युद्धात विजयी होण्यासाठी पायदळ, नौदल व हवाई दलाचा समन्वय महत्त्वपूर्ण ठरतो. १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय सैन्याने अपरिमित शौर्याइतकीच, उत्तम समन्वयामुळे पाकिस्तानची धूळधाण उडवली होती. या युद्धात पूर्व पाकिस्तानात हवाई मोहिमांवेळी शत्रूच्या हल्ल्यांना निर्भीडपणे तोंड देणारे स्क्वॉड्रन लीडर परवेझ जामस्जी (निवृत्त) यांचे नुकतेच मुंबई येथे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. आज भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील हेलिकॉप्टर व लढाऊ विमाने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेली आहेत. त्याचे सारथ्य करताना वैमानिकास अनेक सुविधा, सुरक्षेशी संबंधित बाबी बटणाच्या कळींवर उपलब्ध होतात. जवळपास ५० वर्षांपूर्वी हेलिकॉप्टर, विमानांसाठी तसे तंत्रज्ञान अस्तित्वात नव्हते. आकाशातील प्रत्येक भरारीत वैमानिकाचे कौशल्य पणास लागत असे. स्क्वॉड्रन लीडर परवेझ जामस्जी यांची कामगिरी त्या कौशल्याचेच प्रतीक ठरली. तेव्हा जामस्जी ‘फ्लाइट लेफ्टनंट’ म्हणून हेलिकॉप्टर विभागात कार्यरत होते. मिझोरामातील दिमागिरी येथील तळावर त्यांचा विभाग सज्ज होता. रशियन एम चार हेलिकॉप्टरच्या साह्य़ाने त्यांनी शेकडो जवानांना शत्रूच्या प्रदेशात उतरविले. डिसेंबर १९७१ मध्ये त्यांच्या हेलिकॉप्टरवर पाकिस्तानी सैन्याने स्वयंचलित बंदुका, छोटय़ा तोफांनी हल्ला केला. अतिशय कठीण परिस्थितीत जामस्जी यांनी हेलिकॉप्टर पुन्हा दिमागिरी तळावर सुखरूप आणले. एकदा शत्रूच्या प्रदेशात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. हवेत इंजिन बंद पडले. असे अकस्मात घडल्यावर वैमानिक फारसे काही करू शकत नाही. त्याच्यासमोर हेलिकॉप्टर सोडून हवाई छत्रीच्या साहाय्याने आकाशात उडी घेणे हा एकमेव पर्याय असतो. पण जामस्जी तो पर्याय स्वीकारणाऱ्यांमधले नव्हते. अखेरच्या क्षणी त्यांनी कौशल्यपूर्वक हेलिकॉप्टरचे सारथ्य केले. शत्रूच्या प्रदेशातून हेलिकॉप्टर भारतीय हद्दीत आणले. पायाला गोळी लागून ते एकदा जखमी झाले होते, पण त्यांनी हिंमत हरली नाही. या युद्धात भारतीय हवाई दलाने आकाशात आपले वर्चस्व राखले. पूर्व पाकिस्तानातील हवाई धावपट्टय़ांवर बॉम्बफेक करून पाकिस्तानची कोंडी केली. भारतीय हवाई दलाच्या पाठबळामुळे सैन्याने ढाक्यापर्यंत मजल मारत निर्णायक विजय प्राप्त केला. युद्धातील कामगिरीबद्दल जामस्जी यांना ‘वीरचक्र’ने सन्मानित करण्यात आले होते. १९६५ मध्ये हवाई दलात वैमानिक म्हणून दाखल झालेले जामस्जी हे १९८५ मध्ये निवृत्त झाले. पाकिस्तान विरोधातील युद्धात दाखविलेल्या शौर्याबद्दल महाराष्ट्र सरकारनेही त्यांचा गौरव केला होता.