28 January 2021

News Flash

श्रीपती खंचनाळे

खंचनाळे कुटुंबीय कर्नाटकातील श्रीमंत म्हणण्यासारखे. श्रीपतीने पैलवान व्हावे ही वडिलांची इच्छा

श्रीपती खंचनाळे

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचा राजाश्रय मिळाल्याने कोल्हापूर ही कुस्तीची भूमी ठरली आणि देशभरातील मल्ल येथे येऊन सराव करू लागले. यातील एक उल्लेखनीय नाव म्हणजे श्रीपती खंचनाळे. सीमाभागातील मुलगा येथे येतो काय, अल्पावधीत तगडय़ा मल्लांना अस्मान दाखवतो काय आणि याच्या जोरावरच देशातील सर्वात मोठय़ा पहिल्याच स्पर्धेत नामांकित मल्लाला लोळवून ‘हिंद केसरी’पदाची गदा मिळवतो काय. हे सारेच अचंबित करणारे.

खंचनाळे कुटुंबीय कर्नाटकातील श्रीमंत म्हणण्यासारखे. श्रीपतीने पैलवान व्हावे ही वडिलांची इच्छा. त्यासाठी गावची शाळा सोडून ते कोल्हापुरातील जय भवानी तालीममध्ये दाखल झाले. येथे वस्ताद हसनबापू तांबोळी, विष्णू नागराळे, मल्लाप्पा तडाखे यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लविद्येत पारंगत झालेला हा पोर कर्नाटकात रंगा पाटीलवर विजयी झाल्यावर कुस्तीतील ‘श्रीपती’ बनण्याच्या पथावर पोहोचला. पुढे देशातील अनेक नामवंत मल्लांना काही मिनिटांतच आसमान दाखवणारा अशी प्रतिमा झाली. या लोकप्रियतेच्या आधारेच १९५८ साली रुस्तुम ए पंजाब बंतासिंगच्या आव्हानास्पद लढतीत घुटना डावावर विजय मिळवल्यावर श्रीपतींना ‘हिंद केसरी’ची गदा राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी प्रदान केली. हिंद केसरी किताब मिळाल्याने त्यांच्याशी कुस्ती करण्यास कोणीच तयार होत नव्हते; इतका दबदबा झाला. पुढे रशियात कुस्तीसाठी निवड झाली. पण मातीवरील कुस्तीतील हा मल्ल मॅटवर टिकू शकला नाही. मॅटवर प्रावीण्य मिळवण्यासाठी दिल्लीच्या आखाडय़ात सराव केला. नंतर पाकिस्तानपासून ते विदेशातील कैक मल्लांना लोळवले. चांदीच्या सात गदा, तीन सुवर्णपदके आणि हिंद केसरी जोडीलाच एकलव्य, द्रोणाचार्यसारखे पुरस्कार ही त्यांच्या आयुष्यभराची बलदंड कमाई. ४५ व्या वर्षी कुस्तीतून निवृत्त झाल्यानंतर नवे मल्ल घडवण्याचे व्रत त्यांनी स्वीकारले. शाहूपुरी तालमीत अनेक नामवंत मल्लांची यादी दिसते त्यामागे त्यांचीच कर्तबगारी. या तालमीत तीनशेवर मल्ल एकावेळी सराव करीत असत. मल्लांसाठी तरुणपण जितके प्रतिष्ठेचे तितकीच वृद्धावस्था त्रासदायक. त्यांच्या बाबतीत हेच घडले. दोन वर्षांपूर्वी प्रकृती त्रास देऊ लागली. पुण्यात उपचार घेतले. पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागला. सरकारी अनुदान अपुरेच. राजकारण्यांची आश्वासने नेहमीसारखी हवेत विरणारी. हल्ली ते पुन्हा आजारी पडल्यावर पाच लाखांची मदत शासनाने देऊ केली हे उत्तरायुष्यात समाधान. बलदंड मल्लांशी झुंजणारा हा पैलवान गडी उपचारांची लढाई जिंकू शकला नाही. पण कोल्हापूरच्या मातीचे नाव त्यांनी राखले!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 12:01 am

Web Title: shreepati khanchnale profile abn 97
Next Stories
1 मंगलेश डबराल
2 नरेंद्र भिडे
3 सुह् से-ओक
Just Now!
X