अमेरिकेतील निवडणूक निकालाचे कवित्व अजूनही सुरूच आहे. पण दरम्यान, तेथील श्री ठाणेदार यांच्या निवडणूक-विजयाची बातमी मराठीजनांसाठी आनंदाची ठरावी. ठाणेदार हे यंदाच्या निवडणुकीत मिशिगन प्रांतातील थर्ड डिस्ट्रिक्ट या मतदारसंघातून ‘स्टेट रिप्रेझेन्टेटिव्ह’ म्हणून निवडले गेले आहेत. हे पद आपल्याकडच्या ‘आमदार’ या पदाशी समकक्ष. अमेरिकेच्या उत्तरेकडील, आकाराने आणि लोकसंख्येच्या बाबतीतही बऱ्यापैकी मोठय़ा असणाऱ्या मिशिगन प्रांताचे कनिष्ठ सभागृह अर्थात तिथल्या विधानसभेत ठाणेदार हे आता थर्ड डिस्ट्रिक्टचे प्रतिनिधी असतील. हा मतदारसंघ गौरवर्णीय, कृष्णवर्णीय, हिस्पॅनिक, आशियाई अशी विविधता असणारा आहे, पण येथे बहुसंख्या आहे ती कृष्णवर्णीयांची. एकूण मतदानापैकी ९३ टक्के मते मिळवून ठाणेदार विजयी झाले, यावरूनच तिथल्या या विविध समाजगटांनी त्यांच्यावर दाखविलेला विश्वास दिसून येतो. मुळे तिथल्या मातीतली नसूनही ठाणेदार हे या मंडळींना ‘आपला माणूस’ वाटले याचे, त्यांचा आजवरचा प्रवास पाहिला की फारसे नवल वाटायला नको.

श्री ठाणेदार यांचा जन्म बेळगावचा. १९५५ सालातला. त्यांनी वयाच्या १८व्या वर्षी बी.एस्सी. उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली. मग धारवाडच्या महाविद्यालयात एम.एस्सी.ला प्रवेश घेतला पण लगोलग विजापूर स्टेट बँकेत त्यांना नोकरीची संधीही चालून आली. ती करता करता पहिल्या वर्षांत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर, मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात संशोधक साहाय्यक म्हणून रुजू झाले. यात राहून गेलेली एम.एस्सी. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पूर्ण केली. पुढे १९७९ साली अमेरिकेच्या अ‍ॅक्रॉन विद्यापीठात रसायनशास्त्रातील पीएच.डी.साठी त्यांनी प्रवेश घेतला अन् ते अमेरिकावासी झाले ते कायमचेच. दशकभरात त्यांना अमेरिकेचे नागरिकत्वही मिळाले. त्यांनी व्यवसाय-प्रशासन या विषयातले उच्चशिक्षणही घेतले. ‘केमिर’ या रासायनिक कंपनीत ते नोकरीला लागले आणि अखंड अभ्यास व कष्टाच्या जोरावर अल्पावधीत तिचे मालकही झाले. ‘बेळगावातला मॅट्रिकच्या परीक्षेत जेमतेम ५५ टक्क्यांनिशी उत्तीर्ण झालेला एक साधारण विद्यार्थी’ ते कष्टाने उच्चशिक्षण घेऊन ‘अमेरिकेतला एक कल्पक, यशस्वी व्यावसायिक’ बनण्यापर्यंतचा ठाणेदार यांचा हा प्रवास त्यांच्या ‘ही ‘श्री’ची इच्छा’ या आत्मकथनात त्यांनी प्रांजळपणे सांगितला आहे.

या प्रवासात ठाणेदार यांनी अनेक चढ-उतार अनुभवले. धीर खचवणाऱ्या घटनाही त्यांच्या आयुष्यात घडल्या. रोल्स रॉईस, फेरारी यांसारख्या अतिमहागडय़ा गाडय़ांतून फिरणाऱ्या ठाणेदार यांच्यावर २००८ च्या आर्थिक अरिष्टामुळे आलेल्या व्यवसाय-मंदीत मालमत्ता जप्त होण्याचे संकट ओढवले, पण खचून न जाता त्यांनी चिकाटीने पुन्हा ‘श्री’ गणेशा केला आणि पुन्हा यशस्वीही झाले. दोन वर्षांपूर्वी मिशिगन प्रांताच्या गव्हर्नर (आपल्याकडच्या मुख्यमंत्र्यांशी समकक्ष) पदाच्या निवडणुकीसाठी ते डेमोक्रॅट पक्षाकडून लढले, त्यात यश मिळाले नाही; पण यंदा त्याच प्रांतातील आमदार म्हणून ते निवडून आले. प्रतिकूलतेशी झगडत यशोशिखरापर्यंत मुसंडी मारण्याची त्यांची ही वृत्ती प्रेरणादायी ठरावी अशीच. ‘दारिद्रय़ाच्या वेदना मी समजू शकतो’ असे म्हणणारे ठाणेदार त्यामुळेच अमेरिकेतील त्यांच्या मतदारांनाही भावले. वयाच्या चोविसाव्या वर्षी अमेरिकेत गेलेले ठाणेदार आता पासष्टीत आहेत. म्हणजे तब्बल चार दशके ते अमेरिकेत आहेत. पण म्हणून मराठीशी असलेली त्यांची नाळ तुटलेली नाही. अमेरिकेत मराठी संस्कृती जपणाऱ्या मंडळींमध्ये ते सक्रिय आहेत. त्यांची दोन आत्मकथने मराठीत वाचकप्रिय ठरली आहेत; आता या निवडणूक अनुभवांवर आधारित पुस्तक ते लिहिणार आहेत.