कार्बन हा सजीवांच्या रचनेतील एक महत्त्वाचा घटक, त्यामुळे विश्वात दुसरीकडे कुठेही जीवसृष्टी किंवा परग्रहवासीय कधीकाळी सापडले तरी त्यांच्यात कार्बन हा मूलभूत घटक असेलच असे ते छातीठोकपणे सांगत असत. विज्ञान त्यांनी स्वत:पुरते मर्यादित न ठेवता त्याच्या प्रसारासाठी ‘व्हेगा सायन्स ट्रस्ट’ नावाची छोटे विज्ञान लघुपट बनवणारी संस्थाही सुरू केली होती.  विशेष म्हणजे १९९६ मधील रसायनशास्त्राचे नोबेल बकीबॉल या कार्बनच्या नव्या रूपाच्या संशोधनासाठी त्यांना विभागून मिळाले होते. त्यांचे नाव सर हॅरॉल्ड क्रोटो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोबेल फार उशिरा मिळते असा सर्वसाधारण समज तेथेही खरा ठरला. १९८५ मध्ये लावलेल्या फुलेरीन्सच्या स्वरूपातील कार्बनच्या नव्या रूपाला नोबेल मिळण्यास ९६ साल उजाडले. फुलेरीन्स हा कार्बनचा प्रकार जेव्हा वाफेच्या रूपातील कार्बन निष्क्रिय वायूंच्या वातावरणात संघनन पावतो तेव्हा तयार होतो. त्यात कार्बन अणूंचे अनेक समूह वेगळ्या रचनांनी जोडले जातात. फुटबॉलसारखी रचना कार्बन धारण करू शकतो व त्याला बकमिन्स्टर फुलेरिन  म्हणतात. ही रचना अमेरिकेतील वास्तूरचनाकार बकमिन्स्टर फुलर यांनी बांधलेल्या इमारतींसारखी होती, त्यामुळे कार्बनच्या रचनेस त्यांचे नाव देण्यात आले. पण नंतर ते नाव बकीबॉल्स असे झाले. ग्राफाइटवर लेसर किरण सोडून कार्बनचे ६० अणू असलेले नवे रूप तयार झाले. पुढे ७० अणूंचे रग्बी चेंडूसारखे नवे कार्बन रूपही तयार करता आले.

क्रोटो यांचा जन्म केंब्रिजशायरमधील विसबेखचा. त्यांचे वडील ज्यू होते, त्यामुळे जर्मनीतून त्यांची हकालपट्टी झाली नंतर ते ब्रिटनमध्ये आले. क्रोटो यांचे शिक्षण बोल्टन स्कूल येथे झाले. त्यांना भूगोल, जिम्नॅस्टिक्स, सुतारकाम यांची आवड होती. त्यांचे रसायनशास्त्राचे शिक्षक हॅरी हिनी यांनी त्यांना या विषयाची गोडी शेफिल्ड विद्यापीठात असताना लावली. क्रोटो शिक्षण घेत असतानाच टेनिस खेळत असत. विद्यार्थ्यांच्या लोककला मंचात ते एका नियतकालिकाचे संपादकही होते, त्यांना गिटार वाजवता येत होते. विद्यार्थी असताना त्यांनी संडे टाइम्सची बुक जॅकेट स्पर्धा जिंकली होती. शेफिल्ड विद्यापीठातून ते वर्णपंक्तिशास्त्रात डॉक्टरेट झाले. त्यांनी अमेरिकेत न्यूजर्सीतील बेल लॅबोरेटरीज येथे संशोधन केले होते. ब्रिटनला परत आल्यावर ते ससेक्स विद्यापीठात अध्यापनामध्ये रमले. वर्णपंक्तिशास्त्राच्या मदतीने त्यांनी असे दाखवून दिले होते की, मोठे तारे व आंतरतारकीय वायू यात कार्बन रेणूच्या साखळ्या असतात. १९९० मध्ये ते रॉयल सोसायटीचे फेलो झाले. लाँगस्टाफ पदक, मायकेल फॅरेडे पुरस्कार, कोपले पदक व नाइट किताब असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. शाळा, क्लब, विज्ञान संग्रहालये येथे ते भाषणांना जात असत, त्यातून त्यांनी पुढील पिढय़ांना प्रेरणा दिली. त्यांचा सतत हसमुख असलेला चेहरा ही त्यांची ओळख होती, आता ते हसू कायमचे लोपले आहे.

 

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sir harold kroto
First published on: 05-05-2016 at 03:40 IST