भावली. आपल्यालाही आयुष्यभर असे चाकोरीबद्ध काम करायचे नाही, असा निर्धार केल्यानंतर शेखर कपूर पहिल्यांदा अभिनयाकडे वळले. १९८५ साली ‘खानदान’ या दूरदर्शन मालिके तून आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेला त्यांचा चेहरा कलाकार म्हणून लोकांसमोर आला. त्यानंतर त्यांनी ‘उडान’, ‘उपन्यास’ अशा मालिकांत कामही केले, मात्र कुठल्याही एकाच माध्यमात अडकू न पडायचे नाही. सतत प्रयोगशील काही तरी करत राहायचे या ध्यासाने झपाटलेला हा तरुण ‘मासूम’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून लोकांसमोर आला.

दिग्दर्शक म्हणून ‘मिस्टर इंडिया’, ‘बँडिट क्वीन’ असे वेगवेगळे चित्रपट केल्यानंतर बॉलीवूडच्या त्याच त्याच धाटणीला शेखर कपूर कंटाळले. ‘बँडिट क्वीन’ला मिळालेल्या आंतरराष्ट्रीय यशानंतर त्यांनी हॉलीवूडकडे मोर्चा वळवला. इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ यांची कथा आपल्या शैलीत तिथे राहून पडद्यावर आणणाऱ्या शेखर कपूर यांना ब्रिटिशांच्या टीके चे धनीही व्हावे लागले. पण रिचर्ड अटेनबरो यांना ‘गांधी’ चित्रपट काढण्याचा अधिकार नसेल तर मलाही ‘एलिझाबेथ’ काढण्याचा अधिकार नाही, असे ठणकावून सांगणारे शेखर कपूर आता या ‘एलिझाबेथ’ चित्रपट मालिके तील ‘एलिझाबेथ – डार्क एज’ हा तिसरा चित्रपट काढण्याच्या प्रयत्नात आहेत. तरुण पिढीला समजून घेणारा, त्यांच्याशी जुळवून घेणारा दिग्दर्शक अशीही त्यांची प्रतिमा असल्याने ‘एफटीआयआय’ची सूत्रे हातात घेतल्यानंतर ते कशा पद्धतीने ही जबाबदारी हाताळतात, याबद्दल उत्सुकता राहील.