सैद्धांतिक विज्ञान हा तसा सामान्यांच्या आवाक्यापलीकडचा प्रांत. सैद्धांतिक विज्ञानात अनेक भाकिते केली जातात. त्यातील काहींना गणिताचा व वैज्ञानिक तत्त्वांचा आधार असतो, असा या सगळ्याचा मथितार्थ. सैद्धांतिक विज्ञान हे म्हणूनच सामान्यांना जरा वेगळे वाटत असले तरी त्याचाही रोजच्या जीवनाशी निकटचा संबंध असतो. अशाच सैद्धांतिक विज्ञानात रमणाऱ्या शोभना नरसिंहन या ‘जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड सायंटिफिक रीसर्च’ या बेंगळूरु येथील संस्थेत काम करतात. त्यांना नुकतेच अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस या संस्थेचे सदस्यत्व मिळाले आहे!  आंतरराष्ट्रीय पातळीवरचा हा मोठा सन्मान मानला जातो. यापूर्वी हा सन्मान चार्लस डार्विन, अल्बर्ट आइनस्टाइन, नेल्सन मंडेला यांच्यासारख्या दिग्गजांना मिळाला होता. कुठल्याही विज्ञान शाखेत संगणकात्मक पातळीवर संशोधन करणारी एक उपशाखा असते, तशीच अब्जांश विज्ञानात (नॅनो सायन्स) ती आहे. या शाखेत नरसिंहन यांचे मोठे काम आहे. संगणकाच्या मदतीने विज्ञानाच्या कुठल्याही क्षेत्रातील शक्यता चटकन तपासता येतात, त्यामुळे वेळ वाचून आपण संशोधन उद्दिष्टे लवकर साध्य करू शकतो. अब्जांश तंत्रज्ञानाने आपण रोजच्या जीवनात ज्या वस्तू वापरतो त्या बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थामध्ये खूप क्रांती झाली आहे. त्यातून नॅनो मटेरिअल्स ही शाखा उदयास आली.  कमी जागेत वस्तू बसवण्याचे आव्हान, त्या वस्तू हाताळण्यातील सोपेपणा, टिकाऊपणा यासाठी लागणारी मितींची गणिते नरसिंहन यांनी मांडली. नॅनो उत्प्रेरक तयार करून त्यांनी स्वच्छ ऊर्जाक्षेत्रात मोठी प्रगती साध्य केली. संगणकीय स्मृती भांडारासाठी जे चुंबकीय घटक वापरले जातात त्यातही बरेच बदल त्यांच्या संशोधनामुळे शक्य झाले आहेत. सोन्याच्या नॅनो कणांचा ऑक्साइड्सवर होणारा परिणाम तपासून त्यांनी नवे इलेक्ट्रॉनिक घटक तयार केले. भारतात महिलांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, गणित व अभियांत्रिकी लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. यापूर्वी इटलीतील ट्रायस्टे येथे असलेल्या अब्दुस सलाम आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी केंद्रासाठी त्यांनी महिलांसाठीचे अभ्यासक्रम तयार करण्यात मोठा वाटा उचलला. २०११ मध्ये त्यांना भारतातील राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे सदस्यपद देण्यात आले. २०१० मध्ये स्त्रीशक्ती सन्मान विज्ञान पुरस्कार व कर्नाटक सरकारचा  कल्पना चावला वैज्ञानिक पुरस्कार त्यांना मिळाला. नरसिंहन या अलाहाबाद येथील राष्ट्रीय विज्ञान अकादमीत शिकल्या. त्यानंतर त्यांनी पदार्थविज्ञानात आपली कारकीर्द घडवली. मृदुभाषी स्वभाव व सहकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची हातोटी हीदेखील त्यांच्या या यशाची रहस्ये आहेत.